‘मुलगी झाली हो’ मधील बारशाचा प्रभाव : हुबेहूब क...

‘मुलगी झाली हो’ मधील बारशाचा प्रभाव : हुबेहूब केलं बारसं आणि नावही ठेवलं साजिरी! (Impact Of Naming Ceremony In Real Life)

टेलिव्हिजनवर दाखविण्यात येणाऱ्या मालिकेशी प्रेक्षक इतके समरस होतात, की मालिकांमधील पात्र त्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनतात. या पात्रांची सुख-दुःख त्यांना आपली वाटू लागतात. महाराष्ट्राच्या घराघरात लोकप्रिय ठरत असलेली स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ ही  मालिका नियमितपणे पाहणाऱ्या साटेलकर दाम्पत्याने नुकतेच याचा प्रत्यय आणून दिला आहे.

गोरेगाव इथे राहणाऱ्या या साटेलकर दाम्पत्याने मालिकेत दाखविल्याप्रमाणे हुबेहुब आपल्या लेकीचं बारसं केलं असून तिचं साजिरी असं नाव ठेवलं आहे. स्टार प्रवाहवरील सर्वच मालिका ते आवर्जून पाहतात. परंतु ‘मुलगी झाली हो’ ही मालिका त्यांच्या अत्यंत आवडीची आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेत माऊच्या बारश्याचा प्रसंग दाखवण्यात आला. यात दाखविण्यात आलेले माऊचे बाबा म्हणजेच विलास पाटील यांना आपली चूक उमजल्यानंतर खुल्या दिलाने ते माऊचा स्वीकार करतात. इतकंच नाही तर तिला घरात हक्काचं स्थान देत तिचं साजिरी असं नामकरणही करतात.

मालिकेतील या भावनिक प्रसंगाने साटेलकर कुटुंबिय अतिशय भारावले. त्यात योगायोगाने काही दिवसांपूर्वीच त्यांच्या घरी कन्यारत्न जन्माला आले. त्यामुळे मालिकेतल्या माऊच्या बारश्याच्या प्रसंगाने भारावलेल्या साटेलकर दाम्पत्याने मालिकेप्रमाणेच अगदी हुबेहुब दिवे उजळून आपल्या लेकीचं नामकरणही साजिरी असं केलं आहे.

एवढेच नाही तर त्यांनी मालिकेत विलास पाटील ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या किरण माने यांना बारश्याचे फोटो देखील पाठवले. हे फोटो पाहून किरण माने यांनी, ‘आपल्या एखाद्या एपिसोडचा किंवा सीनचा एवढा प्रभाव पडावा हे खूप आनंद देणारं आहे. आता आयुष्यभर जेव्हा जेव्हा या गोड गोजिरीला तिच्या नावाविषयी विचारलं जाईल तेव्हा तेव्हा ‘मुलगी झाली हो’ मालिकेची आठवण निघत राहिल.’ असं म्हटलं आहे.