गुन्हा दाखल झाला तरी कंगना राणावतने, हाती वाईनच...

गुन्हा दाखल झाला तरी कंगना राणावतने, हाती वाईनचा ग्लास घेऊन दिले सडेतोड उत्तर (Kangana Ranaut Shares Bold Reaction, Holding A Glass Of Wine Against FIR Filed)

आपल्या बेबंद वक्तव्याबाबत कुप्रसिद्धी मिळविणारी कंगना राणावत कायमच निंदकांचे लक्ष्य ठरली आहे. आता तिने असेच बेछूट वक्तव्य करून वाद ओढवून घेतला आहे. त्यावरून शीख समुदायाच्या भावना दुखावल्या, असा आरोप तिच्यावर लावला गेला आहे. आणि मुंबई मध्ये तिच्याविरुध्द एकापाठोपाठ एक एफ.आय.आर. दाखल केले आहेत.
परंतु या कारवाईकडे दुर्लक्ष करत कंगनाने प्रत्युत्तर दिले आहे की, आपल्याला काहीही फरक पडत नाही.

शीख समुदायाच्या विरोधात काही आक्षेपार्ह आणि अपमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप लावत तिच्याविरुध्द तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यावर आपल्या इन्स्टाग्राम हॅन्डल वर तिने बिनधास्त उत्तर दिले आहे. कंगना राणावतने आपल्या इन्स्टाग्राम हॅन्डलवर एक अतिशय बोल्ड छायाचित्र प्रकाशित केलं आहे. त्यामध्ये हातात वाईनचा ग्लास घेऊन तिने अतिशय बोल्ड आणि हॉट पोज दिली आहे. त्यावर ओळी दिल्या आहेत –
‘आणखी एक दिवस. आणखी एक एफ.आय.आर. मला जर ते अटक करायला येतील तर माझा मूड असा राहील’.

आपल्याला स्वातंत्र्य भिकेत मिळालं आहे, असं स्फोटक विधान काही दिवसांपूर्वी करून कंगनाने खळबळ माजवली होती. आता कृषी विषयक कायदे रद्द केल्याचा निषेध करत, शीख समुदायाविरुध्द वक्तव्य करून तिने नवी कारवाई स्वतःवर ओढवून घेतली आहे.