‘कॉफी विथ करण’च्या गिफ्ट हॅम्परमध्ये नक्की काय ...

‘कॉफी विथ करण’च्या गिफ्ट हॅम्परमध्ये नक्की काय असते? (Karan Johar Reveal About Koffee With Karan Gift Hamper What Is In It)

दिग्दर्शक, निर्माता करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ (Koffee With Karan) हा चॅट शो नेहमीच चर्चेत असतो. या शोद्वारे बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अनेक गुपिते बाहेर पडतात. गेली १८ वर्षे हा शो सुरु आहे व सध्या या शोचा ७ वा सीझन डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रसारित होतो. करण जोहरच्या या शोमधून अनेक सेलिब्रेटींची वैयक्तीक आणि खासगी गुपितं उघड होतात. तसंच हा शो इतरही वेगवेगळ्या कारणांनी सोशल मीडियावर चर्चेत राहिला आहे. पण या शोबद्दल दोन गोष्टी सर्वाधिक चर्चेत असतात ते म्हणजे शोचा ‘रॅपिड फायर राउंड’ आणि दुसरं म्हणजे रॅपिड फायर जिंकल्यानंतर मिळणारं गिफ्ट हॅम्पर. हे हॅम्पर जिंकण्यासाठी सेलिब्रेटी शोमध्ये भांडताना आणि अतिशय मजेशीर उत्तरे देताना दिसतात. पण या हॅम्परमध्ये नक्की काय असतं याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.

‘कॉफी विथ करण’चे स्वरूप प्रत्येक सिझननुसार बदलतं. पण एक सेगमेंट असा आहे जो सुरुवातीपासून आहे तसाच राहिला आहे, तो म्हणजे रॅपिड फायर. या सेगमेंटमध्ये, करण जोहर स्टार्सना प्रश्न विचारतो, ज्याची पटापट उत्तरे द्यावी लागतात. या फेरीतील विजेत्याला एक खास असा हॅम्पर मिळतो. गेली अनेक वर्षे शोमध्ये दिलं जाणारं हे गिफ्ट हॅम्पर अनेकांसाठी कुतुहलाचा विषय आहे. कारण कोट्यवधीची संपत्ती असलेल्या कलाकारांनाही याचा मोह आवरता येत नाही. आता ७ व्या सीझनमध्ये पहिल्यांदाच करण जोहरने एक व्हिडिओ शेअर करत या हॅम्परमध्ये दिल्या जाणाऱ्या गोष्टींविषयीचा खुलासा केला आहे.

हिऱ्यांच्या दागिन्यांपासून ते खव्याच्या मिठाईपर्यंत अनेक वस्तू या हॅम्परमध्ये दिल्या जातात. सीझन ७ च्या हॅम्परमध्ये करण जोहरचा ज्वेलरी ब्रँड त्यानी ज्वेलरी, मार्शल एक्टन II स्पीकर्स, ऑडी एस्प्रेसो मोबाइल, अमेझॉन इको शो १०, वाहदम टी अँड टी मेकर सेट, न्यूहॉस चॉकलेट्स कलेक्शन डिस्कवरी बॉक्स, बॉम्बे स्वीट शॉप, खोया स्वीट, २८ बेकर स्ट्रीट, कॉफी विथ करणचा कॉफी कप अशी जवळपास पाच लाखांहून अधिक किमतीची गिफ्ट्‌स सेलिब्रिटींना दिली जातात. एवढेच नव्हे तर करणने असेही सांगितले की, या गिफ्ट हॅम्परमध्ये अशा काही गोष्टी आहेत, ज्यांचे उघडपणे ब्रँडिंग करता येत नाही, त्यामुळे त्या दाखवल्या गेल्या नाहीत. याशिवाय, विजेत्यांना एक मिस्ट्री हॅम्पर देखील दिला जातो, ज्यामधील गोष्टी या गुप्त ठेवल्या जातात.

दरम्यान ‘कॉफी विथ करण’च्या सातव्या सीझनबद्दल बोलायचं तर या सीझनमध्ये रणवीर सिंह, आलिया भट्ट, कतरीना कैफ, सिद्धार्थ मल्होत्रा, विक्की कौशल, सारा अली खान, जान्हवी कपूर, अनन्या पांडे, सामंथा रुथ प्रभू, अक्षय कुमार, कियारा आडवाणी, शाहिद कपूर यांनी सहभाग घेतला होता. या कलाकारांचे एपिसोड यंदा बरेच गाजले होते.