‘ठरलं तर मग’ या नव्या मालिकेत जुई गडकरी समजूतदा...

‘ठरलं तर मग’ या नव्या मालिकेत जुई गडकरी समजूतदार आणि स्वतंत्र मुलीच्या भूमिकेत(Juiee Gadkari Plays A Role Of Modest And Independent Girl In New Marathi Serial : ‘Tharla Tar Mag’)

स्टार प्रवाह लवकरच घेऊन येत आहे नवी मालिका ‘ठरलं तर मग’. या मालिकेतून प्रेक्षकांना आपलीशी वाटणारी नवी गोष्ट आणि नवी पात्र भेटीला येतील. खऱ्या प्रेमाची साक्ष देणारी ही मालिका असेल. स्टार प्रवाहवरील पुढचं पाऊल या मालिकेतून कल्याणीच्या रुपात घराघरात पोहोचलेली अभिनेत्री जुई गडकरी ठरलं तर मग मालिकेतून सायलीच्या भूमिकेतून पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दमदार पुनरागमन करणार आहे.

ठरलं तर मग मालिकेतील भूमिकेविषयी सांगताना जुई म्हणाली, ‘ही मालिका करताना मला अतिशय आनंद होत आहे. माहेरी आल्याची भावना आहे. पुढचं पाऊल मालिकेतल्या कल्याणीवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं आहे. त्यामुळे या नव्या पात्रावरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करतील याची खात्री आहे. सायली ही अतिशय समजूतदार आणि स्वतंत्र विचारांची मुलगी आहे. अनाथ असली तरी नात्यांचं महत्व जाणणारी, अन्याय सहन न करणारी मात्र प्रचंड वेंधळी. सायलीच्या वेंधळेपणामुळेच मालिकेत मजेशीर प्रसंगही पाहायला मिळतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मालिकेची कथा ही मालिकेचं बलस्थान आहे. त्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतेय की इतक्या छान प्रोजक्टचा मला भाग होता आलं.’

आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शन्सने या मालिकेची निर्मिती केली असून सचिन गोखले या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत.  ही नवी मालिका ५ डिसेंबरपासून रात्री ८.३० वाजता स्टार प्रवाहवर प्रक्षेपित होईल.