कार्तिक आर्यन म्हणतो मी अंधाराला घाबरतो (Kartik...

कार्तिक आर्यन म्हणतो मी अंधाराला घाबरतो (Kartik Aaryan- Yah Sach Hai Ki Mujhe Andhere Se Daar Lahta Hai…)

‘भूल भुलैया 2’ या चित्रपटाला मिळालेल्या भरघोस यशाबद्दल अभिनेता कार्तिक आर्यन सध्या खूप खुश आहे. याशिवाय तो येत्या काळात शहजादा, कॅप्टन इंडिया, सत्यनारायण की कथा, फ्रेडी या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. कार्तिकच्या एवढ्या चित्रपटांची मेजवानी मिळणार असल्याने त्याचे चाहतेही खूप खुश आहेत. कार्तिकची त्याच्या चाहत्यांसोबत नाळ जोडलेली आहे. तो कधीच आपले चाहते निराश होतील असे वागत नाही.

कार्तिकने एका मुलाखतीत सांगितले की,” मला अजूनही आठवतं, माझा पहिला चित्रपट ‘प्यार का पंचनामा’ हिट झाल्यानंतरही मी ऑडिशन्स देत होतो. लोकांमध्ये मला स्वतःची ओळख निर्माण करता आली नव्हती. लोकांमध्ये माझी खरी ओळख ‘सोनू की टीटू की स्विटी’ या चित्रपटानंतर झाली. माझा संयम हेच माझ्या यशाचे रहस्य आहे. माझे सुरुवातीचे काही चित्रपट चालले नाहीत, पण मी कधीच माझा  संयम सोडला नाही, नेहमी मेहनत करत राहिलो. मी नेहमीच मला सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यावेळी माझ्या मनात नेहमी एक गोष्ट असायची की आज लोक मला समजू शकत नाहीत पण एक दिवस ते नक्की मला समजून घेतील आणि त्यांचे खूप प्रेमही देतील. इंडस्ट्रीत येऊ पाहणाऱ्यांना माझा असा सल्ला आहे की, आपल्या कामासाठी कधीच निराश होऊ नका. खूप मेहनत करून पुढे जा. तुम्हाला यश नक्कीच मिळेल. पण कोणत्याही गोष्टीची आशा कधीच सोडू नका.

माझ्या मते, सर्वात कठीण गोष्ट म्हणजे कॉमेडी करणे. ती करताना तुम्हाला अनेक गोष्टींवर लक्ष द्यावे लागते. जर तुम्ही त्या गोष्टींवर बारीक लक्ष ठेवले तर समोरच्याला हसवणे कठीण नाही. आपल्याकडे अनेक विनोदी चित्रपट बनतात, पण फार कमी यशस्वी होतात. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की जर तुम्ही नैसर्गिक कॉमेडी करत असाल आणि तुमचं कॉमिक टायमिंगही उतत्म असेल तर तुम्हाला यश नक्की मिळेल. माझ्या मते, मला कॉमेडीपेक्षा इमोशनल सीन्स करणं जास्त सोयीस्कर आणि सोपं वाटतं. माझ्या दिग्दर्शकांनाही ते आवडतं. कारण मी कॉमेडीपेक्षा इमोशनल सीन चांगला करू शकतो, असा माझा विश्वास आहे. हसण्याचे असो वा रडण्याचे दोन्ही सीन मला उत्तम जमतात असे मला वाटते.

माझे चित्रपट कौटुंबिक असतात. हल्ली लोकांना असे सिनेमे पाहायला आवडतात जे कुटुंबासोबत बघता येतील. यामुळेच लुका छुपी, सोनू की टीटू की स्विटी, पती पत्नी और वो, आता भूलभुलैया 2 सुपरडुपर हिट ठरले.

कोरोनाच्या काळात अनेक अडचणी आल्या. माझ्या हातून अनेक चित्रपट गेले. पण यावर मी कधीच काही बोललो नाही. काळानुसार परिस्थिती बदलते. माझा सकारात्मक मानसिकतेने पुढे जाण्यावर विश्वास आहे आणि मी माझ्या कामावर अधिक लक्ष केंद्रित करण्याला प्राधान्य देतो. कॉमेडी असो की गंभीर भूमिका, दोन्हीमध्ये मेहनतही करायचीच असते. केवळ गंभीर भूमिका केल्यानेच तुम्ही अभिनेता म्हणून ओळखले जाता असे काही नाही. माझ्या धमाका या चित्रपटासाठी सुद्धा मला ‘भूल भुलैया 2’ प्रमाणेच मेहनत आणि लक्ष द्यावे लागले होते. आम्हाला आमच्या प्रत्येक चित्रपटात १०० टक्के द्यायचे असते. त्यामुळे प्रेक्षकांनीही दोन्ही प्रकारच्या भूमिकांना समान प्राधान्य द्यावे. पुढे येत्या काळात तुम्ही मला वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पहाल.

अनेकदा लोकांचा गैरसमज होतो की चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सहकलाकारांची नावे जोडली जातात. पण तसे नाही. प्रत्येक गोष्टही प्रमोशनसाठी नसते. आपण सगळेच माणसं आहोत. आणि माणसं ही भावनिक असतात. मला अंधाराची भीती वाटते. जेव्हा मी शूटींगसाठी बाहेर असतो. तेव्हा हॉटेलच्या रुममध्ये एकटा असताना मी लाइट चालू ठेवूनच झोपतो. रात्री माझ्या मनात चित्रविचित्र विचार येत राहतात. मी अंधश्रद्धाळू नाही पण माझा चांगल्या वाईट उर्जेवर विश्वास आहे. सध्या मला माझ्या कामावर लक्ष केंद्रित करायचे आहे. चित्रपटसृष्टीत अनेक गोष्टी घडतात. अफवांचा बाजारही फुलतो.पण मी चांगले काम करण्यावर भर देत आहे. बाकीचेही तेच करत असतात. आपले काम प्रामाणिकपणे करा, अफवांवर लक्ष देऊ नका. मला माझ्या कुटुंबाची थोडी काळजी वाटते. जेव्हा माझ्याबद्दल काही चुकीच्या गोष्टी पसरवल्या जातात तेव्हा माझे कुटुंब नाराज असते. पण मला माहित आहे की हा देखील फिल्म इंडस्ट्रीचा एक भाग आहे, म्हणून मी त्यांना सांगतो की या सर्व गोष्टींकडे लक्ष देऊ नका.