मूल होण्यासाठी ’बॅरिट्रिक सर्जरीचा’ उपाय करावा ...

मूल होण्यासाठी ’बॅरिट्रिक सर्जरीचा’ उपाय करावा का? (Is Bariatric Surgery Necessary To Conceive A Child?)


मी मालती, मला एक शंका विचारायची आहे. ‘एंडोमेट्रिओसिस’ या आजारासाठी माझी दुर्बिणीने शस्त्रक्रिया झाली. या शस्त्रक्रियेनंतर जंतुसंसर्गाने मला ताप आला. त्यावर उपचारही झाले. बरे वाटले. त्यानंतर 9-10 महिन्यांनी माझ्या उजव्या मूत्रवाहिनीत (युरेटर) अडथळा असून त्यामुळे उजवे मूत्रपिंड सुजले असल्याचे मला समजले. त्याचीही शस्त्रक्रिया (स्टेंटिंग) झाली. ही गुंतागुंत दुर्बिणीच्या सुरवातीच्या शस्त्रक्रियेमुळे झाली असावी का?

 • मालती, पनवेल
  हे पाहा मालती, अंतर्गत जननेंद्रियांच्या म्हणजे गर्भाशय, बीजांडे, गर्भनलिका इत्यादी कोठल्याही शस्त्रक्रियेमध्ये मूत्राशय, मूत्रवाहिन्या यांना इजा होण्याचा धोका असतो. कारण हे अवयव एकमेकांच्या अतिशय जवळ असतात. शस्त्रक्रियेनंतर झालेल्या जंतुसंसर्गामुळे त्या भागात फ्रायब्रोसिस होतो. यामुळे मूत्रवाहिनीमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. मूत्रवाहिनी त्या जागी अतिशय अरूंद होऊ शकते. असे झाल्यामुळे मूत्रपिंडामध्ये लघवी साचून तिथे सूज येते. ही गुंतागुंत वेळीच लक्षात येणे महत्त्वाचे असते. त्यावर योग्य वेळेत उपचार झाल्याने मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका टळतो.
 • मला बीजांडाच्या कर्करोगाचं निदान झालं होतं. त्यानंतर माझी बीजांडाच्या कर्करोगासाठी शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर बरेच दिवस मला योनीमार्गातून स्त्राव निघत आहे. यासाठी ‘सी.टी. युरोग्राफीची’ तपासणीही करून झाली. मूत्रपिंड, मूत्रवाहिन्या सर्व व्यवस्थित आहे. मग हा स्त्राव कशामुळे असावा?
 • सुलभा, मुंबई
  बीजांडाच्या कर्करोगाच्या शस्त्रक्रियेमध्ये लिम्फॅटिक्स व लिम्फ नोड्स काढले जातात. यामुळे ’लिम्फ’चा निचरा होण्यास अडथळा होतो. हा लिम्फ साचून कधीकधी योनीमार्गातून स्त्रवू शकतो.
 • माझे लग्न होऊन तीन वर्षे झाली. मला पी.सी.ओ.डी.चा त्रास आहे. माझे वजनही प्रमाणाबाहेर जास्त आहे. मला मूलासाठी प्रयत्न करायचे आहेत. डॉक्टरांनी वजन कमी करण्यासाठी ‘बॅरिट्रिक सर्जरीचा’ उपाय सांगितला आहे. तो करावा का?
 • करुणा, नागपूर
  आहारावर नियंत्रण व व्यायाम करून वजन कमी करता येत नसेल आणि तुमचा बीएमआय जर 40 च्या वर असेल तर बॅरिट्रिक सर्जरीचा उपाय सुचविला जातो. बॉडी मास इंडेक्स म्हणजे बीएमआय दर 40 च्या वर असेल तर त्याला ‘एक्स्ट्रीम ओबेसिटी’ म्हणतात. मूल होण्यासाठी व पीसीओडी नियंत्रणात आणण्यासाठी वजन कमी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी तुमच्या डॉक्टरांनी सुचवलेला बॅरिट्रिक सर्जरीचा उपाय तुम्ही
  करू शकता.