करण जोहरचा ट्विटरला रामराम, शेवटचे ट्विट करत स्...

करण जोहरचा ट्विटरला रामराम, शेवटचे ट्विट करत स्वत: सांगितले कारण(Karan Johar Deleted His Twitter Account, The Reason Given By Tweeting Himself)

बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर नेहमीच ट्रोलर्सच्या निशाण्यावर असतो. मुद्दा कोणताही असो, करणचे नाव नेहमीच कोणत्या ना कोणत्या मार्गाने समोर येते. सोशल मीडियावर दररोज प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीसाठी त्याला टीकेची शिकार व्हावे लागते. सततच्या ट्रोलिंगला कंटाळून करणने आपले ट्विटर अकाउंट बंद केले आहे. खुद्द करणनेच ट्विट करून ही माहिती दिली.

शेवटचे ट्विट करून आपण ट्विटर का बंद करत आहोत याची माहिती करणने दिली. त्याने ट्विटमध्ये लिहिले, “मी सकारात्मक उर्जेसाठी जागा तयार करत आहे. त्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल आहे. गुडबाय ट्विटर.” करण जोहरने हे ट्विट करताच युजर्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. त्यापैकी काही युजर्सनी करणला ट्विटर न सोडण्याचा सल्ला दिला. तर दुसरीकडे अनेकांनी करणच्या या निर्णयाला योग्य ठरवले आहे. सोशल मीडियावर युजर्स सतत करणला ट्रोल करत असतात. या ट्रोलिंगला कंटाळून करणने ट्विटर बंद केले आहे.

अलीकडेच करण जोहरने ट्रोलिंगबाबत आपले मत मांडले. त्याने सांगितले की, काही वर्षांपूर्वी मी ट्रोलिंगमुळे डिप्रेशनचा शिकार झालो होतो, त्यातून बाहेर पडण्यासाठी मला औषधाची मदत घ्यावी लागली होती. एवढेच नाही तर मला खूप मानसिक छळही सहन करावा लागला होता. सोशल मीडियावर मला सतत टार्गेट केले जात असते.

बॉलिवूड हंगामा या सुप्रसिद्ध वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत करण जोहरने ट्रोलिंगबद्दल खुलेपणाने सांगितले. करणच्या मते, प्रत्येकाचे मत वेगळे असू शकते. टीका करणे चुकीचे नाही. परंतु काही लोक गंभीर झाल्यानंतर नकारात्मक होतात. या दरम्यानच्या सीमा निश्चित केल्या पाहिजेत. चित्रपट फ्लॉप झाल्यावर इंडस्ट्रीतील काही लोक सेलिब्रेशन करतात. ही चांगली गोष्ट नाही. सोशल मीडियावर चित्रपटांबाबत सतत ट्रोल होत असते.

करण जोहरच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर लवकरच त्याचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंह आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत पाहायला मिळतील.