मुलांशी मैत्री करताना….(Instead Of Parents, Bec...

मुलांशी मैत्री करताना….(Instead Of Parents, Become Friends Of Your Children)

मुलांशी मैत्री करताना….


बर्‍याचदा पालक आदर्श पालक होण्याच्या प्रयत्नात मुलांवर परफेक्ट होण्याचं विनाकारण ओझं टाकत असतात. वास्तविक आयुष्यात कुणीच परफेक्ट नसतं अगदी पालक सुद्धा. मुलांवर अपेक्षांचं ओझं टाकल्यामुळे नकळत पालक मुलांपासून दूर जातात. यासाठीच आयुष्यभर मुलांनी तुमचं ऐकावं असं वाटत असेल तर आधी त्यांचे चांगले मित्र बना.
आजच्या आधुनिक काळात यंत्र, संगणक यांच्या सहाय्याने मानव अनेक कार्यं आणि कर्तव्यं चुटकीसरशी पार पाडत असतो. परंतु पालकत्व हे असे कार्य आहे की जे यांच्यामार्फत करता येत नाही. पालकांचे तन, मन आणि धन यात गुंतावे लागते. तरीही त्यात त्रुटी राहतातच. म्हणूनच प्रत्येक पालकाने केवळ कर्तव्य म्हणून आपले काम न करता, आपण आपल्या मुलांच्या आयुष्याचे शिल्पकार आहोत, त्यांचे भविष्य आपल्या हातात आहे, हे न विसरताच आपले कार्य केले पाहिजे.
पालकत्त्व ही खूप मोठी आणि नाजूक जबाबदारी आहे. बर्‍याचदा पालक आदर्श पालक होण्याच्या प्रयत्नात मुलांवर परफेक्ट होण्याचं विनाकारण ओझं टाकत असतात. वास्तविक आयुष्यात कुणीच परफेक्ट नसतं अगदी पालक सुद्धा. पण तरीदेखील पालकांना नेहमी मुलांनी अभ्यासात, इतर अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये नेहमी अव्वलच असावं असं वाटत असतं. मुलांवर अपेक्षांचं ओझं टाकल्यामुळे नकळत पालक मुलांपासून दूर जातात. यासाठीच आयुष्यभर मुलांनी तुमचं ऐकावं असं वाटत असेल तर आधी त्यांचे चांगले मित्र बना.


अनेक पालकांना असे वाटते की, इतरांशी तुलना केल्यानं मुलांना प्रोत्साहन मिळेल आणि मुलं अधिक मेहनत करायला लागतील, परंतु अशी ही तुलना तुम्हाला जरी योग्य वाटत असली तरी ती तुमच्या मुलांना योग्य वाटते का? किंवा तुमची मुले ही तुमच्यासारखाच विचार करतात का? हे सर्व आणि त्यांच्या सर्व समस्या जाणून घेण्यासाठी त्यांचे मित्र व्हा आणि मग त्यांच्या बाजूने विचार करा.

इतरांशी तुलना केल्याने प्रोत्साहन मिळत नाही, दडपण येते
अभ्यास म्हटले की आपसूकच पालक आणि मुलांचे नाते पुढे उभे राहते. परीक्षेच्या काळात तर मुलांएवढेच दडपण पालकांनी घेतलेले असते. कधी कधी तर असे वाटते की विद्यार्थी हे स्वत:साठी नाही तर समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठीच मेहनत घेतात. पालकांना वाटतं की मुलांची इतरांशी तुलना केली की, त्यांना प्रोत्साहन मिळेल. ओळखीतील समवयीन मित्रांशी किंवा भावंडांशी होणारी तुलना ही मुलांसाठी खूप भीतीदायक आहे. मग तो वर्गात पहिला क्रमांक पटकावणारा असो किंवा काठावर पास होणारा विद्यार्थी असो. प्रत्येकाला परीक्षेचे दडपण येतंच.
उदा. बघ तो विजू किती हुशार आहे, तो खेळण्यात वेळ घालवत नाही. दररोज अभ्यास करतो आणि तू परीक्षा जवळ आली तरी अभ्यासाचे नाव घेत नाही. यावेळी तुला भरपूर अभ्यास करून त्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळायला हवेत.

मुलांचे मित्र बनून त्यांना मार्गदर्शन करा
अशी एक ना अनेक उदाहरणे पालक त्यांच्या मुलांना देत असतात. या सर्वांमागचा उद्देश मात्र एकच मुलांना जास्त मार्क्स मिळावेत आणि पुढील आयुष्यात त्यांचे करिअर चांगले व्हावे.
जवळपास प्रत्येकच पालकांची ही सवयच असते की आपल्या मुलांना अभ्यास करायला भाग पाडण्यासाठी इतरांच्या मुलांशी तुलना करावी जेणे करून मुले अभ्यासाला बसतील. एक प्रकारे पालकांना त्याच्या मुलांच्या करिअरविषयी असलेली अमाप चिंता यातून व्यक्त होते. परंतु यात बळी जातात ती त्यांचीच मुले. खरे पाहता मुलांना विश्वासात घेऊन त्यांचे मित्र बनून त्यांना योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे असते. योग्य मार्गदर्शनामुळे मुलांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या प्रगतीत मदत करायला हवी. इतरांची तुलना करुन नाही.
इतरांशी तुलना केल्याने मुले तुमच्या पुढे जरी जोमाने अभ्यास करताना दिसत असली तरी मनातून मात्र ती खूप दडपणातून जात असतात. सतत तुलना केल्याने मुलांवर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो. म्हणून तुम्ही जर तुमच्या मुलांशी असे वागत असाल तर या पुढे असे न वागता. त्यांच्याशी घनिष्ठ मैत्री करून त्यांच्या अभ्यासातील समस्या जाणून घ्या आणि त्यांच्या प्रगतीत त्यांना साथ द्या.
पालकांची ही सवय मुलांना नैराश्यात नेऊ शकते


पालकांची दुसरी एक हानिकारक सवय अशी असते की ते सतत मुलांना त्यांच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलून दाखवतात. त्यांच्या शिक्षणासाठी किती खर्च केला हे बोलत असतात. मुलांना सतत जाणीव करून देतात की त्यांच्या शिक्षणासाठी आई-वडिलांना खूप कष्ट करावे लागलेत वगैरे- वगैरे. पण या सर्व बाबी बोलल्यामुळे मुलांवर आणखी दडपण वाढण्याची शक्यता असते. त्यातच जर मुलांना अभ्यासात अपयश आले तर ती जास्त नैराश्यात जातात. माझ्याकडून आयुष्यात काहीच होऊ शकणार नाही. मी आई-वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करू शकणार नाही. माझ्या शिक्षणासाठी त्यांनी केलेले कष्ट मी वाया घालवलेत. असे एक ना अनेक विचार मुलांना नैराश्याकडे नेण्यास कारणीभूत ठरू शकतात.
प्रत्येक पालकाने हे लक्षात घ्यायला हवे की, उच्च शिक्षण घेऊनच माणूस मोठा होतो असं नाही. मुलांना जर अभ्यासा व्यतिरिक्त इतर कुठल्याही क्षेत्रात आवड असेल तर त्यांच्यावर अभ्यासाची जबरदस्ती करू नका. याचा अर्थ मुलांना अजिबातच अभ्यास करू नका असे सांगा असे नाही. तर थोडेफार मार्क्स मिळवण्याइतपत त्यांनी नक्कीच अभ्यास करायला हवा, मात्र कुठलेही दडपण न घेता. मुलांना सतत प्रोत्साहन द्या. बघा ती नक्की यशस्वी होतील.

मुलांशी मैत्री करण्यासाठी खालील सोप्या टिप्स अवलंबा…
मुलांशी मैत्री करणं सोपं असतं. मात्र त्यासाठी मुलांसमोर तुम्ही नेहमी खरंच वागायला हवं. कारण मुलं तुमचं ऐकतात कमी मात्र तुमचं शंभर टक्के अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. मुलांचे प्रत्येक प्रश्न, त्यांच्या शंका, समस्या यांकडे लक्ष द्या. जरी तुम्हाला त्या सोडवता नाही आल्या तरी त्यांचे नीट ऐकून घ्या आणि त्यांना समजेल अशा शब्दात त्यांना उत्तर द्या. प्रत्येक पालकासाठी हा एक मोठा टास्क असतो. कारण मुलांचे प्रश्न कधी संपतच नाहीत. मात्र हा टास्क एकदा जमला की पुढचं सारं अगदी सोपं होतं.
तुमच्या घरातील, कामाच्या जबाबदार्‍या कितीही मोठ्या असल्या तरी पालकत्त्वाच्या जबाबदारीकडे दुर्लक्ष करू नका. कारण तुमची मुलं चांगली निपजण्यासाठी तुम्हाला त्यांच्यासाठी दररोज थोडा वेळ काढणं गरजेचं आहे.
जेव्हा तुम्ही मुलांच्या सोबत काहीतरी अ‍ॅक्टिव्हिटी करत असता तेव्हा तुमचे दुसरे कोणतेच काम करू नका. पूर्ण वेळ फक्त मुलांना द्या. त्यामुळे जरी तुम्ही त्यांना कमी वेळ दिला तरी तुम्ही पूर्ण वेळ त्यांच्यासाठी दिल्यामुळे त्यांच्यासोबत तुमचे चांगले बॉन्डिग तयार होईल. मुलांना तुमच्या इतर जबाबदार्‍या माहीत झाल्या तर ती स्वतःहून तुम्हाला सहकार्य करतील.
मुलांना आत्मनिर्भर करण्याच्या प्रयत्नात तुम्ही मुलांपासून दूर जाऊ शकता. कारण तुम्ही मदत केली नाही तर मुलं तुमच्या घरातील मदतनीस, मित्रमंडळी अशा इतर लोकांच्या मदतीची अपेक्षा करतील.
प्रत्येक मुलासाठी आधी त्याचे आईबाबा हेच एक उत्तम आदर्श असतात. प्रत्येकाला सुरुवातीला आपल्या आईबाबांप्रमाणेच व्हायचं असतं. यासाठी मुलांसमोर कधीच चुकीचे वागू नका. नाहीतर मुलं तुमचं कधीच ऐकणार नाहीत.
दररोज झोपण्यापूर्वी मुलांना जवळ घ्या. त्यांच्यासोबत प्रार्थना म्हणा. त्यांच्यावर भरपूर प्रेम करा. कारण मुलांना तुमच्या महागड्या गिफ्टपेक्षा सर्वात जास्त तुमचं प्रेम, स्पर्श यांची गरज असते.
घरातील छोट्या मोठ्या निर्णयामध्ये त्यांना सामावून घ्या. त्यांना तुम्ही घरातील जबाबदारीत सहभागी करून घेतल्यामुळे त्यांना तुमच्याबद्दल प्रचंड प्रेम आणि आदर वाटतो. जो आयुष्यभर कधीच कमी होत नाही.