सतत फ्लॉप होणाऱ्या बॉलिवूड चित्रपटांबद्दल सैफ अ...

सतत फ्लॉप होणाऱ्या बॉलिवूड चित्रपटांबद्दल सैफ अली खानने व्यक्त केली खंत, कलाकारांना फी जास्त देऊनही त्याचा मोबदला काहीच मिळत नाही, कुछ तो गडबड है!… (‘I Have No Idea But Something Is Happening. We Pay People Astronomically And The Returns Have Been Not Good…’ Saif Ali Khan Says On Bollywood Films Failing At The Box Office)

गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमध्ये बिग बजेट आणि मोठ्या स्टार्सच्या चित्रपटांचे फ्लॉप होण्याचे प्रमाण वाढले आहे. अलीकडेच सैफ अली खान आणि हृतिक रोशनच्या विक्रमवेधा या चित्रपटाबाबतसुद्धा असेच घडले. या चित्रपटाबाबत खूप गाजावाजा झाला पण प्रत्यक्षात हा चित्रपट फारशी कमाल दाखवू शकला नाही त्यामुळे तो फ्लॉप ठरला.

आता सैफ अली खाननेही बॉलिवूडमध्ये सातत्याने फ्लॉप होणाऱ्या चित्रपटांवर आपली खंत व्यक्त केली आहे. एका मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखतीत सैफ म्हणाला की, आजकाल काय चालेल आणि काय नाही याचा अंदाजही लावता येत नाही. विक्रमवेधा हा चित्रपट खूप चांगली कामगिरी करेल असे वाटले होते पण तसे काहीच झाले नाही.

सैफ पुढे म्हणाला, चित्रपट सतत फ्लॉप होण्यामागे काही ना काही कारण असते. मला माहित नाही कारण काय आहे पण काहीतरी नक्कीच आहे. चित्रपट बनत आहेत, लोक सतत चित्रपट बनवत आहेत आणि दरम्यानच्या काळात कलाकारांच्या फीमध्येही चढ-उतार होत आहेत आणि होत राहतील पण काही स्टार्स खूप जास्त फी आकारत आहेत. कलाकार एवढी मोठी फी आकारुन सुद्धा त्या बदल्यात त्यांना काहीच चांगले मिळत नाही. आपल्याकडे एकूण लोकसंख्येपैकी फक्त 2 टक्के लोक चित्रपट पाहण्यासाठी पैसे खर्च करतात, पण जर ते प्रमाण 20 टक्क्यांपर्यंत वाढले तर इंडस्ट्रीची भरभराट होईल. लोकांना पैसे कमविणे देखील आवश्यक आहे जेणेकरून ते पैसे खर्च करू शकतील.

सैफच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तो क्रिती सेनन आणि प्रभाससोबत आदिपुरुषमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाबाबत यापूर्वीही बरीच चर्चा रंगली होती.