काली पोस्टरच्या वादात तृणमूल कॉंग्रेसच्या खासदा...

काली पोस्टरच्या वादात तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी दिले समर्थन (Kaali Poster Row: ‘Kaali To Me Is A Meat-Eating, Alcohol-Accepting Goddess’ Says TMC MP Mahua Moitra)

काली या डॉक्युमेंट्री फिल्मच्या पोस्टरचा वाद आता वाढत चालला आहे. या पोस्टरमध्ये काली माता एका हाताने सिगारेट ओढताना दाखवली आहे तर तिच्या दुसऱ्या हातात LGBTQ ध्वज दाखवला आहे. हा पोस्टर पाहून या डॉक्युमेंट्री फिल्मच्या निर्मात्या लीना मणिमेकलाई यांच्यावर लोकांनी सोशल मीडिया मार्फत संताप व्यक्त केला आहे. सर्वसामान्य लोकांसोबतच सेलिब्रेटी तसेच राजकिय नेते मंडळी सुद्धा या पोस्टरवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. त्यात नुसरत जहाँने या पोस्टरवर टीका केली आहे, तर दुसरीकडे एका कार्यक्रमात तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी या पोस्टरमध्ये काहीही चुकीचे नाही असे म्हटले आहे.


महुआने सांगितले की, माझ्यासाठी काली माता ही मांस आणि मद्य प्राशन करणारी देवी आहे. देवीदेवतांची अनेक रुपे आहेत. तुम्ही तुमच्या देवाला कसे आणि कोणत्या रुपात पाहता हे तुमच्यावर अवलंबून असते. महुआने पुढे सांगितले की, जगात असे अनेक देश आहेत जिथे देवाला मद्य अर्पण करतात. तुम्ही भूतान आणि सिक्कीमला गेलात तर तुम्हाला पाहायला मिळेल की तिथे सकाळच्या पूजेत देवाला व्हिस्की अर्पण केली जाते, पण हेच जर उत्तर प्रदेशातील रहिवाशांना प्रसाद म्हणून दिले तर त्यांच्या भावना दुखावल्या जातात.


त्याचप्रमाणे, जर तुम्ही तारापीठ (पश्चिम बंगालमधील मंदिर) मध्ये गेलात तर तुम्हाला काली मातेच्या मंदिराबाहेर साधू धूम्रपान करताना दिसतील. मी एक हिंदू असली तरी मला काली मातेला माझ्या पद्धतीने पाहण्याचे स्वातंत्र्य आहे आणि ते असलेच पाहिजे. प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने देवपूजा करण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे.
मात्र या पोस्टरमुळे लोकांचा राग वाढत असून चित्रपट निर्मात्याला अटक करण्याची मागणीही केली जात आहे. त्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असून त्याविरोधात कारवाई व्हायला हवी अशी अनेकांची मागणी आहे.