मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व (Importance Of Mar...

मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व (Importance Of Margshirshya Month)

‘मासांना मार्गशीर्षो ऽ हम्’ या वचनाने गीतेत मार्गशीर्ष महिन्याचा गौरव केलेला आहे. या महिन्याच्या पौर्णिमेस किंवा मागेपुढे मृगशीर्ष नक्षत्र असते. यावरुनच या मासास मार्गशीर्ष असे नाव पडले आहे. केशव ही या महिन्याची अधिदेवता आहे. आजपासून मार्गशीर्ष मासाला प्रारंभ झाला असून आज या महिन्यातील पहिला गुरुवार आहे. यंदा मार्गशीर्षाचा पहिलाच वार गुरुवार आल्याने या मासात २४ नोव्हेंबर, १ डिसेंबर, ८ डिसेंबर, १५ डिसेंबर व २२ डिसेंबर या दिवशी पाच गुरुवार येणार आहेत. हिंदू धर्मियांमध्ये व विशेषतः महाराष्ट्रात मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी वैभव लक्ष्मी व्रत करण्याची मान्यता आहे.

दर गुरुवारी महालक्ष्मीचे पूजन करून घट मांडण्याची पद्धत प्रचलित आहे. तसेच या महिन्यात सवाष्णींना वाण देण्याला अन्‌ कन्या पूजेला विशेष महत्त्व आहे. मार्गशीर्ष गुरुवारी लक्ष्मी घटपूजनानंतर महालक्ष्मी व्रताच्या कथेचे पठण करण्याची पद्धत आहे. या दिवशी उपवास केला जातो. संपूर्ण महिलावर्गासाठी आनंदी, उत्साही आणि भक्तीमय असा हा महिना असतो.

जे कुणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील, त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल. पण श्रीमंती आल्यावरसुद्धा माणसाने उतू नये, नित्य नेमाने श्री महालक्ष्मीचे व्रत करावे. देवीचे मनन-चिंतन करावे. म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील. तुमची कामना पूर्ण करील, असे मानले जाते.

असे केले जाते मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत

आंब्याच्या डहाळ्या, चौरंगावर मांडलेला पाण्याने भरलेला कलश आणि महालक्ष्मीचे रुपात स्थापना केली जाते.

या कलशाला सजवून आरास केली जाते. यानंतर स्तुतिपाठ, आरती, नैवेद्य दाखवला जातो.

या व्रतासाठी आंब्याचे डहाळे, पाच पत्री, पाच फळे, महालक्ष्मीसाठी सुवासिक वेणी, नारळ या गोष्टी मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रतासाठी लागतात.

लक्ष्मीला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. स्रिया मनोभावे लक्ष्मीची कथा वाचतात. कुटुंबात धनधान्य आणि लक्ष्मीची कायम भरभराट राहावी यासाठी ही पूजा महिलांकडून केली जाते.

दर गुरूवारी नेमाने केल्या जाणाऱ्या या पुजेचे शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते. या दिवशी हळदीकुंकू देऊन सवाष्णींना फळे तसेच इतर वाण दिले जाते.

मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवशी देवदिवाळी किंवा मोठी दिवाळी साजरी होते. मुख्यत: चित्तपावनांमध्ये कुलदैवत, ग्रामदैवत यांना भजण्याचा हा दिवस. चित्तपावनांमध्ये या दिवशी प्रामुख्याने वडे-घारग्यांचा किंवा आंबोळीचा नैवेद्य असतो. प्रत्येक कुटुंबानुसार नैवेद्यांची संख्या वेगळी असते. गावातील मुख्य देवता, इतर उपदेव-देवता महापुरुष, वेतोबा, ग्रामदेवता इत्यादींना हे नैवेद्य दाखवले जातात. त्याचबरोबर काही कुटुंबांत पितरांसाठीही वेगळा नैवेद्य बाजूला काढून ठेवतात.

त्याच दिवशी मल्हारी नवरात्रही सुरू होते. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत चंपाषष्ठीचे नवरात्र असते. जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा होतो. कुलाचाराप्रमाणे पूजेत सुघट व टाक असतात. नवरात्राप्रमाणेच रोज माळा वाढवत घाटावर लावायच्या असतात. सहा दिवस नंदादीप लावतात.

मणीसूर-मल्लासूर दैत्यांचा संहार करण्यापूर्वी श्रीशंकराने ‘मार्तंड भैरव’ अवतार धारण केला. त्या युद्धात विजयासाठी त्याच दिवशी सप्तर्षींनी एक प्रतिष्ठान स्थापले व त्यावर ते रोज एक माळा चढवत होते. सरतेशेवटी शंकराचा विजय झाला. म्हणून देवांनी मार्तंड भैरवावर भंडारा उधळला, त्यावर चंपा फुलांची वृष्टी केली. तो दिवस शुद्ध षष्ठीचा होता. म्हणून चंपाषष्ठीला नवरात्र उठते अशी कथा त्यामागे सांगितली जाते.

खंडोबा हे ज्यांचे कुलदैवत आहे, त्यांच्याकडे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीपर्यंत चंपाषष्ठीचे नवरात्र असते. काहींकडे पंचमीच्या दिवशी बाजरीच्या पिठाचे पाच दिवे व दोन मुटकी करून देवाला ओवाळतात. नंतर तेच दिवे देवासमोर जी बाजरीची रास केलेली असते त्यावर ठेवतात. चंपाषष्ठीला देवांची पूजा करून नैवेद्य दाखवतात व नंतर नवरात्र उठते. त्या सहा दिवसांत मल्हारी माहात्म्य या ग्रंथाचे वाचन करतात.

त्या महिन्यातील मोक्षदा एकादशीलाच गीता जयंती असते. गीता हे जीवनाचे तत्त्वज्ञान आहे. तो दिवस गीतेचा जन्मदिवस म्हणून साजरा करतात. त्या दिवशी गीतापठण करतात. तर मार्गशीर्ष पौर्णिमेला मृग नक्षत्रावर जगद्‌गुरू दत्तात्रयांचा अवतार झाला. त्या दिवशी दत्त जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. काही ठिकाणी कुलाचाराप्रमाणे मार्गशीर्ष शुद्ध अष्टमी ते पौर्णिमेपर्यंत दत्तनवरात्र असते. त्या काळात उपासना म्हणून कोरडी भिक्षा मागणे, सत्यदत्तपूजा करतात. दत्तजयंतीपूर्वी सात दिवस आधी श्रीगुरुचरित्र पारायणास सुरुवात करतात.

दत्तजयंतीच्या दिवशी उपवास करून दत्तजन्मोत्सव करतात. काही ठिकाणी दत्तजन्म माध्यान्ही किंवा संध्याकाळी साजरा करतात. ठिकठिकाणी मोठी यात्राही भरते. प्रामुख्याने शेतकरी कुटुंबात विशेष करून मराठवाड्यात मार्गशीर्षातील अमावास्या ही ‘वेळ अमावास्या’ म्हणून साजरी करतात. त्या दिवशी शेतीकामास लागणाऱ्या सर्व गोष्टींची पूजा करतात. सकाळी ज्वारी-बाजरीचे उंडे, पुरणपोळी सर्व भाज्या मिळून केलेली एकच भाजी व एका रंगवलेल्या माठात आंबिल असे सर्व साहित्य घेऊन सगळा परिवार स्वत:च्या शेतात जातो. डोक्यावरील घोंगड्यावर आंबिलीचा माठ ठेवून कुटुंबप्रमुख संपूर्ण शेताला प्रदक्षिणा घालतो. त्यावेळी बाकीची मुले ताटली वाजवत त्याच्यापुढे असतात. नंतर सोबत आणलेल्या पदार्थांपैकी थोडे पदार्थ एकत्र करून शेतावर शिंपडतात. ‘हर हर महादेव, हरमला भगत राजो’ असे म्हणत एका झाडाखाली आंबिलीच्या माठाची पूजा करून सर्वजण आनंदाने जेवायला बसतात.

ज्यांची शेती नाही अशा गावकऱ्यांना त्यावेळी आवर्जून बोलावतात. जेवणानंतर आंबिलीचा माठ खड्ड्यात पुरतात. पंचमहाभूतांचे प्रतीक म्हणून त्यावर पाच खडे ठेवून त्यांची पूजा करतात. एकूणच ते सगळे दिवस सुखा-समाधानाचे आणि समृद्धीचे. वातावरणातही गारठा वाढू लागलेला असतो, कामानिमित्त दूरवर गेलेले गणगोत दसरा- दिवाळीसारख्या सणांचे औचित्य साधून एकत्र येतात, परत जातात ते आनंदाची शिदोरी घेऊनच!

(स्रोत : इंटरनेट अनिता कुळकर्णी)