कळप (kalap – Short Story)

कळप (kalap – Short Story)

आपल्याला समाजशास्त्रात वाचायला मिळणारं एक अत्यंत कॉमन वाक्य म्हणजे, ‘माणूस हा समाजशील प्राणी आहे’ . सगळे प्राणिमात्र जसे कळपात राहतात, तसाच तोही कळपात राहतो . ‘कळप’ म्हणजे, एक अशी संस्था जिथे काही माणसे वा वन्य प्राणी एकत्र येतात. कळपात वावरण्याचे काही फायदे असल्याने प्राण्यांना म्हणजेच वन्य जीवांना त्या कळपात राहायचे असते . फायदे असे की, त्यांना त्या कळपाचा भाग असल्याने सुरक्षित वाटतं.

आपल्या दुखल्या खुपल्यात संकटात हा कळपच आपल्या बाजूने लढायला उभा राहत असतो .
म्हणजे एखादा वन्य प्राणी जेव्हा जखमी होतो, तेव्हा त्याला सांभाळायला त्याला सुरक्षा द्यायला त्याच्या कळपाचा त्याला उपयोग होतो .
पण, कळपाचा भाग असल्याने त्यायोगेच येणारे काही कळपाचे असे ‘नियम’ त्याला पाळावे लागतात . म्हणजे, शिकार एकत्रच करायची, जे काही मिळेल ते वाटून खायचं आणि कधी कधी कळपाचा भाग म्हणून काही गोष्टी अमान्य असूनही स्विकारायच्या .

सहज वाटलं, माणूसही या कळप संस्कृतीला अपवाद नाही . मानवी जीवनातही असे कौटुंबिक आणि वैचारिक कळप असतात. आपल्याशी साधर्म्य असणाऱ्या विचारांची, आचाराची माणसं आपल्याला त्या कळपात मिळणं अपेक्षित असतं. यात कळपाचा भाग होणं एखाद्याला आवडत नसलं, तरी तो ते स्विकारतो, काही वेळा फक्त त्यातील लोकांचा विरोध न पत्करण्यासाठी.  यामागे खरी भावना असते, ती Social acceptance या तत्वाची. म्हणजे ज्या गोष्टी हजार जणांना मान्य आहेत, त्यात वावगं ते काय असणार? आणि जरी ते मला वावगं वाटलं, तरी ते ऐकून कोण घेणार? जर मी त्यांना आपला मुद्दा पटवला तर हा social acceptance मी गमावून बसेन .
याला मी’ रांगा लावणे पद्धत म्हणेन ‘ म्हणजे आपल्या पुढे दहा जण उभे आहेत. म्हणून, त्या ठिकाणी उभं राहायचं मग बौद्धिक बाबतीत ते पटो वा न पटो.
याचं एक सामान्य उदाहरण म्हणजे, एखाद्या प्रोजेक्टसाठी एखाद्या स्टुडंट्सच्या ग्रुपला एक प्रेझेंटेशन करायचं असतं.  त्यात पाच मित्र वा क्लासमेट्‌स एकत्र काम करतात. बाकी चार मित्रांची मतं जरी एक असली, तरी एखाद्या मित्राला त्या प्रेझेंटेशन मध्ये चुका वा त्रुटी जाणवतात. पण इतर मित्रांच्या नाराज होण्याच्या भीतीने, तो ते मत मांडतच नाही. आणि ऐनवेळी प्रेझेंटेशन फेल जातं. सगळ्यांचेच परीक्षेतील गूण कमी होतात. तोटा सगळ्यांचाच होतो.

कळप असणं, कळपाचा भाग असणं वाईट नाही. एकत्रित निर्णय घेणं अयोग्य नाही. पण, त्या कळपात आपलं मत मांडण्याचं स्वातंत्र्य किती आहे? हे महत्वाचं . प्रत्यक्ष आयुष्यात कुठलीही गोष्ट वा मुद्दा स्विकारताना, आपल्या बुद्धीस वा मनास पटायला हवा. एकमत ओघाओघाने सजग राहून. नाहीतर त्या कळपाचे तुम्ही बळी ठरता. तुमच्या नकळत.
मुग्धा सावळे