डॉक्टर दीदीचा प्रेरणादायी प...

डॉक्टर दीदीचा प्रेरणादायी प्रवास (Inspirational Journey Of Doctor Didi)

आपल्या खेडेगावात आरोग्यसेवा उपलब्ध नाही म्हणून जिद्दीनं आरोग्य सेविकेचं व्रत घेऊन त्यांची सेवा करणार्‍या युवतीची ही प्रेरणादायी कहाणी.

तिचं नाव दर्शना दायत. ती सुविद्य डॉक्टर नाही. पण आपल्या गावातील लोकांच्या आजारपणावर औषधं देते. त्यांना बरी करते. त्यामुळे तिला लोक म्हणतात डॉक्टर दीदी! ती आहे कम्युनिटी हेल्थ वर्कर. अर्थात् आरोग्य सेविका. पालघर जिल्ह्यातील  गोराड या छोट्याशा खेडेगावात तिचं वास्तव्य आहे. दर्शनाच्या शब्दात सांगायचं तर, मला शाळेत जाण्यासाठी तासभर तरी चालत जावं लागायचं. शिवाय गावात डॉक्टर नाही की दवाखाना नाही. औषधाचं दुकान तर गावापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर. अशा प्रतिकूल परिस्थितीत जगत असताना तिच्या वडिलांना क्षयरोग जडला. घरातील हा कमावता पुरुष अंथरूणाला खिळला. दोन लहान भावंडांच्या भरणपोषणाची जबाबदारी दर्शनावर येऊन पडली. म्हणून शाळकरी वयातच तिला उदरनिर्वाहासाठी कामाला जुंपून घ्यावं लागलं. मात्र तरुणपणी एका सेवाभावी संस्थेनं तिला सकवार येथील रामकृष्ण व्होकेशनल ट्रेनिंग इंन्स्टिट्यूटमध्ये दाखल केलं. ही संस्था टाटा मोटर्सच्या आर्थिक मदतीवर चालते. इथे कम्युनिटी हेल्थ वर्कर या वर्षाच्या कोर्सला ती दाखल झाली. कार्य पूर्ण होताच आधी विरारच्या हॉस्पिटलमध्ये ट्रेनी म्हणून दरमहा 3500 रुपये पगारावर तिनं काम केलं.

तिथे विशेषतः ओपीडी विभागात अनेक रुग्णांवर तिनं औषधोपचार केले. अन् पुढे भांडुपच्या आजी केअर होममध्ये वयोवृद्ध रुग्णांची सेवा केली. केअर टेकर म्हणून आता तिला दरमहा 18 हजार रुपये मिळू लागले होते. 4 वर्षात ती आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व सक्षम झाली. अन् भावंडांच्या भरणपोषणाबरोबरच वडिलांना वाडा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करून त्यांना बरं करण्याची जबाबदारी पार पाडली. दर्शना आता सन्मानाचं जीवन जगते आहे. जो कोर्स तिनं रामकृष्ण मिशन आणि टाटा मोटर्सच्या मदतीने केला तो महिलांना प्रशिक्षित करणारा असून त्यामधून सुमारे 2300 युवक आज घडीला शिक्षित झाले आहेत. डॉक्टर दीदी दर्शनाचा प्रवास इतर युवतींना प्रेरणादायी ठरावा, असाच आहे.