गरोदरपणातील फोटोंवरुन ट्रोल करणाऱ्याला काजल अग्...

गरोदरपणातील फोटोंवरुन ट्रोल करणाऱ्याला काजल अग्रवालने चांगलंच फटकारलं (Kajal Aggarwal slams trolls for body shaming pregnant women, Says-we don’t need to be made uncomfortable or pressurised)

‘सिंघम’ चित्रपटातून अनेकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री म्हणजे काजल अग्रवाल सध्या तिचं गरोदरपण कुरवाळत आहे. तिने २०२०मध्ये उद्योगपती गौतम किचलूशी लग्न केले. त्यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. त्यानंतर आता काजल आणि गौतम यांनी अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या प्रेग्नंसीच्या चर्चांवर शिक्कामोर्तब करुन चाहत्यांना आपण आई-बाबा होणार असल्याचे सांगितले. परंतु त्याच वेळी काही नेटकऱ्यांनी तिला ‘बॉडीशेम’ करत ट्रोल केले आहे.

आपल्या पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी उत्सुक असलेले काजल अग्रवाल आणि पती गौतम किचलू सध्या दुबईमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहेत. तेथून काजलने आपल्या बेबी बंपचे फोटोही शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचं वजन वाढलेलं दिसत आहे, तसंच तिचा लूकही बदलेला दिसत आहे. ज्यामुळे तिला बॉडी शेमिंगला सामोरे जावे लागले आहे. अन्‌ नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागले आहे. परंतु काजलने बॉडी शेमिंगवरून टिका करणाऱ्यांसाठी पोस्टसोबत लांबलचक मजकूर लिहून त्यांची शाळा घेतली आहे.

काजलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दुबई ट्रीपचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने गरोदरपणातील बॉडी शेमिंगवरुन ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच फटकारले आहे. ‘सध्या मी माझ्या आयुष्यातील एकदम नव्या आणि आश्चर्यकारक फेजमधून जात आहे. माझ्या शरीरात होणारे बदल, माझे घर आणि माझ्या कामाच्या ठिकाणी होणारे बदल या सर्व गोष्टींना मी समोरी जात आहे. याशिवाय, काही कॉमेंट्स, बॉडी शेमिंग करणारे मेसेजेस, मीम्स खरोखरच यासाठी मदत करत नाहीत. थोड दयाळूपणे वागायला शिकूया. हे जर फार कठिण असेल तर जगा आणि जगू द्या’ या आशयाची तिने कॅप्शन दिली आहे.

काजलने असंही म्हटलं आहे की, “बाळाच्या आगमनानंतर तु्म्हाला पूर्ववत व्हायला थोडा वेळ लागतो. बाळंतपणानंतर कदाचित आपण पूर्वीसारखे कधीही दिसू शकत नाही. पण मला वाटतं ही काही फार मोठी गोष्ट नाही. ठीक आहे. बदल येतात. हे बदल नैसर्गिक आहेत. यासाठी दबाव आणण्याची गरज नाही.”

काजलच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी तिला पाठिंबा दर्शविला आहे. अभिनेत्री सामंथाने तिच्यासाठी लिहिलंय की, तू आहेस आणि कायम सुंदर राहणार.

फोटो सौजन्य – सर्व फोटो इन्स्टाग्राम