गुरुपौर्णिमा विशेष भागात आज शिष्याच्या हाकेला ध...

गुरुपौर्णिमा विशेष भागात आज शिष्याच्या हाकेला धावून येणार गुरुमाऊली : घडवणार अमरनाथ दर्शन (In Guru Paurnima Special Episodes Today, Guru Will Come To The Rescue Of Disciple)

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म …. भक्ताला परमेश्वराची ओळख गुरूमुळेच होते. त्यामुळे परमेश्वर आणि गुरू यांपैकी आधी नमस्कार कुणाला करावा हा प्रश्न आपल्याला नेहेमीच पडतो. गुरुच्या थोरवीचे काही शब्दांत वर्णन करता येणे अशक्यच ! गुरू-अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून ज्ञानाच्या, प्रकाशाच्या वाटेकडे घेऊन जातात. गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर, या पृथ्वीतलावर परमेश्वर येऊ शकत नाही त्यामुळेच या वाट चुकलेल्या भक्तांना मार्ग दाखविण्यासाठी त्याने अनेक रूपं धारण केली. अनेक पीडितांच्या दु:खाचे निवारण केले, वाट चुकलेल्यांना सदगुरूंनी मार्ग दाखविला.

संपूर्ण महाराष्ट्रात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आजारी केली जाते. कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ आणि योगयोगेश्वर जय शंकर मालिकेमध्ये देखील गुरुपौर्णिमा विशेष भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. शिष्याच्या हाकेला साक्षात गुरुमाउली धावून येणार आहे.

योगयोगेश्वर जय शंकर मालिकेमध्ये आपण बाल शंकर यांना अनेक गोष्टींचा साक्षात्कार होताना बघितलं आहे. अनेक गरजूंना मदत करताना बघितलं आहे. अनेक चमत्कार आणि त्यांच्या अनेक बाल लीला बघितल्या आहेत. आता बाल शंकर महाराज त्यांच्या मामाची स्वप्नपूर्ती करण्यासाठी स्वामी समर्थांना साकडं घालताना दिसणार आहेत, “स्वामी मी शब्द दिला आहे मामाला, त्याला अमरनाथचं दर्शन इथेच होईल म्हणून”. बाल शंकर यांच्यासमोर देखील हे खूप मोठं आव्हान असणार आहे की, गावातील कपटी मार्तंड आणि त्याच्या टोळीचा कट मोडून काढून त्याच्या मामाची इच्छा पूर्ण करणे. आजवर त्यांनी मार्तंडचे अनेक डाव मोडीत काढले आहेत… बघूया बाल शंकर महाराज कसे त्यांच्या मामाला दिव्य अमरनाथ दर्शन घडवून आणण्यात यशस्वी होतील.

दुसरीकडे जय जय स्वामी समर्थ मालिकेमध्ये देखील गुरुपौर्णिमा विशेष भाग बघायला मिळणार आहे. स्वामींचे म्हणणे आहे, गुरुचरणी संपूर्ण श्रध्देने समर्पित झाल्यास सर्व काही शक्य असते. भक्ताच्या हाकेला साद घालत पुन्हा एकदा भक्ताचे तारणहार होणार आहेत. रामाचार्य स्वामी समर्थांना सर्वांसमोर हार मानण्यास सांगतात कारण कोणीएक श्रीकृष्ण मयतापाशी बसून त्याला उठवायचे म्हणतो आहे. स्वामी नक्कीच त्याच्या मदतीला धावून येतील असा त्याचा विश्वास आहे. स्वामींची लीला पुन्हा एकदा बघायला मिळणार आहे. तुळशीचे पान मयताच्या मुखात ठेवताच मृत माणूस पुन्हा एकदा उठून बसतो.

ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे । त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे ।

मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी । तेथे तुझे सदगुरु पाय दोन्ही ॥