आंतरराष्ट्रीय योग दिवस : योग साधना करणाऱ्या ...

आंतरराष्ट्रीय योग दिवस : योग साधना करणाऱ्या मराठी अभिनेत्री (International Yoga Day : Marathi Actresses Practicing Yoga)

गेल्या काही वर्षांपासून २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा होत आहे. आज संपूर्ण जग करोना संकटाचा सामना करत असताना योग हा आशेचा किरण ठरतोय, हे डॉक्टर्स, साधक तसेच योगप्रेमींनी अनुभवांती स्पष्टपणे नमूद केले आहे. ‘योग आणि वेलनेस’ ही यंदाची योग दिवसाची थीम असून कोट्यवधी लोकांना करोना संक्रमणा दरम्यान याचे महत्त्व पटलेले आहे. अनेक मराठी सेलिब्रिटीदेखील मालिका किंवा सिनेमाच्या शूटिंगच्या धावपळीतून वेळ काढत आवर्जून योग साधना करतात. आज जागतिक योग दिनाच्या निमित्ताने आपण योग करणाऱ्या काही मराठी कलाकारांबाबत जाणून घेणार आहोत.

प्राजक्ता माळी

अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडिया अकाऊंटवर अनेकदा तिचे योगा करतानाचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते. यावरून तसेच तिच्या एकदंरच स्मार्ट लूकवरून ती नियमित योगा करत असल्याची ग्वाही मिळते. प्राजक्ता माळी ही मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमधूनही अभिनय करताना दिसते. सध्या ती ‘हास्यजत्रा’ कार्यक्रमामध्ये अँकरिंग करताना दिसत आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे १० लाखापेक्षा अधिक चाहते आहेत. योग असो, बागेत खत बनवणं असो वा अगदी सौंदर्यासाठीच्या टिप्स असोत, व्हिडीओंच्या माध्यमातून ती सतत चाहत्यांशी संवाद साधत असते.

अमृता खानविलकर

मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस, संवेदनशील आणि सक्षम अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकरचे नाव घेतले जाते. अमृता स्वत:ला विकसित करण्यासाठी खूप वेळ देते, फिटनेससाठीही ती आवर्जून वेळ काढते. वर्कआउट सोबतच योग करण्यावर अमृताचा अधिक भर असतो. अमृताने नुकतंच योग साधना करतानाचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. आजच्या काळात योग किती महत्वपूर्ण आहे, हे पटवून देत आपल्या चाहत्यांना योग करण्यासाठी ती प्रेरित करत असते.

प्रिया बापट

अभिनेत्री प्रिया बापटदेखील फिटनेसकडे कायम लक्ष देताना दिसते. नेहमी फिटनेस फ्रीक राहणारी अभिनेत्री असेच प्रियाला म्हटले जाते. लॉकडाऊनच्या काळात जिम बंद असल्याने प्रियाने घरीच नियमित व्यायामासोबतच योग करण्यावर भर दिला आहे.

गिरीजा प्रभू

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील गौरी म्हणजे अभिनेत्री गिरीजा प्रभू योगा प्रेमी आहे. सध्याच्या काळात महाराष्ट्राबाहेर शूटिंग सुरू असलं तरी गिरीजाने योगा करणं मात्र थांबवलेलं नाही. गिरीजा नियमित योगा करते. तसचं सोशल मीडिया अकाऊंटवर योगा करतानाचे अनेक व्हिडीओ आणि फोटो ती शेअर करत असते.

रुपाली भोसले

बिग बॉस मराठी तसेच ‘आई कुठे काय करते’ या सध्याच्या लोकप्रिय मालिकेतील संजना म्हणजे अभिनेत्री रुपाली भोसले सगळ्यांना चांगलीच परिचयाची आहे. रुपाली व्यायाम आणि योगा करण्याचा आपला नेम कधीही मोडत नाही. सध्या त्यांच्या मालिकेच्या शूटिंगसाठी ती घरापासून दूर असली तरी रुपाली सेटवरील तिच्या सहकाऱ्यांना सोबत घेत व्यायाम आणि योगा करते. तिने काही दिवसांपूर्वी सेटवरील योगा करतानाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

रिंकू राजगुरू

रिंकू राजगुरुला सैराट चित्रपटातून प्रचंड प्रसिद्धी मिळाली. सैराटच्या आर्चीवर जगभरातील प्रेक्षकांनी भरपूर प्रेम केलं. सध्या जिम्स बंद असल्यामुळे सर्वांची लाडकी आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरूनेही घरीच वर्कआऊट करण्याला प्राधान्य दिलं आहे. योगाच्या मदतीने तिने स्वत:मध्ये मोठा बदल घडवून आणला आहे. रिंकूने वजन कमी करत फिटनेसकडे लक्ष दिलंय. सोशल मीडियावरील तिच्या छान छान फोटोंमधून रिंकूमधील हा बदल आपण पाहू शकता.

फोटो सौजन्य :  इन्स्टाग्राम (सर्व फोटो)

परमहंस सत्यानंद सरस्वती यांनी म्हटल्यानुसार, योग हा कालचा वारसा, आजची गरज आणि उद्याची संस्कृती आहे. आपणही हा वारसा जपत आपली आजची स्वास्थ्याची गरज पूर्ण करूया.

आजच्या सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच प्रत्येक देश, प्रत्येक समाज आणि प्रत्येक व्यक्ती स्वस्थ असावा, अशी कामना देखील या दिवसाच्या निमित्तानं पंतप्रधानांनी केली आहे. माझी सहेलीच्या सर्व वाचकांना जागतिक योग दिवसाच्या अनेक शुभेच्छा