ऑस्कर पारितोषिकासाठी पाठविण्लेयात आलेल्या छेलो ...

ऑस्कर पारितोषिकासाठी पाठविण्लेयात आलेल्या छेलो शो (लास्ट फिल्म शो) या भारतीय चित्रपटातील बालकलाकार राहुल कोळीचे निधन, चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधीच घेतला शेवटचा श्वास(India’s Oscar Entry ‘Chhello Show’ (The Last Film Show) Child Actor Rahul Koli Dies Of Leukemia)

या वर्षी ऑस्करसाठी भारताच्या छेलो शो (लास्ट फिल्म शो) या गुजराती चित्रपटाची निवड करण्यात आली. या चित्रपटात बालकलाकार राहुल कोळीने मुख्य भूमिका साकारली होती. पण दुर्देवाने चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधीच राहुलचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 10 वर्षीय राहुल कॅन्सरशी झुंज देत होता. अहमदाबाद येथील कॅन्सरसाठी असलेल्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार चालू होते. त्याला ब्लड कॅन्सर झाला होता.

या चित्रपटाची कथा एका लहान मुलावर आधारित असून सुरुवातीला चित्रपटाचे नाव छेलो शो ठेवले होते. पण नंतर ते बदलून लास्ट फिल्म शो असे ठेवण्यात आले. हा चित्रपट 2023 च्या ऑस्करसाठी पाठवण्यात आला होता. आपला चित्रपट ऑस्करसाठी गेल्यामुळे राहुलला खूप आनंद झाला होता. राहुलचे वडील रामू कोळी हे व्यवसायाने रिक्षा चालक आहेत. 14 ऑक्टोबरला चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आपले आयुष्य बदलेल या विचाराने राहुल खूप खुश होता.

चित्रपटाबद्दल बोलायचे झाल्यास हा एका आत्मचरित्रावर आधारित चित्रपट असून तो यूएस स्थित दिग्दर्शक पान नलिन उर्फ ​​नलिन पांड्या यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात राहुल मुख्य भूमिकेत होता, त्याच्याशिवाय चित्रपटात इतरही अनेक बालकलाकार आहेत. पण चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधीच चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या राहुलचा मृत्यू झाला. त्याच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे इंडस्ट्रीत शोक व्यक्त केला जात आहे.

राहुलच्या आजाराबाबत खुलासा करताना राहुलच्या वडिलांनी सांगितले की, त्याच्यावर सुमारे चार महिने उपचार सुरू होते.  शूटिंगनंतर जेव्हा त्याला हलकासा ताप येऊ लागला आणि औषध देऊनही तो बरा होत नव्हता तेव्हा आम्हाला त्याच्या कॅन्सरबद्दल कळलं. काल नाश्ता केल्यानंतर राहुलला खूप ताप आला. त्यानंतर त्याला रक्ताच्या उलट्या झाल्या, आणि त्याचा मृत्यू झाला.