बॉलिवूड दिग्दर्शक-निर्माता करण जोहरची पन्नाशी ...

बॉलिवूड दिग्दर्शक-निर्माता करण जोहरची पन्नाशी (Karan Johar 50th Birthday)

कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम, कभी अलविदा ना कहना हे चित्रपट प्रदर्शित होऊन आज बरीच वर्षे झाली. पण अजूनही या चित्रपटांची क्रेझ कमी झालेली नाही. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर गल्ला केलाच शिवाय आजही जे चित्रपट टेलिव्हिजनवर आवर्जून पाहिले जातात. कारण ही जादू आहे करण जोहरच्या (karan johar) दिग्दर्शनाची. करणने तयार केलेले हे रंजक सिनेमे प्रेक्षकांना आजही भुरळ घालतात. त्याच करणचा आज पन्नासावा वाढदिवस…

करण जोहर आपला ५० वा वाढदिवस खास बनवण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीय. आज तो मुंबईतील यशराज स्टुडिओमध्ये एक भव्य पार्टी आयोजित करणार असल्याची माहिती समोर आली आहे. अन्‌ करणच्या या पार्टीमध्ये मोठमोठ्या सेलेब्रेटींची रेलचेल असणार आहे.

करण जोहरने वाढदिवसापूर्वी आपल्या पार्टीच्या थीमपासून ते खाण्यापर्यंत प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टींवर विशेष लक्ष दिल्याचं सांगितलं जात आहे. पार्टीला संस्मरणीय बनवण्यासाठी या निर्मात्याने दोन सेलिब्रिटी शेफचाही समावेश केला आहे. विशेष बाब म्हणजे या दोन शेफपैकी एकाने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यासाठीही जेवण बनवलं आहे. यावरुन आपण आता पार्टीच्या भव्यतेचा अंदाज लावू शकतो.

करण जोहरने त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीत कुकिंगसाठी प्रसिद्ध शेफ मारुत सिक्का आणि हर्षा किलाचंद यांच्याशी संपर्क साधल्याची चर्चा आहे. एकंदरीतच पार्टीतचा मेन्यू फारच खास असणार हे निश्चित.

आपण नेहमीच पाहतो की बॉलिवूडच्या बड्या पार्ट्यांमध्ये विविध थीम ठेवल्या जातात. त्यामुळे करण जोहरच्या या रॉयल पार्टीची थीम काय असणार याची अनेकांना उत्सुकता आहे. तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, या पार्टीची थीम ब्लॅक अँड ब्लिंग आहे. तर बॅशचा संपूर्ण सेटअप अमृता महल यांनी डिझाइन केला आहे. अमृता महलने कलंक, ये जवानी है दिवानी, ब्रह्मास्त्र आणि रॉकी और रानी की प्रेम कहानी यांसारख्या चित्रपटांसाठी सेट तयार केले आहेत. करण जोहरच्या या खास क्षणात चित्रपटसृष्टीतील सर्व मोठे कलाकार सहभागी होतील अशी अपेक्षा केली जात आहे. दरम्यान करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीच्या पाहुण्यांच्या यादीत ‘जुग जुग जिओ’चे कलाकार अर्थात अनिल कपूर, कियारा आडवाणी, वरुण धवन, नीतू कपूर हे कलाकारही दिसणार आहेत. याशिवाय आलिया भट्ट, रणबीर कपूर, मलायका अरोरा, अर्जुन कपूर, शाहरुख खान यांसारखे स्टार्सही पार्टीत धमाल करताना दिसणार आहेत.

मालिका विश्वातून आपल्या करियरची सुरवात करणाऱ्या करणने पुढे ‘दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे’ (DDLJ) या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शन केले. पुढे त्याने ‘कुछ कुछ होता है’ (KUCH KUCH HOTA HAI) सारखा हिट सिनेमा त्याने दिला आणि त्याच्या करियरची दिशाच बदलून गेली. पुढे करणने ‘कभी खुशी कभी गम’, ‘कभी अलविदा न कहना, ‘माय नेम इज खान, ‘स्टुडंट ऑफ द इअर, ‘बॉम्बे टॉकिज’, ‘ए दिल है मुश्किल’, ‘लस्ट स्टोरीज’ सारख्या अनेक गाजलेल्या सिनेमांचं दिग्दर्शन आणि निर्मिती केली. लवकरच त्याचा ‘जुग जुग जिओ’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. त्याच्या कामाने त्याने बॉलीवुडमध्ये भक्कम पाय रोवले आहेत.

याच क्षेत्रातून आज करणने कोट्यवधी रुपये कमावले. मुंबई सारख्या ठिकाणी अलिशान बंगला, सर्व सुखसुविधा, गाड्या सर्व काही करणकडे आहे. असं म्हंटलं जातं ही करणकडे २००० कोटींहून अधिकची संपत्ती आहे. त्यामुळे तो काही महागडे शौकही आवर्जून करतो.