कृष्ण जयंती विशेष : कृष्ण सखा ! (Janmashtami Sp...

कृष्ण जयंती विशेष : कृष्ण सखा ! (Janmashtami Special: Spiritual Importance Of Lord Krishna)

 • संगीता वाईकर
  श्रीकृष्ण विचार हा अतिशय महत्त्वाचा सिद्धांत आहे. त्यातून जीवनाची अपारता, भव्यता, समानता आपल्याला अनुभवता येते. प्रत्येक व्यक्तीने आपल्या प्रकृतीनुसार आपल्या जीवन धारणा निश्चित करून त्याप्रमाणे जीवनात योगी होण्याच्या वाटेवर प्रवास करावा. आपल्या जीवनात कृष्ण भावना जोपासण्याचा प्रयत्न करावा. आपण आपले जीवन कसे जगावे हे
  यातून उमगते.
  श्रीकृष्ण हा पारंपरिक धर्म कल्पनांनुसार भगवान विष्णूंचा आठवा अवतार मानला जातो. ‘कृष्ण’ या शब्दाचा अर्थ सर्वांना आकृष्ट करून घेणारा असा आहे.अहंकाराचा सर्वात मोठा शत्रू आनंद आहे. आनंद आणि प्रेम असेल तिथे अहंकार टिकू शकत नाही. प्रेम, साधेपणा आणि आनंदापुढे अहंकार विरघळून जातो.कृष्ण म्हणजे आनंदाचे, साधेपणाचे मूर्तिमंत उदाहरण, प्रेमाचे उगमस्थान!
  भगवान श्रीकृष्ण हे धर्माच्या परम गहनतेत व धर्माच्या अत्युच्च शिखरावर विराजमान असूनही गंभीर नाहीत की उदासही नाहीत. संगीत, नृत्य, हास्य, गान युक्त व्यक्तित्व जर कुणाचे असेल तर ती व्यक्ती म्हणजे श्रीकृष्णच!
  भगवान श्रीकृष्ण राग, प्रेम, भोग, काम, योग, ध्यान, भक्ती अशा जीवनाच्या सार्‍या आयामांचा स्वीकार करतात. जीवनाच्या या सार्‍या समग्रतेला समजून घेण्याची संभावना रोज वृद्धिंगत होत आहे. कौरव पांडवांच्या युद्ध काळातील मार्गदर्शन हेच खर्‍या अर्थाने आजच्या आधुनिक युगातील मानव जातीस उपयोगी पडणारे जीवनोपयोगी तत्त्वज्ञान आहे. भगवान श्रीकृष्णाने मानवी जीवनातील सर्वात महत्त्वपूर्ण असणारी ‘स्थितप्रज्ञता’स्पष्ट केली आहे.
 • कृष्ण म्हणजे व्यवस्था लावणारा
  भक्त व सत्य ज्ञानीजनांची जिज्ञासा पूर्ण करणारे परमेश्वर म्हणजे श्रीकृष्ण. धर्म आणि तत्त्वज्ञानावर नियंत्रण करणार्‍या कृष्णाने संस्कृती प्रवर्धनासाठी फार मोठे कार्य केले. आपल्या हृदयातील अशांतीने आपली तगमग होते. द्वेष आणि मत्सराने भारलेल्या अशा जीवन गोकुळात शेवटी कृष्ण जन्माला येतो. नंद म्हणजे आनंद आणि यशोदा म्हणजे यश देणार्‍या सत् प्रवृत्ती. यांच्या तळमळीतून भगवान श्रीकृष्ण जन्माला येतो. हृदयातील मोक्षाची तळमळ म्हणजेच श्रीकृष्णाचा जन्म. कृष्ण म्हणजे व्यवस्था लावणारा ‘आकर्षून घेणारा’. कृष्ण सर्व गोकुळाला वेड लावणारा कृष्ण गोपाळ होतो.
  भगवान श्रीकृष्ण लहान असतानाच सर्वांना आकर्षित करणारे होते. बालपणी ज्या गोपिकांबरोबर ते खेळत असत त्यापैकी एक राधा होती. राधा ही कृष्णाची परम प्रिया आहे. या राधेचे कृष्णावर जिवापाड प्रेम होते. कृष्ण हा बालगोपाल म्हणून समजून घेतला तर समजतो. राधेचा कृष्ण समजायला मात्र भक्तीची साधना आवश्यक आहे तर अर्जुनाचा सारथी असणारा पार्थ समजून घेण्यासाठी भगवद्गीता समजून घेणे गरजेचे आहे.
 • कृष्ण जीवन एक अद्भुत चमत्कार
  भारतीय तत्त्वज्ञान हे महान विचारांची जननी आहे. त्यामध्ये श्रीकृष्णाची भगवद्गीता हा ग्रंथ तर मानवी जीवनाला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आहे. भारतीय तत्त्वज्ञानानुसार कृष्ण जीवन हा एक अद्भुत असा चमत्कार आहे. प्रत्येकाला असे वाटावे की, कृष्ण हे आपल्याच जगण्याची कथा सांगत आहेत. मनुष्य जन्माची क्षणभंगुरता व मानवाला असलेली विवंचना ही आपल्याला त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून पदोपदी दिग्दर्शित करते. भगवद्गीतेद्वारा आपण पराक्रमाची अत्युच्च पातळी तर गाठू शकतोच सोबत आपण समाधानाने जीवन कसे जगावे याचा वस्तुपाठ देखील मिळतो.
  भारतीय जीवन मार्गाचे अनेक मार्ग आपल्याला दिसत असले तरी, त्यातील कृष्ण विचार हा अतिशय महत्त्वाचा सिद्धांत आहे. त्यातून जीवनाची अपारता, भव्यता, समानता आपल्याला अनुभवता येते. प्रत्येक व्यक्तीने आपल्या प्रकृतीनुसार आपल्या जीवन धारणा निश्चित करून त्याप्रमाणे जीवनात योगी होण्याच्या वाटेवर प्रवास करावा. आपल्या जीवनात कृष्ण भावना जोपासण्याचा प्रयत्न करावा. आपण आपले जीवन कसे जगावे हे यातून उमगते.
 • परमेश्‍वर करतो भक्तांची सेवा
  जीवनामध्ये जे भक्त एकनिष्ठेने ईश चिंतन करतात त्यांचा योग व क्षेम साक्षात परमेश्वर चालवतात असे भगवान श्रीकृष्ण गीतेत सांगतात. जे भक्त परमेश्वर भक्तीमध्ये लीन झालेले आहेत, ज्यांना परमेश्वराशिवाय काहीच चांगले वाटत नाही, असे भक्त एकनिष्ठपणे परमेश्वराचे चिंतन करतात, त्याची उपासना करतात. परमेश्वर अशा भक्तांची सेवा करत असतो.
  परमेश्वराचा अनन्य भक्त परमेश्वराकरता शरीराने कर्म करतो. प्रत्येक कार्य परमेश्वराला समर्पित करणे आणि त्यापासून मुक्त होणे एवढेच त्याला माहीत असते. अशा प्रकारे परमेश्वरावर अनन्य भक्तांची श्रद्धा व प्रेम, सतत पडणार्‍या पावसामुळे नदीतील वाढत्या पाण्याप्रमाणे वाढत असते. अनन्य भक्त रात्रंदिवस सर्व इंद्रियांसहित परमेश्वराच्या ठिकाणी दृढ अंतःकरण ठेवून परमेश्वराची भक्ती, उपासना करत असतो. काया, वाचा, मनाने परमेश्वर स्वरूपाशिवाय काहीच त्याला विश्वसनीय वाटत नाही.
 • कालातीत अवतार
  कृष्ण हा पूर्ण अवतार आहे. श्रीकृष्ण म्हणजे सामर्थ्यासह स्वातंत्र्य आहे. श्रीकृष्णाला पाप-पुण्य नाही, त्यांना वृद्धत्व नाही. शोकही नाही. गोकुळातून सहज मथुरेत गेले, किंबहुना स्वतःचा अवतार संपवला तरी देखील मुखावर हास्यच. श्रीकृष्ण हे सत्य संकल्पाचे दाता आहेत. त्यांचे प्रत्येक कार्य सफल होते.
  श्रीकृष्णाला समजून घेणे हे अंतरात्म्याला जाणून घेण्यासारखे आहे. श्रीकृष्ण हे एक असे व्यक्तिमत्त्व आहे जे प्रत्येक अवस्थेतल्या व्यक्तीला आपल्यासारखे वाटते. श्रीकृष्णाने सांगितलेला गीता विचार सर्व काळात लागू होणारा आहे. तो कोणत्याही धर्मासाठी कालातीत आहे. कुरुक्षेत्रावर झालेला कृष्णार्जून संवाद म्हणजे आपल्या जीवनाचेच प्रतीक आहे. संसाराच्या रणांगणावर मन सैरभैर होते. त्यावेळी कृष्णाचा कर्मयोग मार्गदर्शक आहे म्हणून कृष्ण भावना आणि कृष्ण विचार समजून घेतल्यास प्रत्येकाच्या जीवनात आनंदाची उधळण होईल.
  श्रीकृष्ण आहे आपल्या प्रत्येकाच्या मनात. भक्तांच्या हृदयात. जेव्हा त्याचे नाम आपण घेतो तेव्हा मन:पटलावर तो तात्काळ हजर होतो, ते आपल्या भक्ताने मारलेल्या हाकेने. आर्ततेने मारलेली हाक त्याच्यापर्यंत निश्चित पोहचते. एकदा साद घालून तर बघा. श्रीकृष्ण चराचरात आहे, कणाकणात आहे…. प्रत्येक जिवाच्या ठायी आहे. तो नाही असे नाहीच….जळी स्थळी, काष्ठी, पाषाणी त्याचेच तर अस्तित्व आहे….प्रत्येक जिवात चैतन्य आहे तेच तर आहे कृष्ण रूप…साक्षात भगवंत!
 • कोणी म्हणतात, तो कुठे आहे आम्हाला तर दिसत नाही… याचं कारण आहे त्या व्यक्तीचं अज्ञान…प्रत्येक श्वास तर त्याचाच आहे…त्याने आपलं अस्तित्व दाखवले नाही तर तुझेही अस्तित्व शून्य आहे…ही जाणीव जेव्हा होईल तेव्हा लक्षात येईल तो आहेच…आणि तो आहे म्हणून मी आहे…त्यानेच आपले जीवनरूपी लगाम आपल्या हाती पकडले आहे. तोपर्यंत आपल्या देहात प्राण, आनंद, सुख, ऐश्वर्य नांदत आहे … पण एकदा का त्याने आपल्याला सोडले तर… इथले सगळे इथेच सोडावे लागते हेच वास्तव आहे… आजही आपल्यावर संकटे येतात आणि बरेचदा आपण त्यातून सहीसलामत सुटतो, कधी त्यातून धडा मिळतो तर कधी त्यातून तावून सुलाखून बाहेर पडतो.. तोच त्यावेळी आपल्याला सावरतो, ऊर्जा देतो.. कधी मार्ग दाखवतो तर कधी कधी चांगलं काही घडण्यासाठी तसा प्रसंग उभा करतो… मग आपणच त्याला सहज आठवतो… त्याच्या चरणी नतमस्तक होतो… तो आपल्या खर्‍या भक्ताची आत्यंतिक तळमळीने काळजी घेतो…सतत त्याच्याबरोबर असतो फक्त ही जाणीव मात्र आपल्याला असायला हवी. प्रत्येक जिवात, निसर्गात त्याचेच तर अस्तित्व आहे. तो आहे नक्कीच आहे….आताही तो आपल्या सर्वांसोबत आहे…मनात आणि प्रत्येक कणात….
  ॥ जय श्री कृष्ण ॥