नेहमीच ट्रोलर्सची नाराजी ओढवून घेणाऱ्या कंगणा र...

नेहमीच ट्रोलर्सची नाराजी ओढवून घेणाऱ्या कंगणा रनौतने असं काम केलं की, लोक तिची तारीफ करू लागले… (Kangana Ranaut Planted Trees, Gets Praised By People)

आपल्या बेफाम आणि बेधडक विधानांनी कंगना रणौत नेहमीच लोकांची नाराजी ओढवून घेते. पण नुकतंच तिनं असं चांगलं काम केलं आहे की, हेच लोक तिची तोंड भरून तारीफ करत आहेत. तिनं आपल्या सोशल अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये ती झाडे लावताना दिसत आहे. आपण २० नवीन झाडे लावली असल्याचं तिनं म्हटलं आहे.

झाडांची लागवड करत असतानाच कंगनाने मुंबई महानगरपालिका आणि गुजरात पर्यटन विभागाला उपदेश केला आहे. फोटोंसोबत तिनं एक लांबलचक पत्र लिहिलं आहे, त्यामध्ये सरकारने जास्तीत जास्त झाडे लावावीत, असा सल्ला तिने दिला आहे.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

फोटोंसोबत कंगनाने लिहिलं आहे – ”आज मी २० झाडे लावलीत. आपण निसर्गाकडून सदैव काही तरी घेत असतो, पण पृथ्वीला आपण काय देतो, ते पाहायला पाहिजे ना! नुकत्याच झालेल्या वादळाने मुंबईतील जवळपास ७० टक्के झाडांचं नुकसान झालं आहे. अन्‌ गुजरातमध्ये ५० हजारांहून अधिक झाडांचं नुकसान झालेलं आहे. म्हणजे हे वृक्ष उन्मळून पडले आहेत. अशी ही झाडे उगवायला कितीतरी वर्षे लागली. प्रत्येक वर्षी आपण झाडे कशी गमावणार? झाडांची निगा कोण राखणार? आपल्या शहराचे जंगलात होत असलेले रुपांतर कसं थांबवणार? आपण देशासाठी काय करत आहोत? हा प्रश्न स्वतःलाच विचारला पाहिजे.”

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

कंगणा रणौतच्या या पत्रावर लोकांच्या जबरदस्त प्रतिक्रिया येत आहेत. काही लोक कंगनाची तारीफ करत आहेत, तर काही जण म्हणताहेत, हा कंगनाचा नवा ड्रामा आहे. त्या पत्रात कंगना लिहिते, ”मुंबई महानगरपालिका आणि गुजरातच्या पर्यटन विभागाला मी आव्हान करते आहे की, पिंपळ-वड – आणि कडुनिंबाची झाडे लावा. या झाडांचे औषधी उपयोग आहेत. ते हवा शुद्ध करतात आणि मोठ्या प्रमणात ऑक्सिजन मिळवून देतात… आपल्या शहराच्या रक्षणासाठी आपण झाडे वाचवली पाहिजेत. स्वतःला वाचविण्याचा हा उत्तम उपाय आहे.”

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

अलिकडेच कंगना, करोनाच्या विळख्यातून मुक्त झाली आहे. आणि ती मनालीच्या आपल्या घरी विश्रांती घेत आहे. पर्यावरणाच्या मुद्यावर यापूर्वी देखील तिने लोकांना जागृत केले आहे… एरव्ही आपल्या सोशल मेसेजवरून ट्रोल होणारी कंगना, या खेपेला मात्र लोकांच्या प्रशंसेस पात्र ठरली आहे.