अक्षय फळ देणारी तृतीया! (Importance Of Akshaya ...

अक्षय फळ देणारी तृतीया! (Importance Of Akshaya Tritiya)

साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचं फळ हे अक्षय असतं. तेव्हा आनंद आणि शुभ फळ देणारी ही तृतीया आपण सण म्हणूनच साजरी करतो.
अक्षय तृतीया हा दिवस म्हणजे हिंदू दिनदर्शिकेप्रमाणं वैशाख शुद्ध तृतीया आहे. अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त आहे. या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचं फळ ‘अक्षय्य’ (न संपणारं) असं मिळतं, असा समज आहे. अक्षय तृतीयेला श्रीब्रह्म आणि श्रीविष्णु यांच्या मिश्र लहरी उच्च देवतांच्या लोकांतून, म्हणजे सगुण लोकांतून पृथ्वीवर येतात. त्यामुळे पृथ्वीवरील सात्त्विकता दहा टक्क्यांनी वाढते, असं म्हणतात.

सांस्कृतिक महत्त्व
महाराष्ट्रातील स्त्रिया चैत्र महिन्यात चैत्रगौरीची स्थापना आणि पूजा करतात. चैत्रातील एखाद्या दिवशी हळदीकुंकवाच्या निमित्तानं स्त्रियांना घरी बोलावून मोगर्‍याची फुलं किंवा गजरा, आंब्याची डाळ (किंवा भिजवलेले हरभरे) आणि पन्हं देतात. त्या हळदीकुंकू समारंभांचा अक्षय्य तृतीया हा शेवटचा दिवस असतो.

असंही महत्त्व
1. परशुरामाचं अवतरणही याच दिवशी झालं होतं, असं मानलं जातं. त्यामुळे या दिवशी परशुरामाची पूजा केली जाते.
2. या दिवशी भारताच्या उत्तराखंड राज्यातील बद्रीनारायणाच्या बंद देवळाचं दार उघडतात. हे मंदिर अक्षय्य तृतीयेला उघडल्यानंतर दिवाळीतल्या भाऊबिजेच्या दिवशी बंद होतं.
3. नर-नारायण या जोडगोळीनं या दिवशी अवतार घेतला होता.
4. या दिवशी गंगेचं स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झालं, अशीही आख्यायिका प्रचलित आहे. म्हणून जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल, तो पापांतून मुक्त होतो असं मानतात.
5. हा सण विष्णुप्रित्यर्थ आहे. त्या निमित्तानं वसंतमाधवाची पूजा आणि तृषितांसाठी उदककुंभ दान केला जातो.
6. या दिवशी कृषी संस्कृतीचा पालक म्हणून बलरामाचीही पूजा करण्यात येते.

हिंदू संस्कृतीप्रमाणं या दिवशी करायच्या गोष्टी
1. आपल्या जवळच्या नदीत किंवा जमल्यास गंगेत किंवा समुद्रात अंघोळ करा.
2. सकाळी पंखा, तांदूळ, मीठ, तूप, साखर, चिंच, फळ आणि वस्त्राचं दान देऊन ब्राह्मणांना दक्षिणा द्या.
3. ब्राह्मण भोजन घाला.
4. या दिवशी सातूचं महत्त्व असून, ते जरूर खा.
5. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यानं या दिवशी नवीन घरात प्रवेश, नवीन वस्तू घेणं, मोठे आर्थिक व्यवहार करणं आदी शुभ कामंही केली जातात.

शेतीच्या कामास सुरुवात
अक्षय्य तृतीयेनंतर पावसाळा येणार असतो. गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर नांगरलेल्या शेतजमिनीची मशागत करण्याचं काम अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पूर्ण करण्याची प्रथा आहे. या मुहूर्तावर बियाणं पेरण्यास सुरुवात केल्यास, त्या बियाणांपासून विपुल धान्य पिकतं आणि कधीही बियाणाला तोटा पडत नाही, अशी धार्मिक समजूत आहे. आयुर्वेदात सांगितलेल्या औषधी वनस्पतीही अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर रोवल्यास या वनस्पतींचा क्षय होत नाही, म्हणजेच औषधी वनस्पतींचा तुटवडा भासत नाही, अशी समजूत आहे.

धार्मिक आचार
हा दिवस पूर्वजांचं ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो. पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचं स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचं पूजन करतात. तर मृत पितरांसाठी श्राद्ध अपिंडक किंवा तीळ-तर्पण केलं जातं. आपले पूर्वज पाणी पिण्यास येतात, अशी या मागे कल्पना आहे.