‘ऋतिक रोशनची माफी न मागितल्यामुळे जावेद अ...

‘ऋतिक रोशनची माफी न मागितल्यामुळे जावेद अख्तर यांनी धमकावले, आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले,’ – मुंबई न्यायालयात सुनावणी दरम्यान कंगनाचे जावेद अख्तर यांच्यावर गंभीर आरोप (‘Javed Akhtar threatened me for not apologising to Hrithik, provoked me to commit suicide’- Kangana Ranaut tells to Mumbai court)

कंगना रणौत आणि वाद हे समीकरण चांगलंच जुळलेलं आहे. कंगना रणौत-जावेद अख्तर यांच्यात २०२० मध्ये सुरु झालेला वाद अजूनही सुरूच आहे. जावेद अख्तर यांच्याशी संबंधित मानहानीच्या खटल्यात कंगना रणौत (Kangana Ranaut) मुंबई न्यायालयात हजर झाली होती. यादरम्यान कंगनाने जावेद अख्तर यांच्या विरुद्ध दाखल केलेल्या तिच्या प्रति-फिर्यादीत तिचे म्हणणे देखील नोंदवले आहे आणि त्यांच्यावर हक्कांचे उल्लंघन, गुन्हेगारी धमकी, धमकी, खंडणी आणि गोपनीयतेचा भंग असे अनेक गंभीर आरोप केले आहेत.

कंगनाच्या विनंतीवरून कोर्टातील सदर कार्यवाही बंद रुममध्ये झाली. कंगनाला ‘मीडिया ट्रायल’ नको असल्याने न्यायदंडाधिकाऱ्यांनी वकील आणि मीडियासह सर्वांना बाहेर जाण्याचे निर्देश दिले. यावेळी कंगना आणि तिची बहीण रंगोली चंदेल या दोघीच कोर्टात हजर होत्या.

कंगना म्हणाली, “एकदा जावेद अख्तर यांनी मला त्यांच्या घरी बोलावले आणि सांगितले की, राकेश रोशन आणि त्यांचे कुटुंब हे खूप मोठे प्रस्थ आहे. जर तू त्यांची माफी मागितली नाही तर ते तुझ्या चेहऱ्यावर काळं फासतील आणि सार्वजनिक ठिकाणी तुझी बदनामी होईल. रोशन कुटुंबीयांची मंत्रालयापर्यंत ओळख (वट) आहे, तू माफी मागितली नाही, तर ते तुम्हाला तुरुंगात टाकतील आणि तू बरबाद होशील. तुला तुझ्या आत्सन्मानाची थोडी जरी काळजी असेल तर तू त्यांची माफी माग,” असे ते म्हणाले.

कंगनाने पुढे सांगितले की, जावेद अख्तर यांनी तिला आत्महत्या करण्यासही प्रवृत्त केले आणि जर तू लेखी माफी मागितली नाहीस तर तुला आत्महत्या करावी लागेल, असे ते म्हणाले. “हे त्यांचे शब्द होते. ते माझ्यावर ओरडलेही. मी त्यांच्या घरात घाबरून गेले होते.” जावेद अख्तर यांचे हे वागणे तिच्यासाठी मानसिक छळच होता. या व्यतिरिक्त कंगनाने तिच्या उलट तक्रारीत जावेद अख्तर यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

२०२० मध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर जावेद अख्तरने कंगना रणौत विरोधात महानगर दंडाधिकारी न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला होता. सुशांतच्या मृत्यूनंतर कंगनाने एका मुलाखतीत जावेद अख्तर यांच्यावर निशाणा साधला होता, त्यानंतर जावेद अख्तर यांनी कंगनावर आपली प्रतिमा डागाळल्याचा आरोप करत मानहानीचा खटला दाखल केला होता.