‘कभी ईद कभी दिवाली’चे नाव बदलून ‘भाईजान’ झाले :...

‘कभी ईद कभी दिवाली’चे नाव बदलून ‘भाईजान’ झाले : चित्रपटाच्या प्रदिर्घ शूटिंगसाठी सलमान खान हैदराबादला रवाना (‘Kabhi Eid Kabhi Diwali’ Title Changed To ‘Bhaijan’ : Salman Khan Proceeds For A Long Shooting Schedule At Hyderabad)

सलमानच्या ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटाचे शूटिंग नुकतेच सुरु झाले. पण शूटिंग सुरु झाल्यावरसुद्धा या चित्रपटात अनेक बदल होत आहेत. या चित्रपटाच्या कास्टिंगमधून अभिनेता आयुष शर्मा आणि जहीर इकबाल यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. आता तर या चित्रपटाचे ‘कभी ईद कभी दिवाली’ शीर्षकच बदलण्यात आले आहे.

या चित्रपटाचे नाव आता सुरुवातीला जे ठरवले तसेच ‘भाईजान’ करण्यात आले आहे. पूर्वी हा चित्रपट सलमानचे मित्र आणि दिग्दर्शक साजिद नाडियाडवाला दिग्दर्शित करणार होते, पण आता मात्र स्वत: सलमान या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी सलमान हैदराबादला रवाना झाला असून त्याचे तिथे २५ दिवसांचे शेड्यूल आहे.

यापूर्वी चित्रपटात सलमानसोबत आयुष शर्मा आणि जहीर इकबाल दिसणार होते. अभिनेता आयुष शर्मा हा सलमानची बहिण अर्पिताचा नवरा आहे. असे म्हणतात की, आयुषने या चित्रपटाची शूटिंग सुरु केली होती. त्याचे दिवसाचे सर्व सीन्स शूट करुन झाले होते. पण चित्रपटाच्या क्रिएटिव्ह टिमसोबत आयुषचे काही मतभेद झाले त्यामुळे त्याने तो प्रोजेक्ट सोडला. त्यानंतर या चित्रपटातून अभिनेता जहीर इकबालला देखील रिप्लेस करण्यात आलं. सलमान आणि आयुषने यापूर्वी अंतिम चित्रपटात एकत्र काम केले होते.

मेकर्सनी आता या चित्रपटात जहीर इकबालची रिप्लेसमेंट म्हणून जस्सी गिलला पसंती दर्शवली आहे तर आयुषची रिप्लेसमेंट म्हणून सिद्धार्थ निगमचा विचार चालू आहे.

या चित्रपटात सलमानसोबत अभिनेत्री पूजा हेगडे, शेहनाझ गिल, राघव जुयाल आणि तेलगू अभिनेता वेंकटेश दग्गुबाती दिसतील. ३० डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. सलमानच्या पुढील कामाबद्दल बोलायचे झाल्यास तो त्याच्या टायगर चित्रपटाच्या तिसऱ्या सिरीजमध्ये व्यस्त आहे. याव्यतिरिक्त तो अमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ आणि शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून दिसणार आहे.