जूही चावलाने नाकारलेल्या चित्रपटांनी करिश्माचे ...

जूही चावलाने नाकारलेल्या चित्रपटांनी करिश्माचे तारे चमकवले (Juhi Chawla Regrets Rejecting These Blockbuster Movies Which Made Karishma Kapoor Career)

जूही चावलाने नाकारलेल्या काही चित्रपटांमध्ये काम करून करिश्मा कपूर रातोरात सुपरस्टार बनली होती. नंतर जूही चावलाला या गोष्टीचा पश्चाताप झाला, पण तोपर्यंत करिश्माचे तारे चमकले होते. पाहुया ते सुपरहिट चित्रपट कोणते होते, जे जूहीने नाकारले…

खेळकर स्वभाव आणि निरागस चेहरा असलेली अभिनेत्री जूही चावलाने बॉलिवूडमध्ये पदार्पण करताच धमाल उडवून दिली. १९८६ मध्ये ‘सल्तनत’ चित्रपटापासून तिच्या अभिनयाची सुरुवात झाली अन्‌ ‘कयामत से कयामत तक’ या दुसऱ्याच चित्रपटाने तिला स्टार बनवलं. या चित्रपटानंतर जुही चावला आणि आमिर खान यांच्या जोडीस लोकांनी डोक्यावर घेतलं. म्हणूनच नंतरही अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केलं. अतिशय कमी वेळात नव्वदच्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये जूहीनं आपलं स्थान बनवलं.

जूही चावलाची लोकप्रियता इतकी वाढली होती की, त्यावेळेस प्रत्येक जण तिला आपल्या चित्रपटामध्ये घेऊ पाहत होता. त्यावेळेस तिच्याकडे इतके चित्रपट होते की त्यातील काहींना तिला नकार द्यावा लागला होता.

जूहीला आजही त्यावेळेस नाकारलेल्या चित्रपटांबाबत पश्चाताप होत आहे, कारण त्या चित्रपटांमुळे दुसऱ्या अभिनेत्रींचे भाग्य उजळले, विशेषतः करिश्मा कपूर रातोरात स्टार झाली.

जुही चावलानं आपल्या एका मुलाखतीमध्ये या गोष्टीचा खुलासा केला होता. त्यात तिनं अनेक मोठे चित्रपट नाकारल्याचा आपल्याला पश्चाताप होत असल्याचं सांगितलं होतं. त्यापैकी ‘राजा हिंदुस्तानी’, ‘दिल तो पागल है’ आणि ‘बीवी नंबर १’ हे चित्रपट मी नाकारायला नको होते, असं ती म्हणाली होती.

परंतु आपण सोडलेल्या चित्रपटांमुळे दुसऱ्या अभिनेत्री स्टार बनल्या, या गोष्टीचाही मला तितकाच आनंद आहे, असेही ती म्हणाली. जुहीने सोडलेल्या या तीनही चित्रपटांमध्ये नंतर करिश्माने काम केलं आणि या सर्व चित्रपटांच्या यशाने करिश्माही स्टार अभिनेत्री बनली. ‘राजा हिंदुस्तानी’ या चित्रपटासाठी करिश्माला फिल्मफेअरचा उत्तम अभिनेत्रीचा अवॉर्ड मिळाला आणि ‘दिल तो पागल है’ या चित्रपटासाठी उत्तम सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता.

सिनेसृष्टीमध्ये येण्यापूर्वी १९८४ साली जूही चावलाने मिस इंडियाचा किताब जिंकला होता. त्यानंतर ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटाच्या यशाने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. तरुणांच्या खोलीत भिंतींवर जुहीचे फोटो दिसू लागले होते. बॉलिवूडमधे पाऊल ठेवताच अतिशय कमी वेळात जूहीने हे यशोशिखर गाठले.

१९९७ साली उद्योजक जय मेहता याच्याशी जूहीनं लग्न केलं. लग्नानंतर जूहीनं चित्रपटांतून जवळजवळ संन्यास घेतला. आपल्या कुटुंबाला तिनं प्राधान्य दिलं. जुहीला, जान्हवी आणि अर्जुन अशी दोन मुलं आहेत. त्यांचं संगोपन करण्यात जुहीनं स्वतःला बिझी ठेवलं. परंतु सोशल मीडियावर मात्र ती सक्रीय राहिली. त्यामुळे आजही तिचे चाहते तिच्याशी जोडलेले आहेत.

दुसरीकडे करिश्मानेही लग्नानंतर चित्रपटांपासून स्वतःला दूरच ठेवले आहे. घटस्फोटानंतर ती आपल्या दोन्ही मुलांना एकटी सांभाळत आहे.