दरवाजा आहे महत्त्वाचा (Importance Of Door In Ho...

दरवाजा आहे महत्त्वाचा (Importance Of Door In House)

घराच्या प्रवेशद्वारा जवळ किंवा आतील कोणत्याही दरवाजा जवळ काही अडचण ठेवली असेल, ज्यामुळे प्रवेश करणं, वावरणं कठीण होत असेल, तर त्या घरात कारकिर्दी संबंधी अडचणी सर्रास नजरेस पडतात.

फेंगशुई शास्त्राचा पाया पाच मूलभूत घटकांवर अवलंबून आहे. पृथ्वी (माती), पाणी, अग्नी, वृक्ष आणि धातू, असे हे पाच मूलभूत घटक आहेत. असे हे पाच मूलभूत घटक आपल्या घरातील, तसंच कार्यालयातील ऊर्जेचा समतोल सांभाळण्यास नेहमीच मदत करत असतात. याच संदर्भात एक किस्सा आठवतो…
एका गृहस्थांना आपल्या कारकिर्दीबाबत बर्‍याच समस्या येत होत्या आणि त्यांनी त्यासंदर्भात सल्ला घेण्यासाठी माझ्याशी संपर्क साधला होता. त्यांच्यासोबत झालेल्या संभाषणात विषय फारच गंभीर असावा, असं मला वाटलं आणि म्हणूनच त्यांच्या घराला भेट द्यावी असं मनात आलं. त्यानुसार मी त्यांच्या घरी गेले. त्यांच्या घरात फिरून पाहिलं असता, एक महत्त्वाची गोष्ट माझ्या लक्षात आली. ती गोष्ट म्हणजे, त्यांच्या घरातील सर्व दरवाजांच्या बिजागरांचा करकरण्याचा आवाज येत होता. त्यांच्या झोपण्याच्या आणि अभ्यासाच्या खोलीचे दरवाजे पूर्णतः उघडत नव्हते. कारण रोजच्या वापरातील कपडे त्यांनी दारामागे अडकवले होते. बाथरूममधील शॉवर नीट चालत नव्हता. नळ एका बाजूने अगदी घट्ट झाल्यामुळे व्यवस्थित उघडत नव्हता.

संधीचं प्रतिनिधित्व करतात दरवाजे
इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, दरवाजे हे प्रामुख्याने कारकिर्दीच्या संधीचं प्रतिनिधित्व करतात. म्हणूनच घराचे सर्व दरवाजे अगदी सहजतेने बंद आणि उघडे होणं महत्त्वाचं ठरतं. दरवाजे करकरत असतील, तर त्यांच्या बिजागरांमध्ये लगेच तेल घालून, तो आवाज बंद केला पाहिजे. घराचा दरवाजा अडकला किंवा थांबला, तर याचा अर्थ तुम्ही स्वतः कारकिर्दीत आणि संधींमध्ये समस्यांना आमंत्रण देत असता.

कारकिर्दीचा संबंध घरातील पाण्याशीही
कारकिर्दीचा संबंध पाण्याशी निगडीत असल्यामुळे घरात येणार्‍या पाण्याचा प्रवाह संथ आणि शांत असणं आवश्यक आहे. कारकिर्दीत संधीच्या बाबतीत येणारे अडथळे हे घरातील नळ घट्ट असल्यानेही उद्भवतात.

फर्निचरची अडचण नको
या गृहस्थांच्या घरातील आणखी एक मोठा दोष फर्निचरच्या बाबतीत होता. घरातील फर्निचर चुकीच्या पद्धतीने लावलं गेलं होतं. त्या घरात बहुतांश लाकडाचं फर्निचर होतं. घरात प्रवेश करताच समोर चपलांचं स्टँड आडवं होतं. आत यायची वाट इतकी अरुंद होती की, आत प्रवेश करणंच कठीण वाटत होतं. त्या स्टँडमुळे बरीच जागा व्यापली गेली होती. बैठकीच्या खोलीतील युनिट भलं मोठं असल्यामुळे ये-जा करताना अडचण होत होती.

 त्यांच्या झोपण्याच्या खोलीतही त्यांना किंवा त्यांच्या पत्नीला, असं एका वेळी एकालाच प्रवेश करणं शक्य होत होतं. कारण त्यांनी या खोलीतील बेड आणि कपाट अशा पद्धतीने मांडलं होतं की, तिथे एका वेळी एकालाच वावरणं शक्य होतं. पत्नीच्या हट्टापायी घेतलेला मोठा फ्रीज स्वयंपाकघरात अवाढव्य वाटत होता. त्याने स्वयंपाकघरातली खूप जागा व्यापली होती. अशा प्रकारे घरातील बहुधा सर्वच खोल्यांमध्ये वावरताना अडचणी येत होत्या. आणि याच अडचणी त्यांना करिअरच्या बाबतीतही सतावत होत्या. या सर्व गोष्टी नीट केल्यावर अडचणी दूर होत गेल्या.
घराच्या प्रवेशद्वाराजवळ किंवा आतील कोणत्याही दरवाजाजवळ काही अडचण ठेवली असेल, ज्यामुळे प्रवेश करणं, वावरणं कठीण होत असेल, तर त्या घरात अशा प्रकारच्या कारकिर्दी संबंधी अडचणी सर्रास नजरेस पडतात. तेव्हा तुम्हालाही कारकिर्दीत अडथळे येत असतील, तर तुमच्या घरातही, घरात किंवा घरातील कोणत्याही खोलीत प्रवेश करताना मार्ग काढणं कठीण होत आहे का ते तपासा आणि घरात प्रवेश करण्याचा, वावरण्याचा मार्ग सुकर करा. तसंच घराचे दरवाजे अखंड आहेत का, सहज आणि आवाज न करता उघडतात ना, याचीही खात्री करून घ्या.