करीना कपूर आणि रणबीर कपूरचा भाऊ अभिनेता अरमान ज...

करीना कपूर आणि रणबीर कपूरचा भाऊ अभिनेता अरमान जैनची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडी ऑफिसमध्ये चौकशी… (Kareena Kapoor And Ranbir Kapoor Cousin Actor Armaan Jain Arrives At ED Office In Connection To Money Laundering Case)

करीना कपूर आणि रणबीर कपूर यांचा चुलत भाऊ अरमान जैन मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशीसाठी ईडी ऑफिसमधे पोहोचला आहे. ईडीने त्याला लॉन्ड्रिंग प्रकरणात दुस-यांदा समन्स बजावले आहे. अरमानला यापूर्वीही चौकशीसाठी बोलवण्यात आले होते, मात्र तो हजर झाला नव्हता. काय आहे हे संपूर्ण प्रकरण?

अरमान जैनवर का लावला गेला मनी लॉन्ड्रिंगचा आरोप…

ईडीने ज्या दिवशी अरमानच्या घरावर छापा टाकला होता, त्याच दिवशी त्यांना काही कागदपत्रे मिळाली होती. त्यामुळे ११ फेब्रुवारीला अरमानला समन्स बजावून त्याला सकाळी १० वाजता चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. परंतु अरमान वैयक्तिक कारणास्तव उपस्थित झाला नाही. त्यामुळे त्याला पुन्हा समन्स बजावण्यात आले. अरमान हा राज कपूर यांच्या मुलीचा मुलगा आहे. तो बॉलिवूड सेलिब्रिटी रणबीर कपूरचा आत्येभाऊ आहे. ज्यादिवशी ईडीने अरमानच्या घरावर छापा टाकला होता, त्याचदिवशी त्याचे मामा राजीव कपूर यांच्या निधनाचे वृत्त आले होते. त्यामुळे ईडीने आपली कार्यवाही थांबवली होती. आज अरमान ईडीच्या मुंबईतील ऑफिसमध्ये पोहोचला आहे.

ईडीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात त्याचे नाव शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग याच्याशी असलेल्या मैत्रीमुळे समोर आले आहे. या प्रकरणात विहंगची दोनदा चौकशी झाली आहे. प्रताप सरनाईक यांच्या सिक्युरिटी गार्ड कंपनी टॉप्स ग्रुपच्या विरोधात एका मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणामध्ये टॉप ग्रुप कंपनीचे प्रमोटर आणि सरनाईक यांचे जवळचे संबंधी अमित चंदोले यांना आधीच अटक करण्यात आली आहे.
अरमान जैनच्या फिल्मी करिअरबद्दल बोलायचं तर तो राज कपूर यांची बहीण रीमा जैन आणि मनोज जैन यांचा मुलगा, करीना कपूर व रणबीर कपूर यांचा चूलत भाऊ आहे. अरमानने ‘लेकर हम दीवाना दिल’ या चित्रपटामध्ये मुख्य नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. हा सिनेमा अपयशी ठरला. त्यानंतर त्याने ‘स्टूडंट ऑफ द इअर’ , ‘माय नेम इज खान’ इत्यादी चित्रपटांमध्ये असिस्टंट म्हणूनही काम केले होते.

मागच्याच वर्षी अरमान जैनचे अनीषा मल्होत्रा सोबत लग्न झाले आहे. कपूर परिवाराच्या खास फंक्शनच्या फोटोमध्ये तुम्ही अरमानला पाहिले असणार.

अभिनेता अरमान जैनवर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जे आरोप लावले गेले आहेत, त्याबद्दल तु्मचे काय मत आहे ते आम्हाला जरूर कळवा.