भारताची मिसाईल वूमन (Inspirational Achievement ...

भारताची मिसाईल वूमन (Inspirational Achievement As Missile Woman Of India)

भारताची मिसाईल वूमन


‘भारतीय अंतराळ संशोधन संस्थे’च्या (इस्रो) आधिपत्याखालील ‘डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायजेशन’मध्ये कार्यरत असलेल्या डॉ. टेसी थॉमस यांना भारताची ‘मिसाईल वूमन’ म्हणून संबोधलं जातं. त्यांच्याविषयी-
विमान कसं उडतं?… याविषयीची उत्सुकता प्रत्येक लहान मुलाच्या मनात असते. डॉ. टेसी थॉमस यांच्या बालमनात मात्र रॉकेट घोंघावत होतं. लहानपणी, रॉकेट कसं बनतं? कसं उडतं? हे प्रश्‍न त्यांच्या मनात कुतूहल निर्माण करायचे. आणि त्यास कारणीभूत होतं, केरळमधील अलाप्पुझा या त्यांच्या जन्मगावाजवळ असलेलं थुंबा रॉकेट स्टेशन
1963 साली जन्मलेल्या डॉ. टेसी यांना लहानपणापासूनच गणित आणि भौतिकशास्त्राची प्रचंड आवड होती. त्रिसूर कॉलेजमधून अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर त्यांनी बालपणी पडलेल्या प्रश्‍नांच्या उत्तरातच आपलं करिअर शोधायचं ठरवलं. जग कॉम्प्युटरच्या मागे धावत होतं आणि टेसी मात्र एका वेगळ्याच क्षेत्रात डोकावत होत्या. मात्र कुटुंबीयांनी, विशेषतः टेसी यांच्या आईने त्यांना खूप प्रोत्साहन दिलं. आपल्या प्रश्‍नांचा माग घेण्यासाठी त्यांना प्रवृत्त केलं.

कलाम यांचं मार्गदर्शन

भारताची मिसाईल वूमन


टेसी यांनी पुण्याच्या ‘डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी’मधून गाईडेड मिसाईल टेक्नॉलॉजीमध्ये मास्टर पूर्ण केलं. ऑपरेशन मॅनेजमेंटमध्ये एम.बी.ए. आणि मिसाईल गाईडन्समध्ये डॉक्टरेट मिळवली. 1988 साली त्या ‘डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायजेशन’मध्ये रुजू झाल्या. भारतातील मिसाईल कार्यक्रमाचे जनक डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची त्यांना संधी मिळाली. डॉ. टेसी यांची अफाट बुद्धिमत्ता आणि अथक परिश्रम करण्याची वृत्ती लक्षात घेऊन डॉ. कलाम यांनी अग्नी क्षेपणास्त्राची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवली. 3000 किलोमीटरचा पल्ला असणार्‍या अग्नी-3 प्रोजेक्टच्या त्या असोसिएट डायरेक्टर होत्या, तर 5000 किलोमीटरपेक्षा जास्त पल्ला असणार्‍या अग्नी-5 या क्षेपणास्त्राच्या त्या प्रोजेक्ट डायरेक्टर बनल्या. अग्नी-5च्या निर्मितीमध्ये टेसी यांनी निर्णायक भूमिका निभावली होती. अग्नी-5च्या यशस्वी चाचणीनंतर भारत आंतरखंडीय क्षेपणास्त्र बनवू शकतो, यावर जगाने शिक्कामोर्तब केलं. भारतात पहिल्यांदाच एका स्त्री शास्त्रज्ञावर क्षेपणास्त्राच्या प्रोजेक्टचं प्रमुख पद सोपवण्यात आलं होतं. आणि डॉ. टेसी यांनी डॉ. कलाम यांचा हा विश्‍वास सार्थ करून दाखवला.
‘डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी’च्या एरोनॉटिकल सिस्टिमच्या महासंचालक असलेल्या डॉ. टेसी थॉमस यांच्याकडे आय.एन.ए.ई., आय.ई.आय, टी.ए.एस. यांसारख्या अनेक प्रतिष्ठित संस्थांची शिष्यवृत्तीही आहे. ‘लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार 2012’, ‘सर एम. विश्‍वेश्‍वरय्या पुरस्कार 2016’, ‘डी.आर.डी.ओ. परफॉर्मन्स एक्सलंस पुरस्कार’ 2011 व 2012 अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं आहे.
अग्नी-2, अग्नी-3, अग्नी-4 आणि अग्नी-5 या क्षेपणास्त्रांच्या निर्मिती आणि यशस्वी चाचणी करणार्‍या मुख्य टीममध्ये कार्यरत असणार्‍या, देशाच्या सुरक्षेसाठी अधिकाधिक लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रं विकसित करण्यासाठी नवनवीन कल्पना राबवणार्‍या डॉ. टेसी ‘आपण हे सर्व जागतिक शांततेसाठीच करत आहोत’ हे आवर्जून नमूद करतात.