लग्नाआधी क्रिकेटवीर कपिल देव, या नटीच्या प्रेमा...

लग्नाआधी क्रिकेटवीर कपिल देव, या नटीच्या प्रेमात पडला होता. रोमी भाटियाशी त्याने नंतर लग्न केले (kapil Dev Was In Love With This Actress Before Marriage : But After Break-up Tied The knot With Romi Bhatia)

रणवीर सिंहची प्रमुख भूमिका असलेल्या ‘८३’ या चित्रपटाचे ट्रेलर प्रसिद्ध करण्यात आले आहे. हा चित्रपट क्रिकेटवीर कपिल देवच्या जीवनावर आधारित आहे. रणवीरने त्याचे रूप घेतले आहे. तर त्याच्या बायकोची भूमिका दीपिका पादुकोणने केली आहे. कपिल देवचे चाहते या चित्रपटाची वाट पाहत आहेत. या निमित्ताने कपिल देवच्या उमेदीच्या काळात घडलेले प्रेमप्रकरण आठवते आहे. तो कोणत्या नटीच्या प्रेमात पडला होता. नंतर रोमी भाटियाशी त्याचे लग्न कसे झाले, ते पाहूयात.

क्रिकेट विश्वात कपिल देव खूपच शिखरावर होता. अन्‌ त्याची प्रेमकहाणी तशीच रोमांचक आहे. अगदी एखाद्या चित्रपट कथेसारखी.

रोमी भाटियाशी लग्न करण्यापूर्वी कपिल देव, अभिनेत्री सारिकाच्या प्रेमात पडला होता. कळलेल्या माहितीनुसार, मनोज कुमारच्या बायकोमुळे या दोघांची ओळख झाली. पहिल्या भेटीतच कपिलला सारिका आवडली होती. नंतर त्यांच्या गाठीभेटी वाढल्या. आपण एकमेकांना आवडू लागलो आहोत, हे हळूहळू दोघांच्याही लक्षात आलं.

कपिल – सारिका यांच्या जवळिकीच्या चर्चा झडू लागल्या. त्यांच्या संबंधांच्या बातम्या प्रसिद्धी माध्यमात नित्य येऊ लागल्या. एका वृत्तानुसार कपिल देवने आपल्या आईबाबांकडे सारिकाला नेले होते.

कपिल देव आणि सारिका यांचे संबंध मधुर झाले होते. दोघे लग्नाच्या तयारीत होते. अचानक त्यांच्यामध्ये बेबनाव झाल्याचे वृत्त आले. या संबंधात त्या दोघांनी जाहीरपणे काहीच निवेदन केलं नाही. पण रोमी भाटियामुळे हा बेबनाव झाल्याचे सांगितले गेले.

दुसऱ्या एका वृत्तानुसार सारिकाच्या आधीच रोमी भाटिया, कपिलच्या जीवनात आली होती. पण काही कारणांनी त्यांचे भांडण झाले. म्हणून कपिलने सारिकाशी जवळीक साधली. पुढे कपिलच्या जीवनात पुन्हा रोमीने प्रवेश केला. रोमीच्या सौंदर्यावर कपिल आधीच भाळला होता. म्हणून मग सारिकाला सोडून त्याने रोमीची कास धरली. रोमीशी लग्न करायला कपिलला बरेच सायास पडले. पण अखेर गंगेत घोडं न्हालं. सारिकाने नंतर कमल हसनशी लग्न केलं. या दोघांचा संसार नंतर मोडला, ही गोष्ट अलाहिदा.