कपिल शर्मा फेम अभिनेत्री उपासना सिंहने मिस युनि...

कपिल शर्मा फेम अभिनेत्री उपासना सिंहने मिस युनिव्हर्स हरनाज कौर संधूला कोर्टात खेचले (Kapil Sharma Show Fame Upasana Singh Files A Case Against Miss Universe Harnaz Kaur Sandhu)

कपिल शर्मा फेम अभिनेत्री उपासना सिंह काल आपल्या वकीलांसह चंदीगढ येथील कोर्टात गेली. तिथे तिने मिस युनिव्हर्स हरनाज कौर संधू विरोधात दिवाणी खटला दाखल केला आहे.उपासना यांनी त्यांच्या मुलाला लॉन्च करण्यासाठी एक चित्रपट बनवला होता. त्यात हरनाजने मुख्य अभिनेत्रीची भूमिका केली होती.

उपासना यांचे असे म्हणणे आहे की, त्यांचा हरनाजसोबत चित्रपटाच्या प्रचार प्रसारासंबंधी एक करार झाला होता. पण हरनाज आता त्यांचा फोनही उचलत नाही. आरोपांशी संबंधित सर्व पुरावे आमच्याकडे असल्याचा दावा उपासना यांनी केला आहे. यासंबंधी त्या लवकरच हरनाजला नोटीस पाठवणार आहेत.

उपासना सिंहने सांगितले की , मी एक स्टुडिओ चालवते. मी ‘बाई जी कुटणगें’ हा पंजाबी चित्रपट दिग्दर्शित केला आहे.२०२० मध्ये जेव्हा हरनाजने फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकला होता तेव्हा आम्ही आमच्या चित्रपटातील प्रमुख भूमिकेसाठी हरनाजला साईन केले होते. त्या करारानुसार चित्रपट पूर्ण झाल्यावर त्याच्या प्रचार प्रसारासाठी हरनाजला उपस्थित राहायचे होते. पण २०२१ मध्ये ती मिस युनिव्हर्स झाली आणि तिने आमच्या चित्रपटासोबत केलेला करार तोडला आणि ती चित्रपटाच्या कास्ट आणि क्रू पासून वेगळी झाली. जेव्हा मी तिला फोन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने माझे फोनही उचलले नाहीत.

उपासना यांनी पुढे सांगितले की, हरनाजच्या अशा वागण्यामुळे आमचे खूप मोठे आर्थिक नुकसान तर झालेच पण त्याचसोबत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही निघून गेली आहे. सुरुवातीला हा चित्रपट २७ मे ला प्रदर्शित होणार होता पण तो आता १९ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे.

उपासना यांनी त्यांची नाराजी व्यक्त करत म्हटले की, पंजाबी चित्रपटाचा भाग होणे अभिमानास्पद आहे पण मिस युनिव्हर्स झाल्यावर नखरे करणे योग्य नाही. जेव्हापासून ती मिस युनिव्हर्स झाली आहे तेव्हापासून ती स्वत:ला पंजाबी सिनेसृष्टीपेक्षा श्रेष्ठ मानायला लागली आहे.

जेव्हा ती एक स्ट्रगलर होती तेव्हापासून ती माझ्या संपर्कात होती. मी तिला अभिनय कसा करतात ते शिकवले. मुंबईत ती माझ्याच घरी राहायची. तिला ट्रेनिंगसाठी माझा मुलगा घेऊन जायचा पण आता ती ते सगळं विसरली आहे.