हंगामा प्लेचा नवा मराठी शो ‘रात्रीचे प्रव...

हंगामा प्लेचा नवा मराठी शो ‘रात्रीचे प्रवासी’ (Hungama Play Releases New Marathi Show)

अनेक हिट मराठी शोज, मराठी चित्रपट आणि १२०० हून अधिक शॉर्ट-फॉर्मेट व्हिडिओज्‌ उपलब्ध करुन देणाऱ्या हंगामा प्लेने नुकतेच ‘रात्रीचे प्रवासी’ हा नवा मराठी शो प्रदर्शित केला आहे. रेड लाइट एरियामध्ये घडलेल्या पाच अतिशय भावुक आणि संवेदनशील कथांचं हे संकलन आहे.
‘रात्रीचे प्रवासी’मधील प्रत्येक कथानकामध्ये दाखविण्यात आलेला प्रवासी हा असं पात्र आहे की ज्याचं आयुष्य अपूर्ण आहे, त्यास प्रेम, शारीरिक सुख हवंय तसंच हे पात्र परिस्थितीपासून दूर जाऊ इच्छित आहे.
यामध्ये एक प्रवासी हा वेश्येचा मुलगा आहे, दुसरं पात्र ६९ वर्षाचे गृहस्थ आहेत, कुठल्याही प्रकारची भीड न बाळगता केवळ स्वतःच्या शारीरिक गरजा पूर्ण करण्याची त्यांची इच्छा आहे. तिसरं पात्र आहे ज्याची प्रेमात फसवणूक झाली आहे, परंतु त्याने सत्याचा स्वीकार करून पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. १८ वर्षाचं चौथं पात्र सर्व सांसारिक सुखाचा त्याग करण्यापूर्वी एकदा शरीरसुखाचा अनुभव, आनंद घेऊ इच्छीतो. शेवटचं पाचवं पात्र लुटारु आहे. जो दुसऱ्यांना लुटून स्वतःची उपजिवीका करतो, परंतु त्या बदल्यात एके दिवशी त्याचंच अतिशय किमती सामान लुटलं जातं.

या पाचही कथांचे विषय वेगवेगळे आहेत. परंतु या कथांमधील प्रत्येक नायक हा आयुष्यात पहिल्यांदाच रेड लाइट एरियामध्ये गेलेला आहे आणि त्याच ठिकाणी त्यांना जीवनातील खरं सत्य आणि खरं सुख यांची प्राप्ती झाली आहे. या प्रत्येकांचे अनुभव पाहणाऱ्यास कामुक आणि उत्तेजित करणारे असू शकतात. तरीही एका रात्रीत त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. हंगामा डिजिटल मीडियाच्या सहयोगाने अनिल वी. कुमार यांनी या शोचं दिग्दर्शन केलं आहे. हा शो हंगामाच्या ‘व्हिडिओ ऑन डिमांड’ प्लॅटफॉर्म ‘हंगामा प्ले’ वर उपलब्ध आहे. या शोमध्ये छोट्या पडद्यावरील अनेक नामवंत कलाकारांचा सहभाग आहे. अतिशय वेगळा विषय, आणि लोकांना जेथे जायला आवडत नाही परंतु तेथे काय चालतं हे जाणून घ्यायला आवडतं अशा जागेशी निगडीत या कथा अतिशय मनोरंजक तसेच रोमांचक आहेत.