‘मी कधीही पैश्यांसाठी लग्न किंवा खासगी पार्ट्या...

‘मी कधीही पैश्यांसाठी लग्न किंवा खासगी पार्ट्यांमध्ये जाऊन डान्स केलेला नाही’, असे म्हणत कंगनाने लता मंगेशकर यांच्याशी केली स्वतःची तुलना (‘I never danced in wedding or parties for Money’: Kangana Ranaut again takes a dig at bollywood stars by sharing throwback video of Asha Bhosle)

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. कधी बॉलिवूडवर निशाणा साधल्यामुळे तर कधी राजकीय घडामोडींवर भाष्य केल्यामुळे कंगना स्वतःकडे लक्ष वेधून घेत असते. आता कंगनाने लग्नात डान्स करण्यावरुन एक मोठं वक्तव्य केलं आहे. यामुळे ती चर्चेत आली आहे.

कंगना ही इन्स्टाग्रामवर कायम सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. नुकतंच कंगनाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत आशा भोसले या लता मंगेशकर यांच्या खासगी आयुष्यातील एक किस्सा सांगताना दिसत आहेत.

लता मंगेशकर यांनी एका लग्नात गाणं गाण्यासाठी १ मिलियन डॉलरची ऑफर नाकारली होती. तुम्ही ५-१० मिनिटे तरी येऊन जा, असेही समोरची व्यक्ती दीदींना सांगत होती. पण त्यांनी स्पष्ट भाषेत नकार दिला. मला ५ मिलियन डॉलर दिले तरीही मी अशा ठिकाणी येणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले होते.”

हा व्हिडीओ शेअर करत कंगना म्हणाली, “मी या गोष्टीशी सहमत आहे. इतकंच नव्हे तर मी कधीही लग्न किंवा अशा खासगी पार्ट्यांमध्ये जाऊन डान्स केलेला नाही. माझ्याकडे इतकी लोकप्रिय गाणी असतानाही मी कधीही असे केलेले नाही. यातून मिळणारी मोठी रक्कम नाकारली. मी जेव्हा हा व्हिडीओ पाहिला तेव्हा मला फार आनंद झाला. लताजी खरंच खूप प्रेरणादायी आहेत.”

कंगना सध्या तिच्या ‘इमर्जन्सी चित्रपटावर काम करत आहे. या चित्रपटात ती पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तिने स्वत: या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ‘इमर्जन्सी’ चित्रपटात अभिनेता श्रेयस तळपदे, मिलिंद सोमण, अनुपम खेर यांसह अभिनेत्री महिमा चौधरी महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहे. येत्या २०२३ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.