वसंतराव देशपांडे यांच्या जीवनावरील चित्रपटाची क...

वसंतराव देशपांडे यांच्या जीवनावरील चित्रपटाची कथा तयार होण्यास २ वर्षे लागली (It Took 2 Years To Prepare The Story Of Marathi Film ‘Mee Vasantrao’)

शास्त्रीय संगीत आणि नाट्यसंगीतामध्ये उत्तुंग लोकप्रियता मिळविलेल्या पं. वसंतराव देशपांडे या महान गायक – अभिनेत्याच्या जीवनावर आधारित ‘मी वसंतराव’ हा मराठी चित्रपट पणजी येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला. मानाच्या सुवर्ण मयुर पारितोषिकाच्या स्पर्धेत असलेला हा चित्रपट अमराठी प्रेक्षकांना देखील बेहद्द आवडला. ‘हा चित्रपट कालातीत असल्याने ते प्रेक्षकांना भिडेलच’ अशी आशा या चित्रपटाचे दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांनी व्यक्त केली.

“वसंतराव देशपांडे यांची अफाट प्रतिभा समजून घेणं सामान्यांच्या कुवतीपलिकडचे असल्याने या चित्रपटाची कथा तयार करण्यास २ वर्षे लागली,” असेही त्यांनी सांगितले.

वसंतरावांची भूमिका, त्यांचेच नातू व आत्ताच्या पिढीतले तरुण शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी वठविली असून व्यावसायिक अभिनेता नसूनही त्यांनी ही भूमिका समर्थपणे केली असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.

विदर्भातील एका खेडेगावात जन्मलेल्या आणि नंतर नागपूर येथे आईकडून एकहाती जोपासना झालेल्या वसंतरावांचे जीवन आणि त्यांच्या संगीत साधनेला आकार देणाऱ्या उत्कंठावर्धक घटनांचा हा कॅनव्हास आहे.

‘कट्यार काळजात घुसली’ या अवीट गोडीच्या संगीत नाटकामधील खाँसाहेबांची भूमिका वसंतरावांनी अजरामर केलेली आहे.

  • नंदकिशोर धुरंधर