”नवे लक्ष्य’ फेम इन्स्पेक्टर मोक्षद...

”नवे लक्ष्य’ फेम इन्स्पेक्टर मोक्षदाने दाखवला रिक्षावाल्यास इंगा (Inspector Mokshada Took Rickshawala On Task)

महाराष्ट्र पोलिसांचं चातुर्य आणि साहस यांची गोष्ट रंगवून सांगणारी मालिका ‘नवे लक्ष्य’ आजपासून स्टार प्रवाह चॅनलवर सुरू होत आहे. ही साप्ताहिक मालिका असून फक्त रविवारीच प्रक्षेपित होणार आहे. या मालिकेत पोलीस इन्स्पेक्टर मोश्रदा मनोहर मोहितेची भूमिका शुभांगी सदावर्ते ही कलाकार सादर करते आहे. ‘संगीत देवबाभळी’ या अत्यंत यशस्वी नाटकातून शुभांगी चमकली आहे. छोट्या पडद्यावर तडफदार पोलीस निरीक्षकाची भूमिका करणाऱ्या शुभांगीला प्रत्यक्ष जीवनात एका रिक्षावाल्याला अद्दल घडविण्याची संधी मिळाली.
रिक्षावाल्याला आपला इंगा कसा दाखवला, याबद्दल शुभांगीने अनुभव सांगितला, ”या मालिकेत मी पोलीस इन्स्पेक्टर मोक्षदाची भूमिका करते आहे. या पात्राला स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत प्रचंड राग आहे. खऱ्या आयुष्यातही जर अन्याय होताना दिसला तर माझ्यातली मोक्षदा जागी होते. काही दिवसांपूर्वीच असा प्रसंग घडला. शूटिंग संपवून मी रात्री उशिरा रिक्षाने घरी जात होते. त्या रिक्षावाल्याने मला जवळपास १ तास चुकीच्या दिशेनं फिरवलं. त्याच्या चुकीची जाणीव करून देण्यासाठी मी रौद्ररूप धारण केलं आणि पैसे दिलेच नाहीत. त्या रिक्षावाल्यासाठी हा कायमचा स्मरणात राहील, असा धडा असेल. अशा परिस्थितीत प्रत्येक महिलेने घाबरून न जाता धैर्याने सामना करायला हवा. मोक्षदा ही माझ्या मनाला भावणारी भूमिका आहे. पोलिसांविषयी मनात आदर होताच. ही मालिका करताना तो वाढला आहे.”

‘नवे लक्ष्य’ या महाराष्ट्र पोलिसांची शौर्यगाथा मांडणाऱ्या मालिकेत सोहम बांदेकर हा पोलीस सब-इन्स्पेक्टर जय सुवर्णा दीक्षितच्या भूमिकेत पहिल्यांदाच पदार्पण करतो आहे. टी.व्ही. वरील लाडके भावोजी आदेश बांदेकर व अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा हा सुपुत्र. आई-बाबांचे अभिनय गुण सोहमच्या अंगी उतरले नसते, तरच नवल होते. मात्र तोंडाला रंग लावण्यापूर्वी तो ‘ललित २०५’ या स्टार प्रवाह वरून प्रक्षेपित झालेल्या मालिकेचा निर्माता म्हणून पडद्यामागे वावरला आहे. त्याबद्दल तो सांगतो,” ‘ललित २०५’ या मालिकेच्या सेटवर मी निर्माता म्हणून हजर असायचो. त्यावेळी इतर कलाकारांचा अभिनय पाहून हा सीन मी कसा केला असता, याचा मनात अभ्यास करायचो. त्या अनुभवानंतर आता मी अभिनय करायला तयार झालो आहे.”

काही वर्षांपूर्वी सोहमच्या या निर्मितीसंस्थेने ‘लक्ष्य’ नावाची मालिका सादर केली होती. त्यामध्ये पोलीस खात्याच्या युनिट ८ ची शौर्यगाथा होती. आता या ‘नवे लक्ष्य’ मध्ये युनिट ९ची गाथा असेल. ५ जिगरबाज पोलिसांनी उकल केलेल्या गुन्हेगारी कथा यात असतील.