आंघोळीची मजा आणि रंजक इतिहास (Interesting Facts...

आंघोळीची मजा आणि रंजक इतिहास (Interesting Facts In The History Of Bathing)

उन्हाळा इतका कडक आहे की, शरीराचा दाह मिटविण्यासाठी दिवसातून अनेक वेळ आंघोळ (History Of Bathing) करणे गरजेचे ठरते. अंगाचा चिकचिकाट, दाह सहन होत नसल्याने, अन् रिकामा वेळ असल्यानेही अनेक वेळा आंघोळ करणारे बरेच लोक आहेत. पण दिवसातून दोनदा आंघोळ करणे हे ‘मस्ट’ असल्याचे मानणारे त्याहून जास्त लोक आहेत. म्हणजे नेहमीची सकाळची आंघोळ अन् संध्याकाळी कामावरून परत आल्यानंतर घामेजलेले अंग स्वच्छ करण्यासाठी, ‘फ्रेश’ होण्यासाठी हे दोन वेळचे नहाणे त्यांना गरजेचे वाटते. पण एकापेक्षा अनेक वेळा आंघोळ करणे ही मोठ्या शहरातील लोकांची चैन झाली. जिथे पाणीटंचाई असते, पाण्याचे दुर्भिक्ष्य असते, तेथील लोकांचं काय? त्यांना ही चैन परवडणारी नसते.
आता मोदी सरकारने खेडोपाडी जलयोजना सुरू केल्याने कित्येक खेडेगावातून पाणी पुरवठा सुरळीत झाला आहे. परंतु पूर्वी परिस्थिती अशी नव्हती. गावाकडचे लोक नदीत, तलावात किंवा विहिरीत पोहून आपले स्नान उरकत असत. मात्र काही ठिकाणी हे पाणवठे उन्हाळ्यात कोरडे पडल्याने त्यांचेही वांधे होत असत.

उघड्यावर आंघोळ
आधीच सांगितल्याप्रमाणे मोठ्या शहरांमध्ये पाणी पुरवठा व्यवस्थित असल्याने बाथरुममध्ये शॉवर, नळाखाली आंघोळ करता येते. गरम पाणी देणारे हिटर, गिझर यांनी पाण्याचा बंब मोडीत काढला आहे. अजूनही छोट्या गावातील, छोट्या घरात चुलीवर पाणी गरम केले जाते. तिथे ना हिटर-गिझर ना गॅसच्या शेगड्या. बाथरुम अर्थात् बंदिस्त न्हाणीघरे नव्हती, तेव्हा लोक उघड्यावरच आंघोळ करत असत. मात्र आतासारखे बाथरुममध्ये उघडेबंब होऊन त्यांना आंघोळ करता येत नसे. स्त्रियांनी तर आपले अंग उघडे पडू न देता, साडी लपेटून उघड्यावर राहण्याचं कसब अंगी बाणवलं होतं. मात्र प्राचीन काळात, चंद्रगुप्ताच्या राजवटीत ग्रीकांनी आपल्या भूमीवर पाऊल ठेवलं. तेव्हा नदीच्या डोहात स्त्रियांना मुक्तपणे, नग्नावस्थेत स्नान करताना पाहून त्यांना अचंबा वाटला होता. मात्र त्यांना कुणी छेडणारं नव्हतं, ही जमेची बाजू होती. त्या काळात साबण नव्हते. त्यामुळे उन्हाचा दाह शमविण्यासाठी अंगाला चिखल फासून किंवा चंदनाची उटी लावून लोक आंघोळ करत असत.
सहारा वाळवंटात किंवा आखाती देशात, जुन्या जमान्यात राहणार्‍या लोकांना आंघोळ करणे माहितच नव्हते म्हणा ना! कारण पाणीच नसायचे. त्यामुळेच आठवड्यातून एकदा, जुम्मे के जुम्मे, आंघोळ करण्याची प्रथा पडली होती. ती काही ठिकाणी अद्यापही आहे.


पाश्‍चात्यांची व्यथा
पाश्‍चात्य देशातील लोकांची हीच व्यथा होती. आता जरी गरम पाण्याचे गिझर व शॉवर्स उपलब्ध असले तरी पूर्वी ते नव्हते. पश्‍चिमेकडील देशात अतिशय थंड हवामान असल्याने आंघोळीची गोळी घेतल्यावाचून त्यांना गत्यंतर नव्हते. एकतर अतिशय थंड, म्हणजे शून्य अंशाखालील हवामान, वरून पाण्याची टंचाई. त्यामुळे ते फक्त चेहरा, हात, पाय पाण्याने साफ करत असत; असं इतिहास सांगतो. त्यामुळे त्यांच्या अंगास दुर्गंधी येत असे. त्यातूनच डिओडरंट त्यांनी शोधून काढले. जे आज सर्वत्र वापरले जाते. आंघोळ करणारे व न करणारे देखील वापरतात.

पाणी व थंडी याचा परिणाम पाश्‍चात्य देशांमध्ये एवढा होता की, ते सकाळी उठल्यावर तोंड धुवत नसत. परिणामी त्यांना दंतरोग होत. त्यावर उपाय म्हणून माऊथवॉश, त्यांनी शोधून काढले. कोळशावर पेटणारे स्टोव्हज् त्याकाळी वापरले जात. त्यावर पाणी तापवून आंघोळ करणे, हे श्रीमंतीचं लक्षण समजलं जात होतं. त्याचप्रमाणे अगदी घरात काही धार्मिक विधी करायचे असतील, तर अशी गरम पाण्याची आंघोळ केली जात होती. तीही घरातील बाथटबमध्ये, जे बेडरूममध्ये ठेवले जात असे. अगदी ब्रिटनच्या महाराणीचा जो बकिंगहॅम पॅलेस आहे, त्यामध्ये सुद्धा बाथरूम 13व्या शतकात तयार करण्यात आले, असं इतिहास सांगतो.

सार्वजनिक स्नानगृहे
ग्रीक आणि रोमन लोकांकडे सार्वजनिक स्नानगृहे होती. मात्र तिथे आंघोळी करायला काही पैसे आकारले जात. ते सर्वसामान्य लोकांना परवडत नव्हते. तेव्हा ते आंघोळीशिवायच राहत होते. जेव्हा पाण्याचे नळ आणि गॅस व इलेक्ट्रिक हिटर्स जन्माला आले, तेव्हा पश्‍चिमेकडील लोक आंघोळीचा लाभ उठवू शकले. समुद्रकिनारी राहणार्‍यांनी समुद्रस्नान आरंभले. आता बिकीनी घालून किंवा निर्वस्त्र होऊन, समुद्रकिनारी सनबाथ घेण्याचे फॅड जोरात आहे.
परदेशात आणि आपल्याकडे देखील पाण्याचे पाईप आणि नळ उपलब्ध झाले तेव्हा न्हाणीघरे घराच्या आत आली. उघड्यावरची आंघोळ थांबली. न्हाणीघरात एक बादली, पाणी अंगावर घेण्यासाठी भांडे – जे बहुधा तांब्या-पितळेचे असायचे, एवढी सामग्री असायची. हळूहळू त्यात बदल होऊन शॉवर आले. बाथटब आले. शॉवर नंतर हॅन्ड शॉवर आले नि जेट शॉवर पण आले. बंद बाथरुममध्ये वाफेने आंघोळ करण्याची पण पद्धत आली. आजारी माणूस तब्येतीने अशक्त होतो. त्याला आंघोळ झेपणार नाही, म्हणून स्पंज बाथ निर्माण झाले.

आंघोळीच्या प्रकारांमध्ये हळूहळू क्रांती झाली. अन् उघडे न्हाणीघर तसेच धबधबा, नदी, डोह, तलाव आणि विहिरीतील आंघोळी बाद झाल्या. नाही म्हणायला सहलीला जाणारे नदी, तलाव, समुद्रात स्नानाचा आनंद घेतात. मौजमजा करतात. लहानमोठ्या हॉटेलात स्वीमिंग पूल असतात, त्यातही पोहून आंघोळीची मजा लुटतात.