लक्ष्मी रूपेण संस्थितः (Importance And Ritual O...

लक्ष्मी रूपेण संस्थितः (Importance And Ritual Of Laxmi Pujan)

लक्ष्मी रूपेण संस्थितः

 • संगीता पाटकर

 • विलक्ष्मीची प्राप्ती व्हावी आणि आपल्याकडे ती सदैव स्थिर राहावी, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यासाठी वर्षभर निरनिराळ्या रूपात तिची आराधना केली जाते. दिवाळीतील लक्ष्मी पूजनाचा दिवस हा त्यापैकी सर्वांत महत्त्वाचा दिवस मानला जातो.
  ष्णू पुराणानुसार लक्ष्मी ही भृगु ऋषींची कन्या. दुर्वास ऋषींच्या शापामुळे ती स्वर्गलोक सोडून सागरात वास्तव्य करू लागली. त्यानंतर समुद्रमंथनातून देवी लक्ष्मीचं अवतरण झालं आणि श्री विष्णूंशी तिचा विवाह झाला. लक्ष्मी हीच श्री विष्णूंची शक्ती आणि मायादेखील आहे. विष्णूंच्या दोन्ही बाजूस भूदेवी आणि श्रीदेवी या रूपात ती पाहायला मिळते. भूदेवीच्या रूपात ती पृथ्वीचं अस्तित्व दर्शविते तर श्रीदेवीच्या रूपात ती संपत्ती ऐश्‍वर्याची निदर्शक आहे.
  लक्ष्मीची प्राप्ती व्हावी आणि आपल्याकडे ती सदैव स्थिर राहावी, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यासाठी वर्षभर निरनिराळ्या रूपात तिची आराधना केली जाते. दिवाळीतील लक्ष्मी पूजनाचा दिवस हा त्यापैकी सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो. वास्तविक हा दिवस अमावस्येचा असतो, त्यातही लक्ष्मीपूजनाची वेळ सूर्यास्तानंतरची असते. मग हाच दिवस लक्ष्मीची आराधना करण्यासाठी का निश्‍चित केला गेला असावा? पुराणात तर कालरात्री, महारात्री आणि मोहरात्री या तीन रात्री उत्सवांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असल्याचा उल्लेख आहे. या तीन रात्रींत जे कोणी उत्सव वा जागरण करतील त्यांना र्‍ही, श्री, यश, बुद्धी, बोध हे सर्व प्राप्त होतात.
  लक्ष्मीपूजन रात्रीच का करावं?
  कालरात्री ः श्रीकृष्णाष्टमी ही कालरात्री मानली जाते. तर काहीजण हुताशिनी पौर्णिमे(होळी)ला कालरात्री मानतात.
  महारात्री ः महाशिवरात्री.
  मोहरात्री ः अश्‍विन अमावस्या म्हणजेच दिवाळीतील लक्ष्मीपूजनाचा दिवस.
  अशा या रात्रीच्या पूजनाचा अधिकार लक्ष्मीसह तीन देवतांना आहे, ते म्हणजे शिव आणि शक्ती. म्हणजेच शिवरात्र आणि नवरात्र! पण मग रात्रच का? तर अशी एखादी गोष्ट की जी आपल्याला आपल्यापासून कधीही दूर जाऊ नये असे वाटते, तिची आराधना रात्री एकांतात एकचित्त होऊन करावी असं शास्त्र सांगतं.
  लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रथम ‘अलक्ष्मी’ला दूर केलं जातं. ही अलक्ष्मी कोण? तर समुद्रमंथनाच्या वेळी हलाहल विषानंतर लक्ष्मीच्या आधी ही वर आली म्हणून हिला लक्ष्मीची मोठी बहीण – ज्येष्ठा म्हणतात. अलक्ष्मी म्हणजे दारिद्रय-दैन्य. समुद्रातून वर आल्यावर हिने विचारले ‘मी कुठे राहू?’ त्यावर देवांनी तिला सांगितलं की तू कोळसा, कोंडा व केस (अस्वच्छता) यात राहा. ज्या ज्या घरात अधार्मिक गोष्टी चालत असतील तेथे तुझी विहार स्थाने असतील.
  विष्णुपुराणात अलक्ष्मीचं वर्णन आढळतं. त्यानुसार ती कृष्णवर्णी, रक्तनेत्र, द्विभुजा, लांब नाकाची, स्तन व पोट मोठे असलेली, कमळ व काकध्वज धारण करणारी आहे. केरसुणी हे तिचं आयुध आहे. हिचा फेरा आपल्या घरावर येऊ नये म्हणून काही ठिकाणी अश्‍विन शुक्ल अष्टमीला महालक्ष्मीच्या पूजेआधी ज्येष्ठा या नावानं अलक्ष्मीची पूजा करून घराबाहेर तिचं विसर्जन करतात. ही घरातून निघून जावी म्हणून काही ठिकाणी मागील दारी एक दिवा लावून तो घरातील कानाकोपर्‍यात फिरवून पुढील दारी आणून टाकतात. हा प्रकार म्हणजे अलक्ष्मीला बाहेरची वाट दाखवणं होय. याच्या उलट बाहेर दिवा लावून तो घरात आणणं म्हणजे लक्ष्मीला घरात येण्याचा मार्ग दाखवणं.

 • समुद्रमंथनानंतर पुढे लक्ष्मी उत्पन्न झाली. तिचं श्रीविष्णूंशी लग्न ठरलं. पण मोठ्या बहिणीचं लग्न झाल्याशिवाय धाकटीचं करणं धर्मसंमत नसल्यानं देवांनी तिचं लग्न उद्दालक ऋषींशी लावून दिलं. पुढे उद्दालक ऋषींना तिचा स्वभाव न आवडल्यानं ते तिचा त्याग करून निघून गेले. तेव्हा ती एका पिंपळाखाली बसून शोक करू लागली. तो शोक ऐकून लक्ष्मी विष्णूसह तिला भेटायला आली. लक्ष्मीनं तिला वर दिला की ‘जे कोणी अस्वत्थाखाली बसून तुझी पूजा करतील ते श्रीमंत होतील.’ तेव्हापासून दर शनिवारी सूर्योदयापूर्वी पिंपळाची पूजा लक्ष्मीप्रद मानतात.
  लक्ष्मीची अष्टरुपं
  ‘लक्ष्मी’चा अर्थ केवळ संपत्ती-पैसाअडका एवढाच नाही, तर त्याहूनही वेगळा अर्थ त्यात दडलेला आहे. मानवी जीवनाचं वेगवेगळ्या रूपात भरणपोषण करते ती लक्ष्मी. यावरून तिची आठ रुपं मानली गेली आहेत. ती अष्टरुपं खालीलप्रमाणे –
 1. आदीलक्ष्मी : चैतन्य, उत्साह व कल्याण हे या आदिशक्तीशी निगडीत आहे. ज्यावेळी शापामुळे लक्ष्मीला पृथ्वीवर अवतार घ्यावा लागला, त्यावेळी श्री विष्णूही तिच्याबरोबर तिरुपतीच्या वेंकटेशाच्या रूपात अवतरले.
 2. संतानलक्ष्मी : संतती सुख लाभण्यासाठी, मुलाबाळांनी घर भरलेलं असण्यासाठी संतान लक्ष्मीचं व्रत करावं.
 3. गजलक्ष्मी : कर्जबाजारी होऊन त्रस्त झालेल्यांनी गजलक्ष्मीची आराधना करावी. इंद्रानेही एकदा जेव्हा सारी संपत्ती गमावली तेव्हा गजलक्ष्मीच्या मदतीनेच त्याला सारी संपत्ती परत मिळवता आली.
 4. धनलक्ष्मी : पैशाचीच (धनाची) पूजा केल्यास परत पैसे देणारी, धन देणारी ती धनलक्ष्मी होय.
 5. धान्यलक्ष्मी : ही अन्नाची समृद्धी देणारी आणि सुबत्ता दर्शविणारी लक्ष्मी आहे. जगण्यासाठी आवश्यक असणार्‍या अन्न-धान्याशी संंंबंधित ती धान्यलक्ष्मी. त्यासाठी धान्याची पूजा केली जाते.
 6. विजयलक्ष्मी ः शत्रूंवर मात करण्यासाठी बळ देणारी. अडथळे दूर सारून विजय मिळवून देणारी ती विजयलक्ष्मी.

 1. धैर्यलक्ष्मी : वीरलक्ष्मी म्हणूनही ही ओळखली जाते. मनःशांती व मनोबल वाढविणारी ही धैर्यलक्ष्मी होय.
 2. ऐश्‍वर्य लक्ष्मी : धन, आरोग्य संपन्नता, ज्ञान आणि शक्ती व ऐहिक सुख प्राप्त करून देणारी ही ऐश्‍वर्यलक्ष्मी.
  श्री महालक्ष्मीनं स्वतःच आपलं वास्तव्य कोणत्या घरी असेल याचं वर्णन केलं आहे. स्वच्छ, पवित्र व सुशोभित ठिकाणी लक्ष्मी वास्तव्य करते. तनामनाने शुद्ध असणार्‍या,
  कष्ट करणार्‍या, दुःखी कष्टी जनांना मदत करणार्‍यांकडे लक्ष्मीचा वास असतो. ज्यांच्यावर गुरु, देवता, माता-पिता, बंधु-भगिनी, अतिथी व पितर रुष्ट (नाराज) होतील, त्यांच्याकडे मी जाणार नाही. खोटं बोलणार्‍या, विश्‍वासघात करणार्‍या कृतघ्न व्यक्तींच्या घरीही मी जाणार नाही.
  ‘माझ्याकडे काहीच नाही’ असे जो नेहमीच बोलत राहतो त्याच्याकडे देखील लक्ष्मी पाठ फिरविते. ज्या ठिकाणी तेज, धर्म, सत्य, व्रत, बल, शील, चारित्र्य, दान, तपस्या, पराक्रम व धर्माचरण असते तिथे लक्ष्मी निवास करते.
  श्रद्धा व भक्तीने दिपावलीत अमावस्येच्या दिवशी सायंकाळी लक्ष्मी पूजन करावे. पूजेच्या वेळी वातावरण प्रसन्न, सुगंधित व मंगलमय असावं. एका चौरंगावर नवं
  लाल वस्त्र टाकून त्यावर कलश ठेवून महालक्ष्मीची प्रतिमा ठेवावी. एका पानावर केशरयुक्त चंदनानं अष्टदल काढावं. त्यावर द्रव्यरुपी (पैसे) व अलंकाररुपी (दागिने) महालक्ष्मी ठेवावी. पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख आसनावर बसून गंध, अक्षता, पत्र-पुष्प, दीप, फळे, मिठाई, पंचामृत आणि नैवेद्य ठेवून मनोभावे सहकुटुंब सहपरिवार पूजा करावी. नंतर आरती करावी. महालक्ष्मी तुमची सर्व इच्छा पूर्ण करील.