कंगना रणौतच्या अंगरक्षकावर बलात्काराचा आरोप : ...

कंगना रणौतच्या अंगरक्षकावर बलात्काराचा आरोप : लग्नाचे आमिष दाखवून केले हे कृत्य (Kangana Ranaut’s Bodyguard Accused Of Rape : Had Forcible Physical Relationship Under The Pretext Of Marriage)

बिनधास्त आणि बेधडक विधाने करून वाद ओढवून घेण्याबाबत कंगना रणौतची ख्याती आहे. त्यामुळे ती चांगलीच चर्चेत राहते. आता पुन्हा ती चर्चेत आली आहे. पण या खेपेस वादग्रस्त विधानांवरून ती चर्चेत आलेली नाही. तर वेगळ्याच कारणांनी आली आहे. कंगनाचा खासगी अंगरक्षक कुमार हेगडे याच्यावर एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप झाला आहे. अन्‌ या प्रकरणात त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात एफ.आय.आर. दाखल करण्यात आला आहे. हा सनसनाटी आरोप एका महिलेने या हेगडेवर लावला आहे.

कोविडच्या विळख्यातून सुटल्यानंतर कंगना सध्या आपल्या कुटुंबियांसह मनालीमध्ये राहते आहे. अन्‌ लांब राहूनसुद्धा या अंगरक्षकाच्या भानगडीमुळे चर्चेत आली आहे.

हाती लागलेल्या वृत्तानुसार ३० वर्षे वयाच्या या ब्युटीशियन असलेल्या महिलेने अंगरक्षक कुमार हेगडेवर असा आरोप लावला आहे की, त्याने लग्न करण्याचे आमिष दाखवून आपल्यावर बलात्कार केला आहे.

एकदा शूटिंगच्या निमित्ताने आपली हेगडेशी भेट झाली, असे त्या महिलेने सांगितले. तिने केलेल्या तक्रारीनुसार या कुमार हेगडेने तिला लग्नाची मागणी घातली. त्यानंतर दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले. आपण हेगडेच्या सांगण्यावरून या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिलो, कारण तो लग्न करील अशी अपेक्षा होती. महिलेने आपल्या तक्रारीत असंही म्हटलं आहे की, तिने शारीरिक संबंधास नकार दिला. तरीपण हेगडेने ते ठेवण्यास भाग पाडले.

आपल्या आईची तब्येत बरी नसल्याने गावी जावे लागेल, असं सांगून कुमार हेगडेने तिच्याकडून ५० हजार रुपये उधार घेतले, असाही या पीडित महिलेने त्याच्यावर आरोप केला आहे. तेव्हापासून तो गायब आहे. महिलेच्या म्हणण्यानुसार कुमार हेगडेच्या आईने तिच्याशी संपर्क साधून, आपल्या मुलापासून दूर राहण्याची धमकी दिली आणि लग्नाबाबत आग्रह धरू नकोस, असेही सांगितले. तो लग्न करणार आहे, असंही तिने सांगितले. ५० हजार रुपये घेऊन हेगडे कर्नाटकात गेला आहे, असं सदर महिलेचं म्हणणं आहे.

दरम्यान मुंबई पोलिसांनी ३७६, ३७७ आणि ४२० या कलमांच्या आधारे तक्रार दाखल केली असून या प्रकरणाची चौकशी आरंभली आहे.