महिला दिनाच्या निमित्ताने करीना, अजय देवगण, विक...

महिला दिनाच्या निमित्ताने करीना, अजय देवगण, विकी जैन यांनी शेअर केले खास संदेश (kareena Kapoor, Ajay Devgan, Vicky Jain’s Special Post On Women’s Day)

8 मार्च रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. महिलांचे कर्तृत्व आणि सामर्थ्याचा सन्मान करण्याचा हा दिवस. या दिवशी वेगवेगळ्या महिला विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच, आजच्या दिवशी प्रत्येकजण आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या महिलांना शुभेच्छा आणि भेटवस्तू देतात. त्यांचे आभार मानण्याचा हा एक लहानसा प्रयत्न असतो. आज या दिवसाच्या निमित्ताने बॉलिवूड कलाकारही मेसेज देत आहेत.  

फॅशन आयकॉन, बॉलिवूड दिवा करीना कपूर खानने महिला दिनाच्या एक दिवस आधीच इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता, ज्यात तिने एक महिला म्हणून तिचा प्रवास सांगितला आहे. करीना कपूरने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून ब्रँडेड ब्लॅक स्पोर्ट्स वेअरमधील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत, स्पोर्ट्स ब्रासह काळी ट्रॅक पॅंट आणि बीन कलर जॅकेट परिधान करून करीना खूपच स्टायलिश दिसत आहे.

हा फोटो पोस्ट करत करीनाने एक स्त्री म्हणून तिच्या आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांचा उल्लेख करत लिहिले आहे की, “मग ते गुंतलेल्या केसांसारखे दिवस असोत किंवा ग्लॅमअप आउटिंग असो, झिरो साइज ते साइज १६ असो, मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक टप्पा व्यवस्थित जगले आहे. त्याचा मनमुराद आनंद घेतला आहे. माझ्या गर्भधारणेदरम्यान, २५ किलो वाढवले, परंतु मी माझ्या आवडत्या कामांमध्ये कधीही व्यत्यय येऊ दिला नाही. मला आठवते की, मी ८ महिन्यांची गरोदर असताना फोटोशूट केले होते आणि खूप मजा केली होती… स्वतःमध्ये आत्मविश्वास असणे आणि माझा बेबी बंप फ्लाँट करणे ही माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, त्यामुळे हे वाचणाऱ्या सर्व मुलींसाठी… हे तुमचे जीवन आहे आणि तुमचे निर्णय महत्त्वाचे… नेहमी.’’

करीनाच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देताना सैफ अली खानची बहीण सबा पतौडीने ‘प्रेरणादायी व्यक्तिमत्व’ असे लिहिले आहे. तर मलायका अरोराची बहीण आणि अभिनेत्री अमृता अरोरा हिनेही करिनाच्या या फोटोवर कमेंट करत तिचे कौतुक केले आहे. करीना कपूरने प्रेग्नेंसी दरम्यानच्या तिच्या प्रवासाबद्दल ‘प्रेग्नन्सी बायबल’ या नावाचे एक पुस्तकही लिहिले आहे,. ज्यात तिने आई झाल्यानंतर महिलेच्या शरीरात आणि आयुष्यात होणाऱ्या बदलांबद्दल लिहिले आहे.

बॉलीवूड अभिनेता अजय देवगणनेही महिला दिनानिमित्त एक खास संदेश शेअर केला असून, या संदेशाबद्दल सोशल मीडियावर त्याचे कौतुकही होत आहे. या संदेशाद्वारे त्यांनी आपल्या कुटुंबातील महिलांना आदर दिला आहे.

अजयने आपल्या मेसेजमध्ये लिहिलंय – वीणाचा मुलगा, कविता आणि नीलमचा भाऊ, काजोलचा नवरा, न्यासाचे बाबा. अजय देवगणचा हा छोटा पण मोठा आशय असलेला संदेश सर्वत्र व्हायरल होत आहे.

सध्या अजय देवगणचा ओटीटीपासून ते थिएटर्सपर्यंत दबदबा आहे. नुकताच त्याचा ‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये तो कॅमिओमध्ये दिसला होता. इतकेच नाही तर त्याची ‘रुद्र: द एज ऑफ डार्कनेस’ ही वेबसिरीज ओटीटीवर प्रदर्शित झाली आहे. या वेब सीरिजला चांगलीच पसंती मिळत आहे आणि त्याच्या अभिनयाचेही खूप कौतुक होत आहे.

अभिनेत्री अंकिता लोखंडेचा पती विकी जैन यानेही अंकिताला महिला दिनानिमित्त एक खास भेट वस्तू दिली आहे.  अंकिताने एक व्हिडीओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तिचा पती विकी जैनसुद्धा पाहायला मिळत आहे. महिला दिनाच्या निमित्ताने विकीने अंकिताला एक खास भेट दिली आहे. विकीने स्वतः व्हिडीओमध्ये याबाबत खुलासा केला आहे. तो म्हणाला की, प्रत्येक नवऱ्याने आज आपल्या बायकोला ही भेटवस्तू द्यायलाच हवी आणि ती भेट म्हणजे शांत बसणे.

विकी अंकिताला भेट म्हणून आजचा पूर्ण दिवस शांत बसणार आहे. त्यासोबत ती जे काही सांगेल ते तो मुकाट्याने ऐकणार आहे. हेच तिच्यासाठी गिफ्ट असल्याचं त्याने या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे. इतकंच नाही, तर प्रत्येक नवऱ्याने वर्षातून एकदा तरी हे गिफ्ट आपल्या बायकोला द्यायलाच हवं, असाही सल्ला त्याने इतर पुरुषांना दिला आहे. विकीने अंकितासोबतच सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.