ऋतूबदलात प्रतिकारक्षमता वाढवा! (Immunity Booste...

ऋतूबदलात प्रतिकारक्षमता वाढवा! (Immunity Booster Tricks In Monsoon)

ऋतूबदलात प्रतिकारक्षमता वाढवा!
ऋतूबदलाचा थोडाबहुत परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. अशा परिस्थितीत ऋतू बदलणं आपल्या हातात नसतं, मात्र शरीराची प्रतिकारक्षमता वाढवणं आपल्या हातात आहे.
ते आपण केलंच पाहिजे.
ऋतू बदलला की हवामान बदलते. मग बदलत्या हवामानाचा थोडाबहुत परिणाम शरीरावर न झाला तरच नवल. पावसाळा म्हणजे खरं तर उन्हानं काहिली झालेल्या शरीरावर पाण्याचा थंडगार शिडकावा. परंतु या पहिल्या पावसात भिजण्यास परवानगी मिळत नाही कारण त्या पाण्यातून विषाणू संसर्ग होण्याची शक्यता असते. आणि मग येथूनच पावसात गेल्याने आजारांना आयतंच निमंत्रण मिळेल असा धाक दाखवायला सुरुवात होते.
सर्दी, पडसे, कावीळ, डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया, टायफॉइड…. अशा आजारांचं आणि पावसाचं हातात हात घालून येणं आताशा लोकांना व्यवस्थित परिचयाचं झालेलं आहे. तरीही आपण हे आजार होऊ नयेत यासाठी दक्षता घेण्याचं नेहमी उद्यावर टाकतो, आणि तोपर्यंत आजार आपली हजेरी लावतो. पावसाळा सुरू झाल्या झाल्या आजारी पडण्याचं कारण म्हणजे उन्हाळ्यात आपण न पाळलेल्या आहार-विहाराच्या सवयी. शीतपेयं, आइस्क्रिम्स, तेलकट, तिखट, रस्त्यावरील पदार्थांवर ताव मारणं. उन्हातान्हातून भटकायला जाणं, हे इतकं पराकोटीला गेलेलं असतं की त्याचा परिणाम पुढे येणार्‍या ऋतूमध्ये दिसून येतो. पावसाळ्यातील दमट, थंड हवेची साथ मिळताच संसर्गजन्य आजार शरीराचा लगेच ताबा घेतात. आता आपण पावसात होणार्‍या काही आजारांची व त्यावरील उपचारांची माहिती घेऊया.

डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया
डेंग्यूमध्ये खूप ताप, असह्य डोकेदुखी आणि सांधेदुखी होते. तर मलेरियामधेही थंडी वाजणं, ताप येणं, मांसपेशीं तसेच एकूणच शरीरात अशक्तपणा जाणवतो. जवळपास यासारखीच लक्षणं चिकनगूनिया झाल्यास दिसून येतात.
उपाय ः या आजारांपासून वाचण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे आपल्या घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नये. कारण साचलेल्या पाण्यामध्ये डासांची पैदास होते. दुसरं म्हणजे घरामध्ये नको असलेल्या वस्तूंचे भंगार साठवून ठेवू नये. घर शक्य तितके सुटसुटीत आणि साफ ठेवावं. पावसापूर्वी घरामध्ये पेस्ट कंट्रोल जरूर करून घ्यावं.

कॉलरा
पावसाच्याच दरम्यान पसरणारा हा एक गंभीर आजार आहे. दूषित अन्न किंवा दूषित पाणी यांच्या सेवनानं हा आजार होतो. तसंच आजूबाजूच्या जंतूसंसर्गित वातावरणामुळं या आजारास खतपाणी मिळतं. मग उलट्या, जुलाब यानं हैराण व्हायला होतं.
उपाय ः सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कॉलराची लस टोचून घ्या. त्यामुळे सहा महिन्यांपर्यंत तुम्ही या आजारापासून सुरक्षित राहू शकता. या व्यतिरिक्त स्वच्छ आणि शुद्ध पाण्यासाठी प्युरिफायरचा वापर करा किंवा मग पाणी उकळून प्या.
हात धुण्यासाठी लिक्विड साबणाचा वापर करा. दूध व आइस्क्रीम, मलई यांसारखे दुधाचे पदार्थ खाणं टाळा. रस्त्यावरील उघडे अन्न खाऊ नका.

टायफॉइड
हा देखील पावसाच्या दरम्यान दूषित पाणी व दूषित अन्न याच कारणांमुळे होणारा आजार आहेे. ताप, पोटदुखी आणि डोकेदुखी ही या आजाराची लक्षणं आहेत.
उपाय ः हा एक संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे शक्यतो रुग्णाने थोडं अलग राहावं. उकळलेलंच पाणी प्यावं. डिहायड्रेशन होऊ नये यासाठी रुग्णास सतत लिक्विड स्वरूपात आहार देत राहावा. खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावेत.

जुलाब, पोटांचे आजार
या मोसमामध्ये पचनक्रिया मंदावल्यामुळे पोटासंबंधीचे आजार होतात. विषाणूंच्या संसर्गामुळे गॅस्ट्रो, जुलाब यासारखे आजार त्रास देऊ लागतात. पोटात इन्फेक्शन होऊन उलट्या व जुलाबही होतात.
उपाय ः आहाराच्या सवयींबरोबर स्वतःच्या स्वच्छतेकडेही लक्ष दिलं पाहिजे. स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारी भांडी स्वच्छ असावीत. पोटांच्या आजारात साल काढता येईल अशी फळं आणि भाज्या खाव्यात.

कावीळ
हेपॅटायटिसचे जिवाणू पाण्यातून शरीरात पसरल्यास त्याच्या इन्फेक्शनने कावीळसारखा आजार होतो. या आजारात डोळे पिवळे दिसू लागतात. तसेच युरीनचा रंगही पिवळा होतो.
उपाय ः हेपॅटायटिस ए आणि बीची लस टोचून घ्या. दूषित अन्न व पाणी यांचं सेवन करू नका. स्वच्छतेची नीट काळजी घ्या.

सर्दी-दमा
काही जणांना धूळ, परागकण यांच्या अ‍ॅलर्जीमुळे कफ होतो. पावसाळ्यातील दमट वातावरणात हा त्रास अधिक वाढू शकतो. वार्‍यामुळे धुळीसारखे अ‍ॅलर्जी येणारे घटक शरीरात शिरण्याचं प्रमाणही वाढतं. यामुळे श्वसनयंत्रणेवर ताण पडून, नलिकांना सूज येतेे व अस्वस्थता अधिक वाढते.
उपाय ः पाऊस तसेच वार्‍यापासून बचाव करणे हा प्राथमिक उपाय आहे. धुळीची अ‍ॅलर्जी होऊ नये यासाठी बाहेर जाताना तोंडावर मास्क लावावा. अधिक त्रास होत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषधं घ्यावी.

या मोसमात काय खाल?


पावसाळ्यात पचनक्रिया मंदावल्यामुळे खरं तर हा पोट बिघडण्याचा काळ आहे. त्यामुळे या काळात आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींवर खास लक्ष ठेवावयास हवं.

 • सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिण्याचं पाणी कमीत कमी 20 मिनिटं उकळून, मगच प्यावं.
 • पावसात हिरव्या पालेभाज्या मिळतात. त्या खायच्या झाल्यास स्वच्छ धुऊन खाव्यात. अन्यथा खाण्याचे टाळा.
 • जास्त मसालेदार व तेलकट पदार्थ खाण्याचे टाळा.
 • रोज गरम डाळ किंवा सूप प्या. त्यात हळद, लवंग, काळीमिरी आणि बडीशेप घाला. यामुळे इन्फेक्शन होत नाही.
 • गवती चहा, पुदिना, आलं, तुळस, साखर टाकून बनविलेला चहा प्या.
 • गाईचं दूध पचनास हलकं असल्यामुळे ते प्या. त्यानं लगेचच ऊर्जा मिळते. गोड ताक व घरचं साजूक तूप आहारात असू द्या.
 • पावसाच्या दिवसांत मांसाहाराचं प्रमाण कमी करा.
 • मूग, मटकी, तूर, कुळीथ यासारख्या कडधान्यांचा आहारात समावेश असावा.
 • सफरचंद, डाळिंब, पेर, काळ्या मनुका, वेलची केळं ही फळं खाता येतील. सुकामेवा खा. मात्र पेरू, संत्रे, द्राक्ष, अननस ही फळं टाळा.
 • शक्यतो थंड आणि आंबट पदार्थ टाळा.
 • बेकरीतील कोणतेही पदार्थ खाताना त्यावरील एक्सपायरी डेट तपासून घ्या. कारण पावसाच्या दिवसात या पदार्थांना बुरशी लागण्याची शक्यता असते.

घरच्या घरी काय कराल?

 • सर्दी खोकल्यासाठी एक कप पाण्यामध्ये सुंठ पावडर उकळून प्या. आराम मिळेल.
 • घसा खवखवत असेल तर कोमट पाण्यामध्ये मीठ आणि हळद घालून गुळण्या करा.
 • सर्दीमुळे नाक बंद झालं असेल तर गरम पाण्यामध्ये निलगिरीच्या तेलाचे काही थेंब घालून त्याची वाफ घ्या. किंवा रुमालावर त्याचे काही थेंब घालून ते हुंगा.
 • व्हायरल ताप असेल तर एक कप पाण्यामध्ये तुळस आणि आल्याचे तुकडे घालून उकळवा. आचेवरून उतरवून त्यात मध घालून चहाप्रमाणे प्या.
 • अपचन आणि बद्धकोष्ठता असेल तर खाण्यापूर्वी आल्याच्या तुकड्याला सैंधव मीठ लावून खा.
 • रोज हळद घालून दूध प्या. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढेल तसेच दूषित पाण्यामुळे होणारे आजारही टाळता येतील.

कसे वागाल?

 • खूप गर्दी वा जमावाच्या ठिकाणी जायचं टाळा. कारण अशा ठिकाणी व्हायरल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.
 • अ‍ॅलर्जी व इन्फेक्शन होत असलेल्या व्यक्तींनी स्नान करताना कडुलिंबाची पानं पाण्यात उकळवून त्याने आंघोळ करा.
 • व्यवस्थित सुकलेले कपडे वापरावेत. केसही ओले झाले असल्यास नीट सुकवावेत.
 • पाय ओलसर राहिल्यास, बोटांमध्ये चिखल्या होण्याची शक्यता असते. तेव्हा पाय नीट स्वच्छ करून कोरडे ठेवावेत.
 • व्यायाम करत असाल तर खूप घाम येईपर्यंत करू नये. साधा व्यायाम, नियमित करा नि कमी करा.
 • घरात तसेच कार्यालयामध्ये पादत्राणं घालूनच चालण्याची सवय ठेवा. फरशी थंड असल्याने वाताचा त्रास होऊ शकतो.
  इतक्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, हे फक्त वाचताना वाटतं. बरेचदा आपल्याला ह्या माहीत देखील असतात पण आपला आळशीपणा, हलगर्जीपणा यामुळे दरवर्षी या गोष्टींची आठवण करून द्यावी लागते. तेव्हा अगदी गाठ मारून लक्षात ठेवा. पावसाळ्यातील दमट वातावरणात विषाणू व जिवाणूंची संख्या प्रचंड वाढते आणि त्यांच्या संसर्गातही वाढ होते. काहींच्या शरीरात या विषाणूंना विरोध करणारी प्रतिकारशक्ती कमी असते. त्यांना लगेच विषाणुसंसर्ग होतो. तेव्हा लक्षात घ्या ऋतू बदलणं आपल्या हातात नाही, मात्र शरीराची प्रतिकारक्षमता वाढवणं आपल्या हातात आहे.