तुनिषाची आत्महत्या नव्हे तर हत्या! कंगणा रणावतन...

तुनिषाची आत्महत्या नव्हे तर हत्या! कंगणा रणावतने केला दावा, पंतप्रधान मोदींकडे केली महिलांच्या सुरक्षेची मागणी(Kangana Ranaut called Tunisha Sharma’s death a murder, Appealed PM Modi to Make Strong Law for Women Protection)

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तुनिषा शर्माच्या निधनामुळे टीव्ही इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. बॉलिवूडची क्वीन कंगना रणावत हिने २० वर्षीय तुनिषाच्या आत्महत्येप्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तुनिषाच्या आत्महत्येला एक हत्या असल्याचे सांगून कंगनाने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदे करण्याची मागणी केली आहे. अभिनेत्रीने आपल्या इन्स्टा स्टोरीवर लिहिलेल्या मोठ्या पोस्टमध्ये तुनिषा शर्माचा हॅशटॅग वापरला आहे. याला आत्महत्या न मानता खून समजावा, असे या अभिनेत्रीचे मत आहे.

कंगनाच्या म्हणण्यानुसार, अशा आत्महत्येला अनेक लोक जबाबदार असून ही हत्याच मानली पाहिजे. यासोबतच अभिनेत्रीने पीएम मोदींना बहुपत्नीत्व, अॅसिड हल्ला, महिलांचे तुकडे करणे यांसारख्या गुन्ह्यांसाठी कठोर कायदे करण्याचे आवाहन केले आहे. पोस्टमध्ये अभिनेत्रीने लिहिले की, अशा प्रकरणांमध्ये आरोपींना कोणत्याही खटल्याशिवाय त्वरित फाशीची शिक्षा देण्यात यावी.

इन्स्टा स्टोरीच्या या पोस्टमध्ये, अभिनेत्रीने लिहिले आहे- एक स्त्री प्रेम, लग्न, नाते किंवा प्रिय व्यक्ती गमावणे सहन करू शकते, परंतु आपल्या प्रेमकथेत प्रेमच नव्हते हे कधीही सहन करू शकत नाही. दुस-या माणसासाठी तिचे प्रेम आणि दुर्बलता हे शोषणाचे सोपे लक्ष्य होते. या नात्यात ती व्यक्ती तिचे शारीरिक आणि मानसिक शोषण करत होती.

जेव्हा मुलीला हे सत्य कळते, तेव्हा वास्तविकतेचा आकार बदलू लागतो, कारण नातेसंबंधातील फसवणुकीचे सत्य तिच्यासमोर खूप धक्कादायक मार्गाने येते. अशा परिस्थितीत मुलीचा प्रत्येक गोष्टीवरचा विश्वास संपतो. तिला जिवंत राहण्याचा किंवा मेल्याचा फरक समजत नाही. अशा परिस्थितीत जर तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला तर त्याला ती एकटीच जबाबदार नाही. तसेच ती आत्महत्या नसून हत्या आहे.

पुढे, अभिनेत्रीने लिहिले की बहुपत्नीत्वामध्ये देखील स्त्रीच्या इच्छेचा समावेश केला जात नाही, हा देखील कायदेशीर गुन्हा मानला पाहिजे. कोणत्याही महिलेच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्याची जबाबदारी न घेता तिचे शोषण करणे आणि नंतर कोणतेही ठोस कारण नसताना तिला सोडून देणे हाही गुन्हा मानला पाहिजे. महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदे करणे ही सरकारची जबाबदारी आहे.

शेवटी कंगनाने लिहिले की, मी माननीय पंतप्रधानांना विनंती करते की, श्रीकृष्ण ज्या प्रकारे द्रौपदीच्या रक्षणासाठी उभे होते, त्याचप्रमाणे श्रीराम माता सीतेसाठी उभे होते. त्याच प्रकारे बहुपत्नीत्व, अॅसिड हल्ला आणि महिलांची विटंबने विरुद्ध कठोर कायदे कराल अशी आमची अपेक्षा आहे.