सर्वात तरुण स्वातंत्र्य सेनानी कनकलता बरुआ (Kan...

सर्वात तरुण स्वातंत्र्य सेनानी कनकलता बरुआ (Kanakalata Barua: The Most Dynamic And Youngest Freedom Fighter)

 • अनघा शिराळकर
  भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी वयाच्या केवळ 17 व्या वर्षी बलिदान देणारी कनकलता बरुआ ही सर्वात तरुण महिला स्वातंत्र्य सेनानी होती. 22 डिसेंबर 1924 रोजी आसाममधील अविभाजित दारंग जिल्ह्यातील (सध्याचा बिस्वनाथ जिल्हा) बोरंगाबारी गावात जन्मलेली कनकलता ही कृष्णाकांता आणि कर्णेश्वरी बरुआ यांची कन्या आणि दारंगमधील प्रसिद्ध शिकारी घानाकांता बरुआ यांची नात होती. कनकलताचे पूर्वज डोलकशरिआ बरूआ हे अहोम राजाच्या राज्यातील मंत्री होते. कालांतराने डोलकशरिआ या उपाधीचा त्याग करून फक्त बरूआ हीच उपाधी ठेवली गेली. कनकलता पाच वर्षाची होती तेव्हा तिची आई मरण पावली आणि तिच्या वडिलांनी पुन्हा विवाह केला. कनकलता 13 वर्षांची असताना तिचे वडीलही मरण पावले. कनकलता फक्त इयत्ता तिसरीपर्यंतच शाळेत जाऊ शकली. घरची गरिबी असल्याने तसेच भावंडांचा सांभाळ करण्याची जबाबदारी असल्याने तिला शिक्षण सोडावे लागले.
 • स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग
  1921साली गांधीजींचे आसाममध्ये आगमन झाले आणि तेथील जनता स्वातंत्र्य लढ्यात भाग घेण्यासाठी प्रेरित झाली. 26 जानेवारी 1930 रोजी पूर्ण स्वराज्याच्या मागणीने जोर धरला. सर्वत्र भारताचा तिरंगा फडकवला जाऊ लागला. किरण बाला बोरा आणि अंबिका काकाटी यांसारख्या सामाजिक कार्यकर्त्यांपासून प्रेरणा घेऊन अनेक तरुण मुले व मुली स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले.
  ब्रिटिशांच्या जाचक कायद्यांविरुद्धचा भारतीयांचा संघर्ष शेवटच्या टप्प्यात आला होता. यामध्ये देशाच्या कानाकोपर्‍यातून अनेक स्त्रियांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा होता. 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबई इथे पार पडलेल्या एका सत्रात अखिल भारतीय काँग्रेस समितीने ‘छोडो भारत’ हा ठराव संमत केला व देशाला पूर्ण स्वातंत्र्य देण्याची मागणी केली.
 • ब्रिटिशांबद्दल प्रचंड राग व चीड
  महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या छोडो भारत या आंदोलनात देशाच्या कानाकोपर्‍यातील सर्व जाती धर्मांच्या, सर्व स्तरांतील व सर्व वयाच्या स्त्री पुरुषांनी स्वेच्छेने सक्रिय सहभाग घेतला होता. आसाममधील तेझपूर जिल्ह्यात एक मोठे शिबिर भरवले जे कनकलताच्या घरापासून 8 किलोमीटर अंतरावर होते. कनकलताने या शिबिरात जाण्याचा निश्चय केला. जाचक नियमांचा वापर करून चेनीराम दास, माहिमचंद्र, ज्योती प्रसाद आगरवाल यांसारख्या दिग्गज स्वातंत्र्यसैनिकांचा आणि सामान्य जनतेचा ब्रिटिश अधिकारी छळ करीत होते. त्यामुळे ब्रिटिशांबद्दल कनकलताच्या मनात प्रचंड राग व चीड निर्माण झाली. म्हणूनच तिने स्वातंत्र्य चळवळीत भाग घेण्याचे ठरवले. कनकलताच्या आजोबांचा याला विरोध होता कारण त्यांच्या एकुलत्या एक मुलाच्या व सुनेच्या मृत्यूने ते फार व्यथित झालेले होते. त्यांना माहीत होते की क्रांतिकारी देशभक्तीसाठी मोठा त्याग करावा लागतो. मात्र कनकलताची सावत्र आई जानकीदेवी बरूआ हिने कनकलता व तिचा भाऊ रजनीकांत यांना स्वातंत्र्य सैनिकांच्या सभांना व शिबिरांना गुप्तपणे जाण्यासाठी मदत केली.

 • करा किंवा मरा चळवळीत सहभाग
  रात्री खेड्यांमध्ये सुरक्षा व शांतता राखण्यासाठी आसाममधील काँग्रेसच्या प्रांतीय समितीने शांती वाहिनी या दलाची स्थापना केली. अनेक महिला या दलाच्या सभासद झाल्या होत्या. कनकलताही शांतिवाहिनी या दलात सामील झाली. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली करा किंवा मरा या चळवळीतही कनकलता सहभागी होती.
  स्वातंत्र्य सैनिक ज्योती प्रसाद आगरवाल हे आसामच्या गोहपूर विभागातील प्रसिद्ध सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व. ते उत्तम कवी होते. कॉम्रेड बिश्नु प्रसाद रामा यांच्या भाषणाचा आणि ज्योती प्रसाद आगरवाल यांच्या कवितांचा कनकलतावर खूप प्रभाव पडला. ज्योती प्रसाद आगरवाल यांनी स्वातंत्र्य चळवळीला बळकटी येण्यासाठी तेझपूर इथे मृत्यू वाहिनी (मृत्यू / आत्मबलिदान पथक) या दलाची स्थापना केली. मृत्यूवाहिनीचे सभासद कायम मृत्यूला सामोरे जाण्यास तयार असायचे. हा दल वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या तरुण कार्यकर्त्यांसाठी होता. कनकलताचे वय होते 17 वर्षे. पण तिच्या जिद्दीमुळे तिला अपवाद म्हणून मृत्यू वाहिनी दलात प्रवेश मिळाला व ती या दलाची सदस्य बनून काम करू लागली.
 • वीरबाला ठरली
 • देशातील विविध भागांतील प्रमुख नेत्यांच्या अटकेच्या निषेधार्थ मृत्यूवाहिनी दलाने गोहपूर पोलीस चौकीवर 20 सप्टेंबर 1942 रोजी भारताचा तिरंगा फडकावायचे ठरले. मृत्यू वाहिनी दलाने ही जबाबदारी कनकलतावर सोपवली. त्याप्रमाणे कनकलताच्या नेतृत्वाखाली निःशस्त्र ग्रामस्थांचा मोर्चा पोलीस चौकीवर गेला. राबती मोहन सोम या पोलिसचौकी प्रमुखाने मोर्च्यातील ग्रामस्थांना कडक कारवाईला तयार राहण्याचा इशारा दिला. या इशार्‍याला न घाबरता कनकलतासह ग्रामस्थांचा मोर्चा करेंगे या मरेंगे असा नारा देत पोलीस चौकीच्या दिशेने पुढे जात राहिला. ब्रिटिश पोलिसांनी मोर्च्याला रोखण्याचे खूप प्रयत्न केले. पण मोर्चा मागे हटला नाही. तेव्हा पोलिसांनी मोर्च्यावर बेछूट गोळीबार सुरू केला. यामध्ये कनकलताला गोळी लागली. अशाही अवस्थेत तिने आपल्या हातातला तिरंगा खाली जमिनीवर पडू दिला नाही. शिताफीने मुकुंदा काकाटी या महिला कार्यकर्तीने तो आपल्या हातात घेतला. पोलिसांनी तिच्यावरही गोळी झाडली. या गोळीबारात कनकलता व मुकुंदा दोघीही धारातीर्थी पडल्या. यावेळी कनकलताचे वय होते अवघे 17 वर्षे. म्हणून ती वीरबाला ठरली. अखेर मोर्च्यातील रामपति राजखोवा या क्रांतिकारकाने त्या पोलीस चौकीवर तिरंगा झेंडा फडकवलाच. अशा प्रकारे कनकलता आणि मुकुंदा या दोघींचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले नाही.
  कनकलताचे मृत्यूपूर्वीचे भावोत्कट भाषण हे अनेकांना प्रेरणादायी ठरले. ती देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणार्‍यांसाठी आदर्श उदाहरण ठरली. दिब्रुगड विद्यापीठाच्या निवृत्त प्राध्यापिका डॉ. शैला बोरा यांनी वीरबाला कनकलता बरुआ हिच्या कार्यावर एक प्रबंध (मोनोग्राफ)लिहिला आहे.