राज कपूरची टॅक्सी अचानक हवेत उडू लागली… क...

राज कपूरची टॅक्सी अचानक हवेत उडू लागली… कसा घडला हा चमत्कार? (Interesting Facts About Showman Raj Kapoor)

हिंदी चित्रसृष्टीतील शोमन म्हणून प्रसिद्धीस पावलेला राज कपूर परदेशातही लोकप्रिय झाला होता. त्याच्यावर चाहते अलोट प्रेम करत होते. असाच एकदा तो रशियाला गेला असताना, अचानक त्याची टॅक्सी हवेत उडू लागली… हा काय प्रकार आहे, ते राजला पण कळेना… पण सत्य समजलं तेव्हा तोही चांगलाच चकित झाला.

राज कपूरला नट व्हायचं नव्हतं

राज कपूरंच पूर्ण नाव रणबीर राज कपूर असं होतं. त्याचा जन्म इथला नाही. तो पाकिस्तानात, पेशावर येथे जन्मला. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण, राजला नट व्हायचं नव्हतं. तो संगीत दिग्दर्शक बनू इच्छित होता. पण अपघाताने तो रुपेरी पडद्यावर आला आणि इतका चमकला की त्याचे लाखो चाहते निर्माण झाले. पुढे तो दिग्दर्शकही झाला. अन्‌ अभिनेता – दिग्दर्शक राज कपूरने हिंदी सिनेमाचे रूप पालटून टाकले. त्याने एकाहून एक सरस चित्रपट दिले.

राज कपूरने थोबाडीत खाल्ली होती

आपली चित्रपट कारकीर्द राज कपूरने केदार शर्मा यांच्याकडे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून केली. शूटिंगच्या दरम्यान राजने एका नटाच्या इतक्या जवळ जाऊन क्लॅप दिली की, त्याची नकली दाढी क्लॅपमध्ये अडकून खाली पडली. दिग्दर्शक केदार शर्मा यांना राग अनावर झाला आणि त्यांनी राजच्या थोबाडीत मारली.

लहान वयात मोठी स्वप्नं त्यानं पाहिली

क्लॅपर बॉय म्हणून कारकीर्द सुरू केलेल्या राज कपूरने वयाच्या २४ व्या वर्षीच आर. के. फिल्म्स्‌ ही चित्रपट निर्मिती कंपनी सुरु केली. अभिनय कला त्याने आपले पिताजी पृथ्वीराज कपूर यांच्याकडून शिकली, पण दिग्दर्शनाची कला स्वतःहून शिकला. २४ व्या वर्षीच तो दिग्दर्शक झाला आणि ‘आग’ हा पहिला चित्रपट त्याने बनवला. त्यात तो नायकही झाला. त्याची नायिका होती नर्गिस. त्या दोघांमध्ये एक असे दृश्य चित्रित झाले की, जे पुढे आर. के. स्टुडिओचे बोधचिन्ह ठरले.

राज – नर्गिसची प्रेमकहाणी अशी सुरू झाली

राज – नर्गिसची प्रेमकहाणी, बॉलिवूडची सर्वाधिक प्रसिद्ध आहे. पहिल्या भेटीतच राज, नर्गिसच्या प्रेमात पडला होता. मात्र त्यांच्या या प्रेमप्रकरणाचा राज कपूरच्या संसारात त्रास झाला होता. राज कपूरच्या पत्नीचे नाव कृष्णा होते. त्यांना ५ मुले झाली. पण नर्गिसच्या प्रेमात राज इतका गुरफटला होता की, बरेच दिवस घरी नसायचा. राज आपल्यावर खूप प्रेम करत असला तरी, आपल्यासाठी तो पत्नी व मुलांना सोडणार नाही, हेही ती जाणून होती. म्हणूनच ती स्वतःहून राज व कृष्णा यांच्यापासून दूर झाली. पुढे तिने सुनील दत्तशी लग्न केलं.

रशियात त्याची टॅक्सी हवेत उडू लागली…

‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटासाठी रशियन सर्कसचे शूटिंग करण्याबाबत बोलणी करण्यासाठी राज कपूर मॉस्को शहरात (रशिया) गेला होता. आगाऊ सूचना न  देता राज मॉस्कोला पोहचला होता. त्यामुळे त्याच्या स्वागताला कोणीही आलं नव्हतं. म्हणून राज कपूर विमानतळावरून बाहेर पडला नि टॅक्सीत बसला अन्‌ त्याच्या लक्षात आलं की, त्याची टॅक्सी रस्त्यावरून चालण्याऐवजी हवेत उडते आहे. तो चांगलाच चपापला. नंतर त्याने बाहेर वाकून बघितलं, तर विमानतळावर देखील त्याचे चाहते होते आणि त्यांचे प्रेम इतके दाटून आले होते की, त्यांनी ती टॅक्सी उचलून धरली होती व ती खांद्यावर घेऊन ते चालत होते. आपल्याकडे कलाकारांचे चाहते त्यांना डोक्यावर घेतात. रशियाच्या चाहत्यांनी राजची टॅक्सीच डोक्यावर घेतली होती. चाहत्यांचं असं अलोट प्रेम राज कपूरला लाभलं होतं.