माहीत असायला हवं असं काही&#...

माहीत असायला हवं असं काही… (Importance Of Republic Day)

26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन. यंदा आपण 71 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत. त्यानिमित्ताने प्रत्येक भारतीय नागरिकाला माहीत असायला हवं असं काही…
ब्रिटिशांच्या जोखडातून भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. हा दिवस देशभरात ‘स्वातंत्र्य दिन’ म्हणून साजरा केला जातो. तत्पूर्वी 26 जानेवारी 1930 रोजी लाहोरमध्ये पार पडलेल्या अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा फडकवून संपूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. म्हणून राज्यघटनेच्या अंमलबजावणीसाठी 26 जानेवारी हा दिवस निश्‍चित करण्यात आला होता. त्यानुसार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली भारताची राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली. भारतात लोकशाहीचं एक नवं पर्व सुरू झालं. लोकशाही म्हणजे, लोकांनी लोकांसाठी लोकांचं चालवलेलं राज्य. हा अधिकार भारताच्या घटनेनुसार 26 जानेवारी 1950 साली मिळाला, म्हणून हा दिवस ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणून ओळखला आणि साजरा केला जातो. त्यानिमित्ताने प्रत्येक भारतीय नागरिकाला माहीत असायला हवं असं काही…

  • संविधान 26 जानेवारी 1950 रोजी सकाळी 10 वाजून 18 मिनिटांनी लागू करण्यात आलं.
  • भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वांत मोठं लिखाण आहे. त्यात 22 भाग आणि 12 परिशिष्टांमध्ये विभागलेले 444 कलमं आहेत.
  • संविधान तयार करण्यासाठी 2 वर्षं 11 महिने आणि 18 दिवस लागले.
  • संविधानाच्या दोन प्रती हाताने लिहिण्यात आल्या होत्या. भारतीय संविधानाच्या हिंदी आणि इंग्रजी भाषेतील या हस्तलिखित प्रती संसद भवनात ठेवण्यात आल्या आहेत.
  • भारतीय संविधानाच्या हस्तलिखित प्रतींवर 24 जानेवारी 1950 साली 308 लोकसभा सदस्यांनी सही केली होती.
  • 26 जानेवारी 1950 रोजी डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती.
  • प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर 21 तोफांची सलामी दिली जाते.
  • प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाची परंपरा 1955 सालापासून सुरू झाली.
  • देशातील पहिली परेड इंडिया गेट आणि राजपथ यांच्यामध्ये न होता, त्याजवळील निर्वान स्टेडियममध्ये निघाली होती. हे स्टेडियम आता मेजर ध्यानचंद स्टेडियम म्हणून ओळखले जाते. हा समारंभ दुपारनंतर साजरा करण्यात आला होता. 

राष्ट्रपतींची बग्गी
– राष्ट्रपती सध्या वापरत असलेली बग्गी स्वातंत्र्यपूर्व काळात व्हॉइसरॉय किंवा गव्हर्नर जनरल वापरत होते.
– फाळणीच्या वेळी अनेक वस्तू आणि वास्तूंचीही वाटणी करण्यात आली. गव्हर्नर जनरलच्या या बग्गीवर दोन्ही देशांनी हक्क सांगितला होता. शेवटी नाणेफेक करून निर्णय झाला. गव्हर्नर जनरलच्या सुरक्षा दलातील कमांडंटनी ही नाणेफेक केली होती.
– राष्ट्रपतींच्या या बग्गीला भारतीय आणि ऑस्ट्रेलियन जातीच्या मिश्र संकराचे घोडे वापरले जातात.
– 1984 सालापर्यंत या बग्गीचा वापर राष्ट्रपती करत होते. त्यानंतर तो वापर थांबवण्यात आला होता. मात्र माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या काळात बग्गीचा वापर पुन्हा सुरू करण्यात आला.