३५ वर्षं घटस्फोटाविना विभक्त राहिल्यानंतर बबिता...

३५ वर्षं घटस्फोटाविना विभक्त राहिल्यानंतर बबिता आणि रणधीर कपूर पुन्हा एकत्र (Kareena Kapoor’s Mom, Babita Has Reunited With Husband, Randhir Kapoor After 35 Yrs Of Separation)

करिश्मा अन्‌ करीना कपूर खानचे आई-वडील बबिता आणि रणधीर कपूर हे उभयता लग्नानंतर सतरा वर्षं एकत्र राहिल्यानंतर विभक्त झाले, परंतु त्यांनी कधीही घटस्फोटासाठी अर्ज केला नाही. घटस्फोट न घेताच त्यांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान बबिताला रणधीरची आयुष्याबद्दलची बेफिकीर वृत्ती पसंत नव्हती, अशा अफवाही पसरवल्या गेल्या होत्या. रणधीर कपूरपासून दूर गेल्यानंतर बबिता यांनी आपल्या मुलींची काळजी घेतली आणि त्यांच्या अभिनय कारकिर्दीत त्या त्यांच्या आधारस्तंभ बनल्या. पण आता ३५ वर्षांनंतर रणधीर आणि बबिता कपूर पुन्हा एकत्र आले आहेत.

ई-टाइम्सने दिलेल्या ताज्या अहवालानुसार, रणधीर कपूर आणि बबिता कपूर हे त्यांच्या वांद्रे येथील नवीन घरात एकत्र राहत आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे करिश्मा आणि करीना अतिशय  आनंदी झाल्या आहेत. आपल्या पालकांच्या पुन्हा एकाच छताखाली एकत्र येण्याने त्या अतिशय खूश आहेत. अहवालात असेही म्हटले आहे की हे जोडपे गेल्या सात महिन्यांपासून एकत्र राहत आहेत.

रणधीर कपूरने बबितासोबतच्या नात्याला ‘टाइमपास’ म्हटले होते

रणधीर कपूर आणि बबिता यांची पहिली भेट १९६९ मध्ये आलेल्या ‘संगम’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. या चित्रपटाच्या माध्यमातून दोघांची एकमेकांची ओळख झाली आणि नंतर हळूहळू त्यांच्यात भेटीगाठी वाढत गेल्या. परंतु त्यावेळी रणधीर यांच्या मनात लग्नाचा कोणताच विचार नव्हता ते केवळ टाइमपास करत होते.

पण झाले उलटेच. हे प्रकरण त्यांचे वडील राज कपूर यांच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांनी थेट बाबीता यांच्याशी लग्न करण्याचा प्रस्ताव मांडला. आणि घरच्यांच्या सांगण्यावरून त्यांनी ६ नोव्हेंबर १९७१ रोजी लग्नगाठ बांधली.

लग्नानंतर त्यांना करिष्मा आणि करीना या दोन मुली झाल्या. त्यावेळी बबिता यांनी चित्रपटात काम करणं थांबवलं होतं. पुढे ८०च्या दशकात रणधीर कपूर यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकत नव्हते. त्यांचा कारकिर्दीचा आलेख खाली घसरत होता. त्यामुळे ते खूप अस्वस्थ झाले. दारूच्या आहारी गेले. याचा रणधीर यांच्या प्रकृतीवरही परिणाम होऊ लागला, अनेकदा बाजावूनही सुधारणा होत नसल्याने बबिता आणि रणधीर यांच्यात कायम खटके उडायचे आणि अखेर एक दिवस बबिता यांनी आपल्या दोन्ही मुलींना घेऊन वेगळे राहण्याचा निर्णय घेतला.

लग्नाला १७ वर्षे झालेली असताना ते वेगळे झाले पण त्यांनी आजवर घटस्फोट घेतला नाही. दोघांनी आपापल्या पद्धतीने मुलींना वाढवले, त्यांच्यावर संस्कार केले आणि अखेर आयुष्याच्या संध्याकाळी ३५ वर्षांनी त्यांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला. ३५ वर्षांनंतर रणधीर आणि बबिता यांचे पुनर्मिलन, ‘हम जब होंगे साठ साल के और तुम होगी पचपन की, बोलो प्रीत निभयोगी ना तब भी अपने बचपन की’ या गाण्याने प्रेरित आहे. तुम्हाला काय वाटते?