कंगनाने लहानपणीही साकारली आहे सीतेची भूमिका… (K...

कंगनाने लहानपणीही साकारली आहे सीतेची भूमिका… (Kangana Ranaut Has Played The Role Of ‘Sita’ Before Too, Shares Photo)

गेल्या काही दिवसांपासून ‘सीता द इनकार्नेशन’ या सिनेमाची खूपच चर्चा आहे. अलौकिक देसाई दिग्दर्शित करत असलेल्या या सिनेमात देवी सीता ही भूमिका बॉलिवूडमधील अभिनेत्री कंगना रणौत साकारणार आहे. सिनेमाच्या निर्मात्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. कंगना सीता मातेची भूमिका पहिल्यांदाच साकारणार नसून तिने लहानपणीही सीता मातेची भूमिका साकारली असल्याचे सोशल मीडियावरून सांगितले आहे.

Kangana Ranaut, Sita

कंगनाने इन्स्टाग्राम स्टोरीवर तिचा जुना फोटो प्रदर्शित केला आहे. हा फोटो तिच्या शाळेतील असून, तिने रामायण नाटकात भाग घेतला असतानाचा आहे. या नाटकात कंगनाने सीतेची भूमिका केली होती. हा फोटो प्रदर्शित करून कंगना लिहितेय की, ‘मी १२ वर्षांची असताना शाळेमध्ये सीतेची भूमिका केली होती. हा… हा… सितारामचंद्र की जय.’ या फोटोत कंगनाने लाल रंगाची साडी नेसली असून दागिनेही घातले आहेत. या फोटोत लहानगी सीता सुंदर दिसते आहे.

Kangana Ranaut, Sita

खरं म्हणजे कंगनाचा हा फोटो तिची बहिण रंगोलीने देखील या आधी शे्अर केला होता. लॉकडाऊन दरम्यान दूरदर्शनवर रामायण पुन्हा प्रसारित केले जात होते. त्यावेळेस रंगोलीने म्हटलं होतं की या नाटकात मेकअप, वेशभुषा आणि दिग्दर्शनही कंगनानेच केलं होतं. आणि तयार झाल्यानंतर कंगनाला तिच्या वडिलांकडून बराच ओरडा पडला होता. परंतु त्याकडे लक्ष न देता तिने सीतेची भूमिका केली होती. अन्‌ आताही करीना आणि दीपिकासारख्या उमेदवारांस मागे सारत तिने सीतेच्या भूमिकेसाठी निर्माता-दिग्दर्शकाची पसंती मिळवली आहे. ही बातमी खुद्द तिने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या भूमिकेसाठी ती अतिशय उत्सुक असल्याचे तिने सांगितले आहे. हा सिनेमा हिंदीशिवाय तमिळ, तेलुगू,मल्याळम आणि कन्नड भाषांमध्येही रिलीज केला जाणार आहे.

Kangana Ranaut, Sita

कंगना रणौतच्या सिनेमांबद्दल सांगायचे तर गेल्याच आठवड्यामध्ये तिचा ‘थलाइवी’ हा सिनेमा रिलीज झाला आहे. या सिनेमात कंगनाने तामिळनाडू्च्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांची भूमिका साकारली आहे. याशिवाय कंगना ‘धाकड’, ‘तेजस’ या दोन सिनेमांमध्येही दिसणार आहे.