भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या मोहक साड्या ...

भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या मोहक साड्या (India’s Rich Culture Is Depicted On Sarees)

सणासुदीच्या दिवसात महिला वर्गांची पसंती साडी नेसण्याची असते. अगदी अत्याधुनिक पेहराव करणाऱ्या तरुण अथवा प्रौढ स्त्रीला सणवाराला साडी नेसायला खूप आवडते. आता श्रावण सुरू आहे; गौरी-गणपतीचे आगमन उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. तेव्हा साड्यांचा दिमाख दिसणार आहे.
साडी विश्वातील एका वेगळ्या ब्रॅन्डची ओळख करून देत आहोत. आंध्र प्रदेश आणि तेलंगण या राज्यातील ‘कंकटाला’ नामक ही साडी आहे. जिला ७८ वर्षांची परंपरा असून ती तिकडे लोकप्रिय आहे.

या साड्यांवर कलमकारी कलेने देवदेवता, हत्ती-घोडे असे प्राणी तसेच खेडेगावातील दृश्ये व हिरवा निसर्ग यांची डिझाइन्स आढळून येतात.

सौम्या कंकटाला या कंकटालांच्या तिसऱ्या पिढीतील तरुण कलावतीने या साड्यांमध्ये विविधता आणि कल्पकता आणली आहे. त्यासाठी ती देशातील खेडेगावात भ्रमंती करते, तेथील संस्कृती, कला यांचा अभ्यास करते व त्यातून मोहक डिझाइन्स निर्माण करते. दोन हातमागांच्या संगमातून या कंकटाला साड्या निर्माण होतात. त्यातून भारतीय प्राचीन कला व संस्कृतीचे दर्शन घडविले जाते.