‘भिरकीट’च्या भूमिकेसाठी मला वजन वाढवावे लागले –...

‘भिरकीट’च्या भूमिकेसाठी मला वजन वाढवावे लागले – मोनालिसा (I Have To Put On Weight For The Role In ‘Bhirakit’ – Monalisa)

क्लासिक एंटरप्राईज प्रस्तुत, सुरेश जमतराज ओसवाल व भाग्यवंती सुरेश ओसवाल निर्मित आणि अनुप जगदाळे दिग्दर्शित ‘भिरकीट’ या चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट उद्या प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्ताने प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणाऱ्या या चित्रपटातील अभिनेत्री मोनालिसा बागल हिच्याशी केलेली बातचीत –   

*चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकून तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती?

– ‘भिरकीट’चे टिझर आपण पाहिले असेलच. हा संपूर्ण चित्रपट विनोदाचं ‘भिरकीट’ आहे. नावाप्रमाणेच हा चित्रपट आहे. जेव्हा मी पहिल्यांदा स्क्रिप्ट ऐकले, तेव्हा मला हसू आवरत नव्हते. मी त्वरित या चित्रपटासाठी होकार दिला. ‘भिरकीट’चे चित्रीकरण कधी सुरु होईल, याची मला उत्सुकता लागून राहिली होती. ज्याप्रमाणे स्क्रिप्ट वाचून मी लोटपोट हसले होते, तसेच चित्रपट पाहून प्रेक्षकांनाही हसू आवरणार नाही. या चित्रपटाची कथा हसवत हसवत काहीतरी संदेश देऊन जाणारी आहे. ज्या उद्देशाने प्रेक्षक हा चित्रपट पाहायला जातील, तो त्यांचा उद्देश नक्कीच सफल होईल.

*’भिरकीट’मधील तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील?

अनुप जगदाळे सरांसोबत हा माझा दुसरा चित्रपट. याआधी मी त्यांच्यासोबत ‘झाला बोभाटा’ हा चित्रपट केला होता. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूप मस्त असतो. या दोन्ही चित्रपटाच्या निमित्ताने मला त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. ‘झाला बोभाटा’ प्रदर्शित झाल्यानंतर त्यांनी मला ‘भिरकीट’विषयी सांगितले होते आणि या भूमिकेसाठी त्यांनी मला काय करावे लागेल, याची कल्पनाही दिली होती. मी यात एक ग्रामीण मुलगी साकारत आहे. गावातील मुलगी असल्याने तिची अंगकाठी नाजूक दिसून चालणार नव्हती. त्यामुळे मला माझे वजन वाढवावे लागले. या चित्रपटातील प्रत्येक कलाकार आपापल्या विनोदी शैलीत ‘बाप’ आहेत. अशा कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळणे, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. खरंतर सुरुवातीला थोडं दडपण आलं होतं, मात्र या सर्वांनी खूप सांभाळून घेतलं. पडद्यावर आम्ही जी धमाल केली आहे, तशीच धमाल आम्ही पडद्यामागेही केली आहे.

*तानाजीसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता ?

या चित्रपटात मी पहिल्यांदाच तानाजीसोबत काम करतेय. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला ओळखत असतो, त्याचा स्वभाव माहीत असतो, त्याच्याबरोबर आधी काम केलेले असते, तेव्हा आपल्याला पुढील प्रोजेक्टमध्ये त्याच्याबरोबर काम करणे सोपे जाते. मात्र तानाजीच्या बाबतीत असं नव्हतं. त्याचा अभिनय मी पाहिला होता पण त्याला मी वैयक्तिकरित्या ओळखत नव्हते. त्यामुळे थोडे दडपण होते. आम्ही पहिल्यांदा लूक टेस्ट दरम्यान भेटलो. त्यानंतर मग चित्रीकरणासाठी नियमित भेटत गेलो. या काळात मला त्याचा स्वभाव कळला. तो अभिनय तर उत्तम करतोच याशिवाय तो एक व्यक्ती म्हणूनही उत्तम आहे. तो खूप प्रेमळ, मस्तीखोर आणि निरागस आहे. त्याच्यासोबत काम करताना खूप मजा आली.

*चित्रपट आता प्रदर्शनाच्या वाटेवर आहे, काय भावना आहे?

– चार वर्षांपूर्वी या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. तेव्हापासूनच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता होती. यात तानाजी आणि माझी जोडी दाखवण्यात आली आहे. आमची मजेशीर प्रेमकहाणी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आता लवकरच आमची मेहनत आणि धमाल तुमच्या समोर येणार आहे.