जॅकी चॅनने आपल्या मुलाला माफ केले नव्हते (Jacki...

जॅकी चॅनने आपल्या मुलाला माफ केले नव्हते (Jacki Chan’s Son Was Arrested In Drug Case; Jackie Did Not Cuddle Him)

आर्यन खान अंमली पदार्थ प्रकरणामध्ये अटकेत आहे. त्यावरून बॉलिवूडचे काही कलाकार त्याच्या बाजूने बोलत आहेत. त्याला गोंजारत आहेत. त्याचे पिताजी शाहरूख खान यांची कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यांनी आपली सोशल मीडियावरील खाती बंद केलेली आहेत. मात्र आर्यनच्या खटल्यावरील सुनावणीस शाहरुखने कोर्टात हजेरी लावली होती. तो आपल्या मुलाकडे सहानुभूतीने बघत असल्याची बातमी आहे. तेही स्वाभाविक आहे. कारण कोवळ्या वयात मुलाच्या हातून चूक झाली म्हणून बापाने त्याला वाऱ्यावर सोडून देता कामा नये. असा सर्वसाधारण कल असतो.

Jacki Chan's Son Was Arrested

परंतु याच्या अगदी विरुद्ध प्रकार हॉलिवूडमध्ये घडला आहे. ॲक्शन सुपरस्टार जॅकी चॅन याचा कोवळा मुलगा जेसी याला २०१४ साली अंमली पदार्थ जवळ बाळगल्याप्रकरणी अटक झाली होती. मार्जुआना हा अंमली पदार्थ जवळ बाळगणे व वितरण करण्याचा आरोप जेसीवर लावण्यात आला होता. त्यावेळी मुलाची कड न घेता, जॅकीने सगळ्यांची जाहीर माफी मागितली होती. अन्‌ “माझ्या मुलाच्या या कृत्याबद्दल मी शरमिंदा आहे… हे माझे अपयश आहे, असे मी मानतो. त्याला वाचविण्यासाठी मी प्रयत्न करणार नाही,” अशी कठोर भूमिका जॅकी चॅनने घेतली होती. या गुन्ह्याबद्दल जेसीला सहा महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागला होता. केलेल्या चुकीबद्दल शिक्षा आवश्यक आहे, असे जॅकीचे निःस्पृह वर्तन होते.