फक्त मिनिटं ध्यानास द्या! (Just Spare 5 Minutes...

फक्त मिनिटं ध्यानास द्या! (Just Spare 5 Minutes for Meditation)

मन आणि शरीर सुदृढ राहण्यासाठी ध्यानधारणा अतिशय उपयुक्त आहे. पण पुष्कळ लोकांना वाटते की, त्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो. कामाच्या घाईगर्दीत एवढा वेळ कुठून काढायचा, असं जवळपास प्रत्येक जण कुरबुरतो. पण सकाळच्या वेळी फक्त 5 मिनिटे ध्यानधारणा करा. मग पाहा तुम्ही सदैव सुदृढ राहाल. 5 मिनिटांचा वेळ तर कितीही गडबडीत असलेला माणूस काढू शकतो की नाही?
श्‍वासोच्छवास महत्त्वाचा
ध्यानमुद्रेत बसा आणि श्‍वसनाचे व्यायाम करा. कपालभाति, अनुलोम विलोम, भस्त्रिका असे प्रकार तज्ज्ञांकडून शिकून घ्या. अन्यथा श्‍वासावर मन एकाग्र करून 5 मिनिटं श्‍वासोच्छवास करा. श्‍वास घेताना व सोडताना आपल्या अंगात ऊर्जा संचार करीत असल्याची कल्पना करा. ही ऊर्जा रंध्रारंध्रात शिरत असल्याची कल्पना करा. शरीरातील पेशींमध्ये झिरपत असल्याची कल्पना करा. ही श्‍वसनक्रिया म्हणजे अंगाअंगात ऊर्जा निर्माण करण्याचे इंधन समजा. मग तुमचं मन आणि शरीर कसं शुद्ध होतं, ते तुमच्या लक्षात येईल.
5 मिनिटांनी सुरुवात करा
दररोज फक्त 5 मिनिटं ध्यान लावा. त्याची गोडी लागताच हळूहळू ही वेळ वाढवा. किमान 12 मिनिटं ध्यानधारणा करता येईल, एवढी प्रॅक्टिस करा. याची सवय झाली की, ते अधिकाधिक वेळ करण्यास तुमचं मन उत्सुक असेल. मात्र कामाच्या घाईगर्दीत 5 मिनिटांपेक्षा अधिक वेळ तुम्हाला देता येत नसेल तर तेव्हढाच वेळ द्या.
चैतन्यदायी संगीत ऐका
आपण कुठेही असलो तरी कुठले तरी आवाज ऐकत असतो. आवाजाच्या रूपाने आपल्याला कंपन ऊर्जा प्राप्त होत असते. आपण पाश्‍चात्त्य संगीत ऐकतो, भाव संगीत ऐकतो, सिनेगीत ऐकतो नि शास्त्रीय संगीत ऐकतो. यांचे वेगवेगळे परिणाम आपल्या शरीरावर नि मेंदूवर होत असतात. त्या त्या संगीताची कंपनं, ताल, सूर आणि आपली आवडी यांचा संमिश्र परिणाम आपल्यावर होतो. अन् आपण सुखावतो किंवा उत्तेजित होतो. एखाद्या निर्जन समुद्रकिनारी गेलो असताना लाटांचा मंद किंवा उग्र आवाजाचा आपल्यावर वेगवेगळा परिणाम होतो. हे सर्व लक्षात घेऊन दररोज 5 मिनिटांचा वेळ काढून संगीताचे ध्यान लावा.