कंगना रणौत ट्रॅक्टर रॅलीवर भडकली… (Kangan...

कंगना रणौत ट्रॅक्टर रॅलीवर भडकली… (Kangana Ranaut Reacts On Tractor Rally; Also Attack Against Diljit Dosanjh and Priyanka Chopra)

चिखलात दगड मारून आपल्या अंगावर शिंतोडे उडवून घेण्याची कंगना रणौतची खोड काही जात नाही. जिथे कुठे चुकीचं आढळतं त्याविरुद्ध आवाज उठविण्याचा छंद तिला जडला आहे. गणराज्य दिनाच्या दिवशी आंदोलनकर्त्यांनी ट्रॅक्टर रॅली काढून जो हैदोस घातला, त्याविरुद्ध कंगनाने ट्वीट करून आपला क्षोभ व्यक्त केला आहे. तिनं सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला. त्यात ती म्हणते –

“मित्रहो, आपण सगळ्यांनी पाहिलं की गणराज्य दिनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर आक्रमण करण्यात आलं आहे. तिथे खलिस्तानचा झेंडा लावण्यात आला. आज आपण जगात सगळ्यांचं प्रतिनिधीत्व करीत आहोत. करोनावर मात करून आपण इतर देशांना लस देऊन त्यांना मदत केली आहे. त्यामुळे हा खरं तर उत्सव साजरा करण्याचा दिवस होता. पण दिल्लीमध्ये घातल्या गेलेल्या हैदोसाची जी चित्रे समोर आली आहेत, त्याने सगळा देश ढवळून निघाला आहे. स्वतःला शेतकरी म्हणवून घेणाऱ्या दहशतवाद्यांना उघडपणे पाठिंबा दिला जात आहे. सगळ्यांसमोर हा तमाशा चालला आहे. संपूर्ण जगात आपण हास्यास्पद ठरत आहोत. हे सगळं असंच चाललं तर आपल्या देशाचं काही खरं नाही. या तथाकथित शेतकरी आंदोलनास जो कुणी पाठिंबा देत असेल, त्या सगळ्यांना तुरुंगात टाका. आपला देश, सरकार, सुप्रीम कोर्ट सगळे जण हास्यास्पद ठरत आहेत.”

शेतकरी आंदोलनाच्या आड हा जो काही उपद्रव निर्माण करण्यात आला, त्यावर कंगनाने जहाल टीका केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवर ट्वीट करत तिने प्रियंका चोप्रा आणि दिलजीत दोसांझ यांना चांगलंच फैलावर घेतलं आहे. ती लिहिते, ”प्रियंका व दिलजीत, या प्रकरणावर तुम्ही स्पष्टीकरण देण्याची गरज आहे. सर्व जग आम्हाला हसत आहे. तुम्हा लोकांना हेच पाहिजे होतं ना! मुबारक हो!”

कंगनाने आणखी एका ट्‌विटमध्ये लिहिलं आहे की, “माझे ६ करार कॅन्सल करण्यात आले आहेत. यापैकी काही मी आधीच करारबद्ध केले होते अन्‌ काही पूर्ण करणार होते. मी शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटलं म्हणून हे करार परत घेत आहोत, असं मला सांगण्यात आलं आहे. आता तर मी म्हणेन की, जो माणूस या आंदोलनास पाठिंबा देत आहे, तो दहशतवादी आहे.”