जॅकी श्रॉफच्या ‘बूम’ ने इतकी आपटी ख...

जॅकी श्रॉफच्या ‘बूम’ ने इतकी आपटी खाल्ली की, त्याचे कर्ज फेडण्यासाठी राहते घर विकावे लागले… (Jackie Shroff was bankrupt after ‘Boom’ failure, He Had To Sell Family Home For Money)

जॅकी श्रॉफ हा तसा गुणी आणि यशस्वी अभिनेता आहे. प्रसिद्धी आणि पैसा त्याच्याकडे आहे. पण एक वेळ अशी आली होती की, तो कर्जबाजारी झाला. अन्‌ पैशांची इतकी चणचण भासू लागली की, त्याला आपले राहते घर विकावे लागले होते. हा खुलासा त्याने हल्लीच एका मुलाखतीत केला आहे.

‘बूम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हाची ही परिस्थिती आहे. जॅकीने आपली बायको आयशा श्रॉफ हिच्या नावाने या चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यात अमिताभ बच्चन, जॅकी श्रॉफ, गुलशन ग्रोवर, पद्मलक्ष्मी, मधु सप्रे, झीनत अमान आणि कतरीना कैफ असे बिनीचे कलाकार होते. कतरीनाने या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पण हा ‘बूम’ तिकीट बारीवर इतका आपटला की, जॅकी श्रॉफ कर्जबाजारी झाला. त्याची तोंडमिळवणी करण्यासाठी त्याला राहते घर विकावे लागले.

त्या भयंकर परिस्थितीचे वर्णन करताना जॅकी म्हणतो, ”आम्ही एक नवा प्रयोग केला होता. तो असफल झाला. अन्‌ आम्ही बरंच काही गमावून बसलो. पण लोकांकडून घेतलेलं कर्ज फेडायचं होतं म्हणून मी जास्त मेहनत केली. दोन-दोन शिफ्टमध्ये शूटिंग केलं आणि लोकांकडून घेतलेलं कर्ज फेडलं.”

मुलांवर परिणाम होऊ दिला नाही

बिझनेसमध्ये उतार-चढाव येतातच. पण आपण इमानदारी निभावली पाहिजे, असं सांगून जॅकीने सांगितलं की, ही पैशांची चणचण मी व आयशाने मुलांना जाणवू दिली नाही. (टायगर आणि कृष्णा)

आमचं फर्निचर एक-एक करून विकलं – टायगर

जॅकीचा मुलगा टायगर याने देखील ‘बूम’च्या वाईट दिवसांच्या आठवणी जागवल्या. ”घरातील चांगले फर्निचर एक-एक करून विकलं गेलं होतं. ज्या वस्तू पाहून मी मोठा झालो होतो, त्या गायब होत गेल्या. माझा पलंग देखील गेला व मी जमिनीवर झोपू लागलो. हा माझ्या जीवनातील वाईट काळ होता.”

डॅडीचं गेलेलं घर पुन्हा घेण्याची टायगरची इच्छा

आपलं गमावलेलं घर मी पुन्हा विकत घेईन, असं वचन टायगरने आपले डॅडी जॅकीला दिलं आहे. पण जॅकी काही वेगळंच बोलतो – ”आता ते घर पुन्हा विकत घ्यावं, असं मला अन्‌ माझ्या बायकोला वाटत नाही. जे झालं ते झालं. पण मला दोन्ही मुलांचा खूप अभिमान वाटतो. ते चांगलेच खंबीर आहेत.”

टायगरनं काही वर्षांपूर्वी मुंबईच्या खार परिसरात ८ बेडरूम असलेलं मोठं घर खरेदी केलं होतं. आपल्या आई-वडिलांना माझ्याकडून ही छोटीशी भेट आहे, असं त्यानं सांगितलं होतं.